
>> पी. व्ही. सावंत
मुंबईच्या सिमेंटच्या जंगलात एकेकाळी दाऊद, छोटा राजन, अरुण गवळी, अमर नाईक आणि बडय़ा गुंडांचे साम्राज्य होते. ते टिकविण्यासाठी या माफीया टोळय़ांनी दिवसाढवळय़ा अंगाचा थरकाप उडविणारा रक्तपात घडवून आणला. एकमेकांवर चढाई करूनच त्यांनी अंडरवर्ल्डमध्ये आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला. परंतु तत्कालीन डीसीपी प्रदीप सावंत, एसीपी प्रफुल्ल भोसले, प्रदीप शर्मा, दया नायक आदी चकमकफेम अधिकाऱयांनी आपला जीव धोक्यात घालून गँगवार व अतिरेकी कारवाया मोडून काढल्या. त्याची इत्यंभूत माहिती मुंबईतील गुन्हेगारीचा ‘एन्सायक्लोपीडिया’ या पुस्तकात वाचावयास मिळते
ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर पवार लिखित ‘मुंबईतील गुन्हेगारीचा एनसायक्लोपीडिया’ या पुस्तकाच्या सहाव्या आवृत्तीचे प्रकाशन नुकतेच राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांच्या हस्ते पार पडले. त्यानंतर या पुस्तकाची 408 पानांची आवृत्ती हाती लागली आणि वाचून थक्कच व्हायला झाले. प्रभाकर पवारांचे पुस्तक वाचून अंगाचा थरकाप होतो, मन सुन्न होते. पवारांचे पुस्तक म्हणजे नावाप्रमाणे खरोखरच एनसायक्लोपीडिया आहे. संपूर्ण अंडरवर्ल्ड आहे. अंडरवर्ल्डमधील इतकी इत्थंभूत आकडेवारीसह माहिती कुठे आढळून येणार नाही. मुंबईतील पोलिसांचे पहिले एन्कॉऊंटर कोणत्या गुंडांचे. शूटआऊटमधला, गँगवारमधला पहिला बळी कुणाचा? मुंबईतील बॉम्बस्फोट कधीपासून सुरू झाले. पहिला बॉम्बस्फोट कधी, कुठे आणि कुणी केला त्याची 2018 पर्यंत या पुस्तकात सविस्तर माहिती आहे.
जुन्या जमान्यातील चाकू, सुरे वापरणाऱया दादांचा जमाना संपल्यानंतर मुब्ंाईत टोळीयुद्ध सुरू झाले. 1980 ते 2014 पर्यंत मुब्ंाई पोलिसांनी 700च्या वर संघटित टोळय़ांतील गुंडांना चकमकीत ठार मारले व मुंबईकरांना दिलासा दिला. त्यानंतर गँगवार आटोक्यात आले. शूटआऊटवर नियंत्रण आले. पोलिसांच्या चकमकी थांबल्या. गेल्या 8 वर्षांत मुंबई शहरात एकही एन्काऊंटर झालेले नाही. मुंबई पोलिसांच्या काही चकमकी वादग्रस्त ठरल्यामुळे न्यायालयाने पोलिसांवर ताशेरे ओढले. छोटा राजन टोळीतील गुंड लखन भैया एन्कांऊंटरप्रकरणी मुंबईच्या 14 पोलीस अधिकारी व कर्मचाऱयांसह 20 जणांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. मुंबई पोलीस दलासाठी हा मोठा हादरा होता. मुंबई पोलिसांनी गँगवार संपविल्यामुळेच आज मुंबईत शांतता आहे. नाहीतर मुंबईचा कधीच शिकागो झाला असतो, असेही प्रभाकर पवार यांनी आल्या निरीक्षणात स्पष्ट केले आहे.
गँगवार मोडून काढणाऱया मुंबई क्राइम ब्रँचच्या अधिकाऱयांनी प्रथम शीख व त्यानंतर इस्लामी अतिरेक्यांच्या नांग्या ठेचल्या आणि अशांत मुंबईला शांत केली. हे जरी खरे असले तरी गेल्या पंचवीस-तीस वर्षांत अतिरेकी 100च्या वर बॉम्बस्फोट घडविण्यात यशस्वी ठरले. त्यात 600च्या वर निष्पाप जीवांचे बळी गेले. मुंबई क्राईम ब्रँचच्या अधिकाऱयांनी 10 शीख व 16 इस्लामी अतिरेक्यांना चकमकीत ठार मारल्यामुळेच त्यांच्या कारवाया थंडावल्या. त्यामुळे गेल्या सात वर्षांत मुंबईत ना बॉम्बस्फोट ना गँगवार! असेही प्रभाकर पवार यांनी आपल्या विश्लेषणात म्हटले आहे.
गँगवार संपविणाऱया मुंबई पोलिसांसमोर इस्लामी अतिरेक्यांचे आव्हान उभे राहिले; परंतु महाराष्ट्र ‘एटीएस’ने इराकमधील इस्लामिक स्टेटमध्ये सामील होण्यासाठी प्रयत्न करणाऱया मुंबईतील बहुसंख्य मुस्लिम तरुणांचे ब्रेन वॉशिंग करून त्यांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणले. त्यामुळे इस्लामिक स्टेटच्या (आयएस) अतिरेक्यांना मुब्ंाईसारख्या शहरात कोणताही घातपात करण्यास यश आले नाही, असेही प्रभाकर पवार आपल्या पुस्तकात नमूद केले आहे. मुंबईत सध्या तरी अतिरेकी व संघटित कारवाया थंडावल्या आहेत; परंतु पोलिसांवरील हल्ल्यात कमालीची वाढ झाली आहे. विशेषतः वाहतूक पोलिसांवरील हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. त्याबद्दल प्रभाकर पवार यांनी आपल्या पुस्तकात खंत व्यक्त केली आहे.
मुंबईतील गँगवार व अतिरेकी कारवाया थंडावल्या. परंतु व्हाइट कॉलर क्राइम सुसाट वेगाने वाढले आहे. बनावट कागदपत्रं बनवून मोठय़ा प्रमाणात फसवणूक केली जात आहे. त्यामुळे मुंबई क्राइम ब्रँचमधून आता आर्थिक घोटाळा (EOW) ही शाखा वेगळी करण्यात आली असून इकॉनॉमिक्स ऑफेन्स विंगसाठी आता स्वतंत्रपणे सहपोलीस आयुक्त व उपायुक्त आदि वरिष्ठ अधिकाऱयांची राज्य शासनाने नियुक्ती केली आहे. मुब्ंाई पोलिसांसमोर सध्या क्राइम वाढल्यामुळे सायबर क्राइमचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. सायबर क्राइमवरही प्रभाकर पवार यांनी आपल्या पुस्तकात प्रकाश पाडला आहे. त्यामुळे त्यांचा हा ‘एनसायक्लोपीडिया’ जबरदस्त वाचनीय झाला आहे. दाऊद, छोटा राजन, अमर नाईक, छोटा शकील, अश्विन नाईक, अरुण गवळी आदी बडय़ा गुंडांची कुंडलीच या पुस्तकात आहे. त्यामुळे पवारांचे हे पुस्तक खपाचा नक्कीच विक्रम गाठेल इतके ते वाचनीय व संग्रही ठेवण्यासारखे झाले आहे.
मुंबईतील गुन्हेगारीचा
एन्सायक्लोपीडिया
लेखक – प्रभाकर पवार
प्रकाशक – पप्पू प्राची प्रकाशन,
पृष्ठs – 408, किंमत – 500 रुपये





























































