चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी कधीही तयार – रिषभ पंत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

‘मला चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करायला आवडते. माझ्यासाठी ही गोष्ट नवीन नाहीय. याआधीही मी आयपीएमध्ये चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलो आहे. आता मी या जागेसाठी सरावही करत आहे. कोणत्याही एका शैलीत खेळणे मला आवडत नाही. लढतीत गरज असेल तसे खेळण्याचा माझा प्रयत्न असतो, अशा शब्दांत टीम इंडियाचा नवोदित यष्टिरक्षक-फलंदाज रिषभ पंत याने संघातील चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजीसाठी आपली दावेदारी एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत केली.

विडींज दौऱयाआधीही टीम इंडियात चौथ्या क्रमांकावर फलंदाजी कोण करणार हा प्रश्न सुटलेला नाही. विश्वचषकात न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीत हिंदुस्थानी संघाला त्याचा जबर फटकाही बसला. मात्र महेंद्रसिंह धोनीच्या अनुपस्थितीत हिंदुस्थानी संघात जागा मिळालेल्या यष्टिरक्षक रिषभ पंतने आपण चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी सज्ज असल्याचे म्हटले आहे.