चोरीचा प्रयत्न जिवावर बेतला, चौघांच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पहाटेच्या सुमारास पत्र्याच्या शेडमध्ये घुसून चोरीचा करण्याचा प्रयत्न एका तरुणाच्या जीवावर बेतला. तरुणाला रंगेहाथ पकडून चौघांनी जबर मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा अखेर मृत्यू झाला. मुलुंड पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.

मुलुंड पश्चिमेकडील अमरनगर पाइपलाइन परिसरात बुधवारी पहाटे 5.30 च्या सुमारास ही घटना घडली. त्या ठिकाणी मजुरांसाठी पत्र्याचे शेड उभारण्यात आले आहेत. एका शेडमध्ये चौघेजण राहत होते. त्यापैकी एकजण लघुशंकेसाठी बाहेर गेलेला असताना रफिक शेख (28) हा तरुण चोरीच्या उद्देशाने शेडमध्ये घुसला. तेवढय़ात लघुशंकेसाठी गेलेला तरुण परतला आणि त्याच्या नजरेस रफिक पडला. तेव्हा आरडाओरड झाल्याने उर्वरित तिघेही उठले आणि चौघांनी मिळून लाकडी बांबू आणि लाथाबुक्क्यांनी रफिकला जबर मारहाण केली. या मारहाणीमुळे रफिकचा मृत्यू झाला. याप्रकरणी मुलुंड पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली आहे.