
सामना प्रतिनिधी । मुंबई
कराड तालुक्यातील सैदापूर येथून 14 महिन्यांपूर्वी बेपत्ता झालेल्या रोहन कांबळे या 19 वर्षीय मुलाचा अद्याप थांगपत्ता लागलेला नाही. मामाच्या घरी रात्रीच्या जेवणानंतर जरा बाहेर जाऊन येतो, असं सांगणारा रोहन अद्याप घरी परतलेला नाही. गरीब शेतकरी कुटुंब लेकाच्या वाटेकडे डोळे लावून बसलंय. शेकडो वेळा पोलीस ठाण्याच्या पायऱया झिजवल्या, पत्रं लिहिली, पण कुठंच दाद मिळंना. पोटच्या पोराचं काय झालं? मातापित्याचा डोळ्याला लागलेली आसवांची खळ थांबायचं नाव घेत नाही.
कराडच्या साकुर्डी गावातील अनिल कांबळे यांचा मुलगा रोहन हा 9 ऑक्टोबर 2017 पासून बेपत्ता आहे. रोहन कराड येथील सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज येथे 13 वीत शिकत आहे. तो सैदापूरला आजीकडे राहायला होता. रात्री जेवल्यानंतर ‘‘बाहेर जाऊन येतो’’ असं म्हणत तो घराबाहेर पडला. त्यानंतर 14 महिने झाले तरी घरी आलेला नाही.
रोहनचे वडील अनिल कांबळे यांनी 10 ऑक्टोबर 2017 रोजी कराड शहर पोलीस ठाण्यात रोहन हरवल्याची तक्रार दिली. त्यानंतर पुढचे दीड महिने संबंधित पोलिसांनी या प्रकरणाकडे दुर्लक्ष केलं आणि आपल्याला अपमानास्पद वागणूक दिली असा अनिल कांबळे यांचा आरोप आहे. अखेर कांबळे यांनी उपअधीक्षक नवनाथ ढवळे यांना भेटून त्यांच्याकडे मुलाच्या तपासाची विनंती केली. ढवळे यांनी या प्रकरणाचा तपास दुसऱया पोलिसाकडे सोपवला. मात्र रोहनच्या बेपत्ता होण्याचं मूळ कारण शोधण्याचा प्रयत्न पोलिसांकडून झालेला नाही. कांबळे यांनी अनेक वेळा पोलीस ठाण्याच्या पायऱया झिजवल्या आहेत. जिल्हा पोलीसप्रमुख संदीप पाटील, कोल्हापूर परिक्षेत्राचे अधीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्यासह मुंबई&च्या आयुक्तांना भेटून त्यांच्यासमोर कैफियत मांडली आहे. कराडचे डीवायएसपी, साताऱयाचे पोलीस अधीक्षक, कोल्हापूरचे महानिरीक्षक यांना पत्रं लिहिली आहेत. एवढे करूनही मुलाचा तपास लागलेला नाही. मुलांच्या शोधापायी कर्जबाजारी होण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. रोहनला मोठा भाऊ आणि धाकटी बहीण असून त्यांच्या शिक्षणावरही या सर्व प्रकरणाचा परिणाम होत असल्याचे अनिल कांबळे यांनी दैनिक ‘सामना’शी बोलताना सांगितले.
रोहन भीतीच्या छायेखाली…
बेपत्ता होण्यापूर्वी रोहन काही दिवस भीती आणि तणावाखाली होता. त्याने मला कुठली तरी मुलं मारण्यास येणार आहेत एवढेच एका मित्राजवळ सांगितले होते. तसेच साकुर्डी गावात त्याला मारण्याचा प्रयत्नही झाला होता. अशा गंभीर गोष्टी असताना पोलिसांकडून कोणताच तपास होत नसल्याने रोहनचे नेमके काय झाले? असा प्रश्न निर्माण झाला आहे. रोहन सापडत नसल्याने घातपाताचा संशय वाढत असून कांबळे दांपत्य अस्वस्थ झाले आहे. हातातोंडाशी आलेला मुलगा बेपत्ता झाल्याने ते हवालदिल झाले आहेत.































































