रॉबर्ट वढेरा यांची नवव्यांदा चौकशी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
robert-vadra

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

मनी लाँडरिंगप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरुवारी रॉबर्ट वढेरा यांची नवव्यांदा चौकशी केली. त्यासाठी काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्यासह त्यांचे पती रॉबर्ट वढेरा ईडीच्या कार्यालयात गुरुवारी पोहोचले. वढेरा यांनी जमवलेली अफाट संपत्ती आणि जमीन खरेदी याप्रकरणी ईडी त्यांची कसून चौकशी करत आहे. नवव्या चौकशीसाठी त्यांना बुधवारीच ईडीने नोटीस पाठवून बोलावून घेतले होते. या चौकशीत त्यांनी लंडन, एनसीआर आणि बिकानेरसहीत आणखीही बऱ्याच ठिकाणी खरेदी केलेल्या जमिनीबाबत विचारणा करण्यात आली.

ईडीच्या कार्यालयात जाण्यापूर्वी रॉबर्ट वढेरा यांनी फेसबुकवर लिहिले की, वेगवेगळ्या तपास यंत्रणांनी आतापर्यंत माझी 11वेळा चौकशी केली. ही चौकशी एकूण 70 तासांहून जास्त झाली आहे. मला न्यायपालिकेवर भरवसा आहे. जोपर्यंत माझ्यावरील प्रत्येक आरोप बिनबुडाचा ठरत नाही, तोपर्यंत मी तपासात सहयोग करत राहीन. आपल्या या वक्तव्यासोबत वढेरा यांनी माजी पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांचे छायाचित्र जोडले आहे. वढेरा यांनी लंडनमध्ये 10 लाख 90 हजार पाऊण्ड किमतीची संपत्ती खरेदी केली आहे.