रसिकहो – मनमुराद हसवा हसवी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘तेरी भी चूप’ विजय केंकरेंचा कॉमेडी फार्स. आपल्या मराठी रंगभूमीने इतर भाषिक नाटकांनाही आपलंसं केलं आहे. अगदी फ्रेंच रंगभूमीही याला अपवाद नाही.

काही दिग्दर्शक नाटकाचा होलिस्टिक विचार करून नाटकं निवडतात. असे दिग्दर्शक हुशार असतात. कारण एखाद्या नाटकाचा संपूर्णतः विचार करायला नाटय़शास्त्राच्या सगळ्या बाजूंचा आणि अंगांचा विचार करावा लागतो. व्यावसायिक मराठी नाटकांच्या बदलत्या परिप्रेक्षात आता नाटकाचा USP हा एक खूप महत्त्वाचा भाग झाला आहे. USP म्हणजेच विकाऊ वेगळेपणा हा मराठी रंगभूमीच्या सुरुवातीच्या काळापासून जपला जाणारा एक घटक आहे. हे स्वाभाविक आहे. कारण लोकाभिमुख कलेच्या बाजारात नाटक विकलं जाण्यासाठी हे वेगळेपण असणं गरजेचं असतं. पण आधीच्या काळात हे वेगळेपण प्रामुख्याने कला प्रकारांमधून साधलं जायचं. संगीत नाटकांच्या गायन आणि संगीत कलेतून, नटांच्या अभिनय कौशल्यातून, लेखकांच्या शब्दसामर्थ्यातून हे साध्य व्हायचं. साधारण सत्तरीच्या दशकात नेपथ्य आणि प्रकाश योजनेचं तंत्रज्ञान प्रगल्भ झालं आणि मग मराठी नाटकांमध्ये तांत्रिक USP येऊ लागले. आता नवीन पिढी नाटकांमध्ये नवीन, त्यांच्याशी निगडित असलेले विषय घेऊन उभी राहू लागली आहे. त्यांचा USP हाच आहे की, नाटकांमध्ये बदलत्या संस्कृतीचं दर्शन होतंय. संस्कृती बदलतेय यापेक्षा आता समाज काही बाबींबद्दल उघडपणे बोलू लागलाय. म्हणूनच विजय केंकरेंसारख्या दिग्गज दिग्दर्शकांनी आपलं ‘तेरी भी चूप’ हे नवीन नाटक नुकतंच रंगभूमीने आणलंय.

प्रवेश निर्मित ‘तेरी भी चूप’ हे नाटक ‘द लाय’ या एका फ्रेंच कॉमेडीवरून रचलेलं आहे. नवरा-बायको एकमेकांपासून काही गोष्टी लपवण्याच्या पलीकडे जाऊन खोटं बोलू लागतात तेव्हा नेमकं नातं कोणत्या थराला पोहोचलेलं असतं हे ‘तेरी भी चूप मेरी भी चूप’ नाटकाचं कथानक आहे. मुळात फ्रेंच असल्याने त्यात किंचीत बरलस्कपणा (चावटपणाचा धाकटा चुलतभाऊ) आहे. अर्थात ‘तेरी भी चूप’ या आवृत्तीत तो नवीन मराठी मध्यमवर्गीय मानसिकतेला पटेल असाच रचलेला आहे. लेखक तेजस रानडे याने नाटक अत्यंत मनोरंजक रचलेलं आहे. मूळ कथानकात चटपटीतपणा आहे. त्यामुळे ‘तेरी भी चूप’ हे वेगवान वाटत राहतं. तेजसने पूरक संवाद लिहिले आहेत. त्यात कलाकारांना आपल्या टोनिंग आणि डिक्शनने भरीव कामगिरी करायला पुरता वाव आहे. कुठेही पसरट न होता सतत गुंतवून ठेवणारं नाटक तेजस रानडे याने दिलं आहे. विजय केंकरे यांनी ते आपल्या खास शैलीत सादर केलंय. मुळात फार्स हा विजय केंकरेंचा आणि फ्रेंच लोकांचा आवडता नाटय़ प्रकार. नाटक फार्सिकल असलं की, विजय केंकरे यांच्यातला दिग्दर्शक अधिक खुलून समोर येतो. ‘तेरी भी चूप’मध्ये हेच होतं. केंकरेंनी नाटकात इतक्या नेमक्या जागा काढल्या आहेत की, प्रेक्षक म्हणून आपण सतत इंटरेस्टेड राहतो.

‘तेरी भी चूप’ हा एक फार्स आहे. फार्स प्रकार खरं तर त्यातील कलाकारांच्या कामगिरीतून फुलते. विजय केंकरे हे याबाबतीत मराठी रंगभूमीचे यश चोप्रा आहेत हे मी पूर्वीचं लिहिलं आहे. त्यांच्या नाटकात ते म्हणतील ते कलाकार काम करायला तयार असतात. ‘तेरी भी चूप’ची गोष्ट काही वेगळी नाही. इथे हृषिकेश जोशी आणि प्रियदर्शन जाधव हे दोन आघाडीचे नट आहेत. या दोघांना मी विनोदी कलाकार म्हणण्याचं मुद्दामहून टाळलं आहे. कारण हे दोघे उत्तम अभिनेते आहेत. प्रत्येक प्रकारचा अभिनय हे दोघे साकारू शकतात हे त्यांनी याआधी बऱयाचदा सिद्ध केलंय. एखादं नाटक, भूमिका किंवा टीव्ही शो लोकांना आवडला की, कलाकारावर शिक्का बसण्याची वाईट पद्धत आपल्याकडे आहे. हृषिकेश जोशी आणि प्रियदर्शन जाधव हे दोघे केवळ विनोदवीर नाहीत आणि म्हणून हे दोघे ‘तेरी भी चूप’ या नाटकाला अजिबात ओव्हर द टॉप न जाता संयत अभिनय करून फार्स सादर करतात हा या नाटकाचा खरा USP आहे. फार्स हा प्रकार अतिरंजित असतो. त्यात सगळंच एक्साजरेटेड असावं असा पायंडा आहे. ‘तेरी भी चूप’मध्ये हे दोघे नाटकाच्या कथानकाची नाडी ओळखून हात राखून रिआक्ट होत राहतात आणि त्यामुळे नाटक अधिकाधिक भावत जातं. रुजुता हे एक प्लॅस्टिकच्या जपानी बाहुलीसारखं पात्र सुखदा खांडकेकर अत्यंत सहजपणे सादर करते. ती खोटी वागते, पण ती खोटी वाटत नाही ही गंमत आहे. मयुरा पालंडे हृषिकेशच्या बायकोची भूमिका यथासांग पार पाडते. आपल्या व्यक्तिमत्त्वाचा पुरेपूर वापर तिने ‘तेरी भी चूप’मध्ये केलेला दिसतो.

प्रवेश ही विजय केंकरे यांची नाटय़ संस्था. या संस्थेच्या आजवरच्या सर्व नाटकांची तांत्रिक अंगं ही चोख होती. ‘तेरी भी चूप’मध्ये हेच पुन्हा एकदा अनुभवायला मिळतं. संदेश बेंद्रे यांनी एका उच्चभ्रू मराठी घराचं नेपथ्य खूप डिटेल्ड केलेलं आहे. घरातल्या दारूच्या कपाटात जॉनी वॉकर डबल ब्लॅकसारख्या बाटल्या दाखवून जिथे घराचं कॅरेक्टर दिसतं तिथेच किचनच्या दर्शनी भागात एकही भांडं न दाखवून राहणाऱयांच्या एकूण संबंधांबद्दल भाष्यही केलं जातं. अजित परबचं संगीत, शीतल तळपदे यांची प्रकाश योजना आणि मंगल केंकरे यांची वेशभूषा ‘तेरी भी चूप मेरी भी चूप’ला अधिक परिणामकारक बनवते. सतीश मोतलिंग निर्मित प्रवेश सादर करीत असलेला हा अस्सल फ्रेंच फार्स खरोखर आपल्याला आपल्या आयुष्यातले ते काही क्षण आठवायला लावून खदाखदा हसवणारा अनुभव आहे.

नाटक – तेरी भी चूप
सादरकर्ते – प्रवेश, मोतलिंगज्
निर्माते – सतीश मोतलिंगज्
विशेष आभार- परेश रावल
लेखक – तेजस रानडे
नेपथ्य – संदेश बेंद्रे
संगीत – अजित परब
प्रकाश – शीतल तळपदे
वेशभूषा – मंगल केंकरे
रंगभूषा – संदीप नगरकर, प्रदीप दर्णे
दिग्दर्शक – विजय केंकरे
कलाकार- सुखदा खांडकेकर, मयुरा रानडे, प्रियदर्शन जाधव, हृषिकेश जोशी
दर्जा – अडीच स्टार