देशात गेल्या वर्षी रस्ते अपघातांमध्ये 72 हजार तरुणांचा बळी

709

देशात 2018 या वर्षात 72 हजारांवर तरुण दगावले. दरवर्षी 1600 लष्करी जवानांचा मृत्यू रस्ते अपघातांमध्ये होतो. दर सहापैकी एकाचा मृत्यू हा डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने होतो. न्युरोलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाने (एनएसआय) आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय रस्ते सुरक्षा परिषदेमध्ये न्युरोसर्जन्सनी ही धक्कादायक आकडेवारी सादर करून चिंता व्यक्त केली.

जगामध्ये रस्ते अपघातांमध्ये सुमारे पाच कोटी लोकांना गंभीर दुखापत होते. त्यातील बहुतांश लोक हे कायमचे अपंग होतात. हिंदुस्थानात रस्ते अपघातांमध्ये जखमी होणाऱयांमध्ये सर्वाधिक हे 18 ते 35 वयोगटातील तरुण असतात. याबद्दल हिंदुजा रुग्णालयाचे न्युरोसर्जन डॉ. केतन देसाई यांनी चिंता व्यक्त केली. 2018 मध्ये रस्ते अपघातांमध्ये 72 हजार 737 तरुणांचा मृत्यू झाला अशी आकडेवारीही त्यांनी दिली. जगातील 199 देशांमध्ये हे सर्वाधिक मृत्यू हिंदुस्थानातील आहेत असे या परिषदेचे अध्यक्ष डॉ. बी. के. मिश्रा यांनी सांगितले.

रस्ते अपघातांमधील 70 टक्के जखमींचा मृत्यू हा डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने होतो. अमेरिकेमध्ये हा आकडा दर 200 जखमींमागे एक असा आहे. डोक्याला मार लागल्याने मेंदूला दुखापत होण्याची शक्यता अधिक असते. अशा जखमींना अपघातानंतर एका तासाच्या आत रुग्णालयात नेल्यास त्यांचा जीव वाचवता येऊ शकतो. पण सुमारे 24 टक्के रुग्णांना इतक्या वेळेत रुग्णालयात पोहचवणे शक्य होत नाही. प्रथमोपचारही न मिळाल्याने 20 टक्के जखमी दगावतात अशी माहिती या परिषदेमध्ये एशियन-ऑस्ट्रेलियन काँग्रेस ऑफ न्युरोलॉजिकल सर्जन्सचे अध्यक्ष डॉ. वीरेंद्र सिन्हा यांनी दिली.

देशभरात एकच आपत्कालीन नंबर करा!
रस्ते अपघात झाल्यास मदत मिळवण्यासाठी देशभरात एकच आपत्कालीन नंबर केला पाहिजे अशी मागणी यावेळी मुंबईचे न्युरोसर्जन डॉ. सुरेश सांखला यांनी केली. देशातील प्रत्येक राज्यात ऍम्ब्युलन्सचा नंबर वेगवेगळा आहे. परदेशांमध्ये ऍम्ब्युलन्स नंबर एकच असतो असे त्यांनी सांगितले.

देशात 132 कोटी लोकसंख्येमागे फक्त 3 हजार न्युरोसर्जन्स
अमेरिकेमध्ये दर तीन हजार लोकसंख्येमागे एक न्युरोसर्जन आहे. हिंदुस्थानात मात्र 40 लाख लोकांमागे एक न्युरोसर्जन आहे. म्हणजेच देशातील 32 कोटी लोकसंख्येमागे फक्त तीन हजार न्युरोसर्जन आहेत असे ‘एनएसआय’चे अध्यक्ष डॉ. के. श्रीधर यांनी सांगितले.

देशात चार लाखांवर अपघातात दीड लाखावर मृत्यू
2018 मध्ये देशभरात 4 लाख 67 हजार 44 रस्ते अपघात झाले. त्यात 1 लाख 51 हजार 417 लोकांचा मृत्यू झाला तर 4 लाख 69 हजार 418 लोक जखमी झाले. म्हणजेच दर तासाला 53 अपघातांमध्ये 17 जणांना प्राण गमवावे लागले. एकूण रस्ते अपघातांपैकी 1 लाख 64 हजार 313 अपघात दुचाकींचे होते. त्यात 47 हजार 560 लोकांचा मृत्यू झाला तर 1 लाख 53 हजार 585 लोक जखमी झाले. महाराष्ट्रात 35,717 अपघातांमध्ये 13,261 लोकांचा मृत्यू झाला.

आपली प्रतिक्रिया द्या