
पुणे शहर परिसरातून तडीपार केल्यानंतरही शहरात वास्तव्य करीत गुन्हे करणार्या सराईताला समर्थत पोलिसांच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून चोरीचा एक टेम्पो, रिक्षा असा मुद्देमाल जप्त करीत तीन गुन्हे उघडकीस आणले आहेत. आरोपीवर यापुर्वी तब्बल 20 हून अधिक गुन्हे दाखल असून रस्त्याने पायी जाणार्या माणसाला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने अडवून तो लुटमार करायचा. समर्थ पोलिसांनी तांत्रिक तपास करून त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. निखील उर्फ दादा शशिकांत कांबळे (22, रा. हडपसर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
पादचार्याला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने लुटल्याची घटना समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. या गुन्ह्याचा तपास पोलिसांकडून सुरु होता. या दरम्यान पोलिसांनी तांत्रिक तपासावरून कांबळेला एम.डी. कॅम्प चौक परिसरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने गुन्हा केल्याची कबूली दिली. त्याला पोलीसी खाक्या दाखविताच त्याने समर्थ पोलिसांच्या हद्दीतून एक टेम्पो व विश्रामबाग पोलिसांच्या हद्दीतून एक रिक्षा चोरल्याचे कबूल केले. त्याच्याकडून पोलिसांनी एक टेम्पो, रिक्षा असा मुद्देमाल जप्त करून तीन गुन्हे उघडकीस आणले आहेत.
कांबळे याच्यावर शहर परिसरात चोरी, लुटमार केल्याप्रकरणी तब्बल 20 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी त्याला पुणे शहर आणि जिल्ह्याच्या हद्दीतून तडीपार करण्यात आले होते. मात्र, या कारवाईनंतर देखील तो शहरात वास्तव्य करीत होता. समर्थ पोलिसांनी तपास करून अखेर त्याला जेरंबद केले. समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रमेश साठे, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक प्रसाद लोणारे, अंमलदार शाम सुर्यवंशी, हेमंत पेरणे, रहीम शेख, दत्तात्रय भोसले, अर्जुन कुडाळकर, जितेंद्र पवार यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.
रस्ताने जाणार्या पादर्याला अडवून पत्ता विचारण्याच्या बहाण्याने कांबळेने लुटमार केली होती. तसेच, त्याने येथून टेम्पो, रिक्षाची केलेली चोरी उघडकीस आणली असून दोन्ही वाहने जप्त केली आहेत.
– रमेश साठे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, समर्थ पोलीस ठाणे



























































