रविंद्र जडेजाची पत्नी रिवाबाने भांडणाच्या व्हायरल व्हिडीओनंतर दिली पहिली प्रतिक्रिया

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा स्टार ऑलराऊंडर खेळाडू रविंद्र जडेजा याची पत्नी रिवाबा जडेजा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गुजरात विधानसभा जामनगर मतदार संघाच्या आमदार रिवाबा जडेजा, भाजपा खासदार पुनम मादाम आणि महापौर बीना कोठारी यांच्यात शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. या तिघींच्या भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आमदार रिवाबा जडेजा यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली.

लखोटा येथे पालिकेतर्फे शहिदांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमादरम्यान जडेजा, मादाम व कोठारी यांच्यामध्ये शाब्दिक चकमक उडाली. शहिदांना श्रद्धांजली वाहत असताना खासदार पुनम मादाम यांनी चप्पल घातली होती. मात्र रिवाबा जडेजा यांनी श्रद्धांजली वाहताना चप्पल काढली. यावेळी मादाम यांनी “पंतप्रधान आणि राष्ट्रपती देखील अशा कार्यक्रमांना चप्पला काढत नाहित. मात्र ज्यांना काहीच कळत नाही असे लोक अतिहुशार असल्याचा आव आणत चप्पल काढून दिखाऊपणा करतात.” असे म्हणाल्या.

हा माझ्या आत्मसन्मानाचा प्रश्न

रिवाबा जडेजा यांनी याप्रकरणावर आपले मत मांडले आहे. ‘मी तेथे चप्पल काढून श्रद्धांजली वाहिली, त्यावेळी मादाम यांनी माझ्या चप्पल काढण्यावरून मला जे सुनावलं ते बोलणे मला पटले नाही. माझ्या आत्मसन्मानाचा मुद्दा उपस्थित झाल्याने मी त्यांना त्यांचे वागणे चुकीचे असल्याचे सांगितले. असे वक्तव्य रिवाबा जडेजा यांनी केले आहे.