आमने सामने  – नव्या जुन्याचा सुरेख मेळ

2593

>> क्षितिज झारापकर  

‘आमने सामने’ मंगेश आणि लीना या रिअल लाइफ जोडीचे कोरे करकरीत नाटक. आजच्या आणि पन्नाशीतल्या पिढीचा एक संतुलित मेळ.

अलीकडे चित्रपटांची पटकथा वेगळ्या स्वरूपाची होऊ लागली आहे. नवीन पिढीची गोष्ट सांगण्याची पद्धत बदलली आहे. नव्या रूपात आधी घटना दाखवतात आणि मग त्या बाबतीतली गोष्ट आणि त्या घटनेची उकल केली जाते. याने कथेचं सादरीकरण अत्यंत वेगवान होतं जे नवीन पिढीला भावतं. एकूणच नाटक-सिनेमा हे सभोवतालच्या समाजमानाचा आरसा असतो. त्यामुळे त्यात समाजाचा अंतर्गत वेग आपोआपच समाविष्ट असतो. म्हणूनच आपल्याला जुने चित्रपट संथगतीचे वाटतात आणि तीनअंकी नाटकं पाहण्याचे पेशन्स आपल्याकडे आज नाहीत. एखादं हॅम्लेट किंवा हिमालयाची सावली याला अपवाद असू शकतं, पण एकंदरीत जगाबरोबरचं प्रेक्षक म्हणून आपला अंतर्गत वेग वाढत जातो आणि मग आपण अशा वेगवान सादरीकरणात खूश होतो. हे चित्रपटांच्या बाबतीत सर्रास होऊ लागलं असलं तरी नाटकांच्या बाबतीत मात्र पहिल्यांदाच असा प्रयत्न होतोय. अवनीशतर्फे नाटक मंडळी निर्मित आणि अथर्व प्रकाशित ‘आमने सामने’ हे नाटक अशा थाटाचं सादरीकरण घेऊन उभं राहिलंय.

नीरज शिरवईकर लिखित आणि दिग्दर्शित ‘आमने सामने’ हे क्रिन प्ले पद्धतीने लिहिलेलं नाटक आहे. त्यामुळे प्रसंगांचं सुरू होणं आणि संपणं हे नाट्यशास्त्राच्या चौकटीत बसणारं नाहीये. नीरजने इथेच ‘आमने सामने’ला वेगळेपण बहाल केलेलं आहे. हा क्रिन प्ले फॉर्म चपखल बसेल हे साधण्यासाठी त्याने हुशारीने पारंपरिक नटी सूत्रधार या संवादक जोडीची मदत घेतली आहे. त्यामुळे होतं काय की नीरज चालू असणारा प्रसंग हव्या त्या नाट्यमय उच्च बिंदूवर अचानकपणे संपवू शकतो आणि या सूत्रधारांच्या माध्यमातून नाट्यकथा पुढच्या भागाकडे सरकवू शकतो हे खूपच विचार करून केलेलं आहे. नीरजला यासाठी पैकीच्या पैकी मार्क. एकासाठी गाठलेल्या दाम्पत्याच्या एका टॉवरच्या एकाच मजल्यावर असलेल्या दोन आमने सामने फ्लॅटस्ची ही गोष्ट. एकात दाम्पत्य स्वतः राहतं आणि एक ते भाडय़ाने देतं. भाडेकरू हे त्यांच्या कठोर नियमावलीत बसणारं, नवीन पिढीतलं जोडपं आहे. दोन पिढ्यांच्या विचारांतील फरकांचा हा रंजक खेळ आहे. तो खेळ मांडण्याचा खटाटोप अत्यंत फ्रेश अणि मजेदार आहे. दिग्दर्शनात नीरजने संपूर्ण रंगमंच वापरून हा खेळ उभारला आहे. पहिल्या अंकात तरुण फ्लॅटचा दिवाणखाना आणि फ्लॅटबाहेरील लिफ्टची लॉबी आणि दुसर्‍या अंकात प्रौढ फ्लॅटचा सरंजामशाही दिवाणखाना आणि फ्लॅटबाहेरील लिफ्टची लॉबी असा ‘आमने सामने’ या नाटकाचा घाट आहे.

प्रदीप मुळये यांनी खूप डिटेल असलेला सेट ‘आमने सामने’साठी तयार केलाय. तरुण फ्लॅटच्या दिवाणखान्यातल्या बीन बॅग्ज ज्या जोशी काकांना बसायला त्रास देतात त्या असोत किंवा प्रौढ फ्लॅटमधली जोशी काकांची नेहमीची लाकडी आरामखुर्ची ज्यावर जोशी काकू चुकूनही कधी बसत नाहीत ती असो, प्रदीप मुळ्येंचं डिटेलिंग ‘आमने सामन’ला अधिक दृष्यात्मक बनवतं हेच डिटेलिंग दिग्दर्शनात दिसतं. जोशी काकू बोलता बोलता सुपर मार्केटमधून आणलेलं सामान लावताना किंवा जोशी काका रागावून रद्दी पेपर बांधताना डिटेलिंग सुरेख वाटतं. विजय गवंडेचं संगीतदेखील योग्य ठिकाणी योग्य संगीत योजून हे डिटेलिंग अधोरेखित करतं. रवी करमरकर यांची प्रकाशयोजना परिणामकारक झाली आहे. अमिता खोपकर यांची वेशभूषा आणि अभय मोहिते यांची रंगभूषादेखील पूरक आहे.

‘आमने सामने’मध्ये जोशी दाम्पत्य रंगवलंय ते मंगेश कदम आणि लीना भागवत या खरोखरच्या दाम्पत्याने. त्यामुळे त्यांच्यातली केमिस्ट्रीही मस्त जमली आहे. मंगेश कदम हे स्वतः मातब्बर दिग्दर्शक आहेत. ते नाटकाचा सर्वांगीण विचार करू शकतात. असा रंगकर्मी नाटकात नट म्हणून असणं हा एक प्लस पॉइंट आहे. शिवाय ते नाटक मंडळी या ‘आमने सामने’च्या निर्मिती संस्थेचे सर्वेसर्वा आहेत. कदम यांचे जोशी काका एकाच वेळी भाबडे, खाष्ट, संवेदनशील आणि अविचल असे सगळंच वाटतात. लीना भागवत यांच्या जोशी काकू सुरुवातीपासूनच तरबेज आणि युक्तिखोर आहेत. सत्तरीच्या दशकातल्या बायका ज्यांना स्त्री मुक्तीची सुरुवात दिसत होती त्या आज वुमन्स एम्पॉवरमेन्टपर्यंत प्रवास केल्यावर जशा मिश्किलपणे पोक्त वाटतात तशा या जोशी काकू आहेत. मंगेश आणि लीना आपल्या समर्थ खांद्यांवर ‘आमने सामने’ पेलून धरतात. रोहन गुजर हा नवीन तरुण नट ‘आमने सामन’मध्ये साहिलची भूमिका करतो. साहिल एक लेखक आहे. त्यामुळे काम आणि मिळकत यांची वानवाच आहे. हे वैफल्येशन रोहन नाटकात कमालीच्या सहजतेने दाखवतो. अशोक पालेकरांच्या बालनाट्यांतून रंगभूमीवर आलेला रोहन गुजर ‘आमने सामने’मध्ये एक पोक्त कलाकार झालेला दिसतो. ‘आमने सामने’मध्ये सर्वात वेलडिफाइन्ड पात्र आहे ते समिराचं. मधुरा देशपांडे ही कलाकार समिरा मूर्तिमंत उभी करते. याआधीच्या तिच्या मी ऍण्ड मिसेस लांडगे या नाटकातही मधुरा लक्षणीय होती. मधुराने आजच्या पिढीतल्या मुलीचा ऍटिटय़ूड खूपच प्रभावशाली पद्धतीने ‘आमने सामने’मध्ये आणलेला आहे. आपल्या प्रत्येक रिऍक्शनमधून मधुरा हा ऍटिटय़ूड समोर आणते आणि समोरच्या प्रेक्षकांना जे पटणार नाही ते त्यांच्या पचनी पाडते. विशेषतः जेव्हा लिखाणातच हे गृहीत धरलेलं आहे की, मराठी नाटकाचा प्रेक्षकवर्ग हा साधारण पन्नाशीच्या पुढचा आहे. प्रेक्षकातले बहुतांश लोक हे जोशी काका-काकूच आहेत. तेव्हा मधुराचं हे साध्य करणं खरोखर कौतुकास्पद आहे.

संतोष भरत काणेकर, लीना भागवत आणि महेश ओवे यांनी एक परिपूर्ण व अत्यंत मनोरंजक नाटक मराठी रंगभूमीवर आणल्याबद्दल त्यांचं अभिनंदन.

 

नाटक         आमने सामने

निर्मिती      अवनीश, नाटकमंडळी, अथर्व प्रकाशित

निर्माते        लीना भागवत, संतोष काणेकर, महेश ओवे

नेपथ्य         प्रदीप मुळय़े

संगीत         विजय गवंडे

प्रकाश         रवी करमरकर

वेशभूषा       अमिता खोपकर

रंगभूषा       अभय मोहिते

केशभूषा      मिनल लांडगे

व्यवस्थापक  निरंजन जाधव

सूत्रधार       दिगंबर प्रभू

लेखक, दिग्दर्शक          नीरज शिरवईकर

कलाकार      मधुरा देशपांडे, लीना भागवत, रोहन गुजर, मंगेश कदम

दर्जा           ***

 

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या