हुकूमशाहीची वळवळणारी कीड चिरडून टाका, रोह्यामध्ये शिवसेनेचा दणदणीत मेळावा

देशात सध्या हुकूमशाहीची कीड वळवळत आहे. ही कीड जर वेळीच ठेचली नाही तर पुढे फार मोठा धोका आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत ही कीड चिरडून टाका असे आवाहन शिवसेना नेते अनंत गीते यांनी तालुक्यातील पाले येथे आयोजित केलेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मेळाव्यात केले.

देशात आणि राज्यात चुकीची माणसे सत्तेत बसली आहेत. त्यामुळे सुसंस्कृत म्हणून विशेष ओळख असलेल्या महाराष्ट्रात राजकारणाची पातळी घसरली आहे. राजकारण नीच पातळीवर गेले आहे, असा घणाघातही त्यांनी केला. याप्रसंगी शेकापचे माजी आमदार पंडित पाटील, माजी आमदार अनिल तटकरे, आस्वाद पाटील, नंदकुमार म्हात्रे, शंकर म्हसकर, राजेश सानप, शिवराम महाबळे, विष्णू लोखंडे, बबलू सय्यद, मारुती लोखंडे आदी उपस्थित होते.

गेल्या वेळेची चूक भरून काढणार

विकास कामे आम्ही करतो आणि त्या कामांचे श्रेय भलतीच मंडळी घेत आहेत, ही अतिशय दुर्दैवी बाब असून आगामी लोकसभा निवडणुकीत रायगड जिल्ह्यातून इंडिया आघाडीच्या उमेदवाराला भरघोस मतांनी निवडून द्यायचे आहे. मागील निवडणुकीत आमची चूक झाली आणि दुर्दैवीरीत्या भलतेच निवडून आले. यावेळी चुकीची दुरुस्ती करण्यात येणार आहे, असे यावेळी शेकापे पंडित पाटील यांनी सांगितले.