
रोह्याच्या तांबडी येथे चार वर्षांपूर्वी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. मात्र संपूर्ण महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या या घटनेतील सर्व आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची या प्रकरणात नियुक्ती केली असताना आरोपींची सुटका झाल्याने सरकारची चांगलीच नाचक्की झाली आहे.
रोहा तांबडी येथे 26 जुलै 2020 मध्ये पीडित अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या केल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर रायगडसह महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. प्रकरण घडल्यानंतर रोहा पोलिसांनी सात जणांविरोधात गुन्हा दाखल करून चोवीस तासात अटकही केली. शासनाने या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली होती. मात्र सबळ पुराव्याअभावी माणगाव सत्र न्यायालयाने या प्रकरणातील सर्वच आरोपींची निर्दोष मुक्तता केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
मंगळवारी आक्रोश मोर्चा
आरोपींची निर्दोष सुटका होण्याचा निकाल दुर्दैवी आहे. तपास यंत्रणेचा आम्ही निषेध करतो, असा संताप तांबडीतील गावकऱ्यांनी व्यक्त केला. दरम्यान शनिवारी सकाळी रोहा विश्रामगृहात पत्रकार परिषद घेत पीडितेच्या नातेवाईकांसह बहुजन समाजाने हा निकाल आम्हाला मान्य नसल्याचे सांगत 13 मे रोजी रोहे पोलीस ठाण्यावर आक्रोश मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.