Latur News – लातूर जिल्ह्यात पावसाने उडवली दाणादाण, अनेक ठिकाणी नागरिकांचे स्थलांतर; रस्ते वाहतूक ठप्प

जिल्ह्यात 24 तासांमध्ये केवळ 62.8 मिली मिटर सरासरी पाऊस झाला. परंतु या पावसामुळे जिल्ह्यात दाणादाण उडाली आहे. निवासी भागात पाणी शिरल्याने अनेक नागरिकांना स्थलांतर करावे लागले आहे. सुदैवाने जीवितहानी झाली नाही पण शेत शिवाराचे मोठं नुकसान झालेले आहे. जिल्ह्यातील तब्बल 49 ठिकाणी रस्ते वाहतूक ठप्प झाली. या शिवाय अनेक ठिकाणी शेतरस्ते बंद झाले.

अहमदपूर तालुक्यातील मौजे थोडगा या गावामधील पुलावरून पाणी वाहत आहे. तसेच 4 घरामध्ये पाणी गेल्यामुळे तेथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. जळकोट तालुक्यातील मौजे बेलसंगवी गावातील काही लोक लाळी येथे स्थलांतरित करणे सुरु आहे. तिरु प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे या गावाचा संपर्क तुटण्याची शक्यता आहे.

अहमदपूर तालुक्यातील मौजे हासरणी येथील 30 ते 40 घरामध्ये पाणी शिरले असून तेथील कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. चापोली येथील नागरिकांना शाळेत हलवले आहे. वडवळ नागनाथ येथे अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. शाळा, ग्रामपंचायत कार्यालयात, घरांमध्ये, शेत शिवारातून पाणी वाहत आहे. शिरूर अनंतपाळमधील नदीच्या पलीकडं शेडमध्ये अडकलेल्या तीन व्यक्तींना सुखरूप पुराच्या पाण्यातून काढण्यात आले आहे.