
सामना प्रतिनिधी, नांदेड
जिल्ह्यातील उमरी (बा) तालुका किनवट येथील विनापरवाना बाल गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणूकीतील डीजे ताब्यात घेतल्याने संतप्त भक्तांनी चार तासांचा रास्ता रोको करून पोलीस प्रशासनावर रोष व्यक्त करीत ताब्यात घेतलेला डीजे परत देईपर्यंत पोलीस प्रशासनाला धारेवर धरले. या कृतीविरूध्द वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली निश्चितच होणार असून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नागरीकांनी मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा सन्मान राखून पोलीस प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.
मांडवी पोलीसांकडून प्राप्त माहितीनुसार किनवट तालुक्यातील उमरी बाजार येथे एका विनापरवाना बाल गणेश मंडळाची विसर्जन मिरवणूक शनिवारी सुरू होती. सदरचे बाल गणेश मंडळाच्या परवानगीसाठी सदर मंडळाने मांडवी पोलीस ठाण्यात नोंद करून कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली असल्याची नोंद मांडवी पोलीस ठाण्यात नाही. असे असतानादेखील सदर मंडळाच्या गणेश विसर्जनाच्या मिरवणूकीत मोठ्या आवाजात डीजे सुरू असल्याबाबतची तक्रार काही नागरीकांनी मांडवी पोलीसांकाडे केली. त्यानुसार शनिवारी दुपारी १ वा. च्या दरम्यान उमरी येथील मुख्य चौकात मांडवी पोलीसांनी सदरचा विनापरवाना डीजे ताब्यात घेतला. यामुळे पोलिसांविरूद्ध गणेश भक्तांनी रोष व्यक्त करीत सारखणी मांडवी मुख्य रस्त्यावर तब्बल चार तासांचा अचानक रास्ता रोको करून प्रशासनास वेठीस धरले. गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करीत जोपर्यंत डीजे परत देणार नाही तोपर्यंत रस्ता मोकळा करणार नाही. व विसर्जनही करणार नाही असा पवित्रा घेतल्याने वातावरण तणावग्रस्त बनले होते.
दरम्यान प्रकरणाचे गांभीर्य ओळखून माजी जि.प.सदस्य बंडू नाईक, नितीन नाईक, देवेंद्र तिवारी, तंटामुक्ती अध्यक्ष कोटरंगे, उमरीचे उपसरपंच अरूण मडावी, जिवन कोटरंगे, गणेश पडगीलवार व गजानन जाधव आदींनी गणेश भक्तांना शांत करण्याचा प्रयत्न केला. परंतु परिस्थिती अधिकच हाताबाहेर जात असल्याचे पाहून मदतीसाठी धावून आलेले सिंदखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मल्हार शिवरकर व सहकाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले. त्याबरोबरच माहूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी आसाराम जहारवाल यांनीही उमरी येथे भेट देऊन प्रकरणाची माहिती घेतली. दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मांडवी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक केंद्रे यांनी दुपारी ५ वा.च्या दरम्यान जप्त केलेला डीजे परत दिला. तथापि डीजेच्या तालात पुन्हा गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीस सुरुवात होऊन विसर्जन करण्यात आले.
“उमरी बाजार येथे आम्ही गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता कमेटीची बैठक घेऊन मा. सर्वोच्च न्यायालयाच्या डीजे न वाजविण्याबाबतच्या निर्णयाची माहिती दिली होती. परंतु येथील एका गणेश मंडळाने विनापरवाना डीजे लावला त्यामुळे आम्ही संबंधितांना समज देऊन सदरचा डीजे ताब्यात घेतला होता. परंतु बाल गणेश मंडळाच्या नावाखाली मोठ्यांनीच पोलीस प्रशासनाला वेठीस धरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला. हा प्रकार अत्यंत गंभीर असून वरिष्ठांच्या मार्गदर्शनात निश्चितच कारवाई केली जाईल. अशा घटनांतून मिरवणुकींना गालबोट लागू नये त्याबरोबरच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा सन्मान राखण्यासाठी सर्व गणेश मंडळाबरोबरच नागरीकांनीही पोलीस प्रशासनास सहकार्य करणे गरजेचे आहे, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.
summary-road blocked by citizen to support dj in nanded



























































