
सामना प्रतिनिधी, डोंबिवली
डोंबिवलीत रिक्षाचालकांनी मनमानी भाडेवाढ केल्याने प्रवाशांमध्ये संताप आहे. वाहतूक पोलीस, आरटीओ यांची परवानगी न घेता पहिल्या टप्प्यासाठी आठ रुपयांऐवजी दहा रुपये भाडेवाढ केली आहे. बेकायदा भाडेवाढ होऊनही आरटीओ काहीच कारवाई करत नसल्याने प्रवासी संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे.
डोंबिवलीत पहिल्या टप्प्यासाठी आठ रुपये भाडे असताना महिनाभरापासून दहा रुपये भाडे उकळले जात आहे. प्रवासी व रिक्षाचालक यांच्यामध्ये यामुळे संघर्ष होऊ लागला आहे. प्रवाशांनी मनमानी भाडेवाढीविरुद्ध वाहतूक पोलिसांकडे तक्रार केली, पण काही उपयोग झाला नाही. लाल बावटा रिक्षा युनियनचे अध्यक्ष काळू कोमास्कर यांनी शहरात भाडे दरपत्रक लावले आहे. मात्र असे फलक आरटीओने लावणे आवश्यक असताना युनियनने का लावले असा प्रश्न प्रवासी विचारत आहेत.
शिवसेना रिक्षा चालक-मालक युनियनचे कार्याध्यक्ष संजय मांजरेकर यांना विचारले असता पहिला टप्पा दीड किलोमीटरचा असून यासाठी आठ रुपयेच भाडे असून यामध्ये कोणतीही वाढ झालेली नसल्याचे सांगितले. आरटीओ अधिकारी संजय ससाणे, वाहतूक शाखेचे सतीश जाधव यांना रिक्षाचालक, प्रवासी यांच्या प्रश्नासंदर्भात काहीच सोयरसूतक नसल्याचा आरोपही त्यांनी केला.


























































