रॉजर फेडररची फेंच ओपनमधून माघार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्वित्झर्लंडचा महान टेनिसपटू रॉजर फेडरर याने अखेर फ्रेंच ओपन या टेनिस ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेमधून माघार घेतली. तिसऱया फेरीदरम्यान रॉजर फेडररची गुडघ्याची दुखापत बळावली. त्याचप्रसंगी या टेनिसपटूने स्पर्धा अर्धवट सोडण्याचे संकेत दिले होते. अखेर रॉजर फेडररने रविवारी उर्वरीत स्पर्धा न खेळण्याचा निर्णय घेतला. मात्र वाढते वय व फिटनेस रॉजर फेडररला साथ देत नसल्याचे प्रकर्षाने दिसून येत आहे.

साडेतीन तासांच्या लढतीत दमला

आठवे मानांकन असलेला रॉजर फेडरर आणि 47वे मानांकन असलेला क्रोएशियाचा डॉमिनिक कोएफर यांच्यातील लढत तीन तास 35 मिनिटांपर्यंत चालली. चुरशीच्या या लढतीत फेडररने 7-6(7-5), 6-7(4-7), 7-6(7-4), 7-5 अशी बाजी मारली. चारपैकी तीन सेट ट्रायबेकरमध्ये गेले, यावरून लढत किती अटीतटीची झाली हे सहज लक्षात येते. या लढती दरम्यान फेडररला गुडघादुखीने त्रस्त केले. विजयाला गवसणी घातल्यानंतर फेडरर फार थकलेला दिसत होता. गतवर्षी ऑस्ट्रेलिया ओपननंतर या महान टेनिसपटूच्या गुडघ्यावर दोन वेळा शस्त्र्ाक्रिया करण्यात आली होती.

कारकीर्दीच्या मावळतीकडे

प्रतिस्पर्धी राफेल नदाल आणि फेडरर 20-20 ग्रॅण्डस्लॅम पदकांचे मानकरी आहेत. दोन महिन्यांनी 40 वर्षांचा होणार असलेल्या फेडररला 21वे ग्रॅण्डस्लॅम जेतेपद खुणावत असताना त्याच्या दुखापतीने डोके वर काढले आहे. 28 जूनपासून विम्बल्डन स्पर्धा सुरू होणार आहे. या सदाबहार टेनिसपटूची कारकीर्द मावळतीकडे झुकली असून, विम्बल्डननंतर तो टेनिसला गुडबाय करू शकतो.

माझ्या स्टाफसोबत चर्चा केल्यानंतर फ्रेंच ओपन स्पर्धेमधून माघार घेण्याचा निणर्य  घेतला. गुडघ्यावर दोन शस्त्रक्रीया झाल्या आहेत. आता माझ्या शरीराचेही ऐकायला हवे. दुखापतीमधून बरा होत असताना घाईगडबडीत टेनिस कोर्टवर उतरायला नको. या स्पर्धेमध्ये तीन लढती खेळलो याचा आनंद आहे.
– रॉजर फेडरर