
केंद्र सरकारने रस्ते अपघातावर नियंत्रण ठेवण्यासाठी 18 जानेवारी ते 17 फेब्रुवारी 2021 दरम्यान 32 व्या ‘रस्ता सुरक्षा महिना-2021 चे आयोजित करण्यात आला आहे. याची पूर्वतयारी म्हणून 1 जानेवारी ते 17 जानेवारी 2021 दरम्यान राज्यातील सर्व आरटीओ विशेष तपासणी मोहीम राबविणार आहेत.
रस्ते अपघात नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र सरकारने रस्ता सुरक्षा अभियान आयोजनाच्या निमित्ताने विविध विभागांना विशेष उपक्रम राबविण्याच्या सूचना केल्या आहेत. रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत विविध कार्यक्रम आणि उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या वतीने याचे आयोजन करण्यात येणार आहे. 18 जानेवारीपासून सुरू होणाऱया रस्ता सुरक्षा महिन्याची तयारी म्हणून 1 जानेवारी ते 17 जानेवारीदरम्यान विशेष तपासणी मोहिमेचे आयोजन आरटीओमार्फत करण्यात येणार आहे. यात विनाहेल्मेट दुचाकी चालविणे, वाहन चालविताना सीट बेल्ट न वापरणे, ओव्हर स्पीडिंग, रिफ्लेक्टिव्ह टेप न वापरणे, अवैध प्रवासी वाहतूक, वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणे, प्रवासी वाहनातून मालवाहतूक करणे, भारक्षमतेपेक्षा जादा वाहतूक करणे आदी नियमांचे पालन होत आहे की नाही याची तपासणी होणार आहे.
…तर लायसन्स निलंबित होणार
- जास्त वगाने वाहन चालविणे
- लाल सिग्नल ओलांडणे
- क्षमतेपेक्षा मालाची वाहतूक करणे
- मद्यप्राशन करून वाहन चालविणे
- वाहन चालविताना मोबाईल वापरणे


























































