अपयशी पंतचे संघातील स्थान धोक्यात

837
rishabh-pant

टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतचा फलंदाजीतला ढासळलेला फॉर्म हा हिंदुस्थानी संघासाठीचा चिंतेचा विषय ठरला आहे. विश्वचषकात हिंदुस्थानी संघाचे आव्हान संपुष्टात आल्यानंतर बीसीसीआय राष्ट्रीय निवड समितीने आगामी टी-20 विश्वचषकासाठी ऋषभला पसंती देणार असल्याचं स्पष्ट केले. यानंतर वेस्ट इंडिज दौऱयात पंतला तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये संधी देण्यात आली, मात्र फलंदाजीमध्ये त्याने पुरती निराशा केली. आफ्रिकेविरुद्ध दुसऱया सामन्यातही ऋषभ चुकीचा फटका खेळून लवकर माघारी परतला. रिषभची ही कामगिरी पाहता, निवड समितीने पर्याय शोधायला सुरुवात केली आहे. निवड समितीचे प्रमुख एम.एस.के. प्रसाद यांनी एका प्रमुख इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना हे उघड केले.

नेटकऱ्यांकडूनही टीकेचे आसूड
डावखुरा युवा फलंदाज रिषभ पंतकडून क्रिकेटशौकिनांना मोठय़ा अपेक्षा आहेत. पण गेले काही महिने तो बेजबाबदार फटके मारून आपली विकेट बहाल करीत असल्याने सर्वांचा राग त्याने ओढवून घेतला आहे. त्याचा खेळ पाहून त्याच्यात काही सुधारणा होतेय असे वाटत नाही असे नेटकऱ्यांनी त्याच्यावर टीकेचे आसूड ओढताना सोशल साईट्सवर म्हटले आहे.

गेल्या नऊ टी-20 डावांतील पंतचा फ्लॉप शो
या 2019 मध्ये रिषभ पंत याने नऊ टी-20 लढतीत फलंदाजी केलीय. त्याची धावा जमविण्याची कामगिरी 4, नाबाद 40, 28, 3, 1, 0, 4, नाबाद 65 आणि 4 धावा अशी झाली आहे. अर्थात ही कामगिरी समाधानकारक नसल्याने पंत सध्या तरी डेंजर झोनमध्ये असल्याचे संकेत मिळत आहेत. कारण नऊ टी-20 डावांत पंतने केवळ 149 धावांची बेगमी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या