Comedy आणि Thriller

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
rajan-waghdhare

>> रोहिणी निनावे ([email protected])

राजन वाघधरे. संकलन, निर्मिती दिग्दर्शन या साऱया प्रांतात स्वतःचा ठसा उमटवून वेगळेपण सिद्ध केले आहे. आपल्या मराठी चित्रपटसृष्टीत असे अनेक कलाकार, लेखक, दिग्दर्शक आहेत ज्यांनी अनेक वर्ष मराठी आणि हिंदी मालिकांसाठी काम केलं आहे, मात्र ते फार प्रसिद्धीच्या मागे धावले नाही, त्यांचं काम करत राहिले.. प्रामाणिकपणे..! यापैकीच एक नाव म्हणजे राजन वाघधरे. पाटर्य़ांना फारसे न जाणारा, उगाच चार जणांना बोलवून काम मिळावं म्हणून खाऊ पिऊ घालणाऱयांपैकी तो नाही..! माझी आणि राजन ची क्वचितच भेट होते. दादर शिवाजी पार्क च्या बरिस्ता मध्ये आम्ही भेटलो.

स्वभावाने अत्यंत साधा असलेल्या राजनला मी म्हटलं. तुझी सुरुवात एडिटिंग पासूनच झाली ना? या क्षेत्रात तुझा शिरकाव कसा झाला ? राजन म्हणाला माझे वडील विनायक वाघधरे हे सुद्धा एडिटरच होते. आई गृहिणी होती. मला शिक्षणात रस नव्हता, वडिलांमुळे या क्षेत्राबद्दल माहिती होती. मी वडिलांना सांगितलं मला एडिटर व्हायचंय. वडिलांनी साफ विरोध केला, म्हणाले बघतो आहेस ना किती बेभरवशाचं क्षेत्र आहे हे, कधी पैसे मिळतात कधी नाही. पण मी हट्टच केला तेव्हा नाईलाजाने ते मला या क्षेत्रातले दिग्गज संकलक वी. एन. मयेकर यांच्याकडे घेऊन गेले. मग त्यांच्याकडे मी संकलन कसं करायचं ते शिकायला लागलो. आणि 12 वीनंतर माझं शिक्षण सुटलं. एस. आर. सावंत, ओमप्रकाश मक्कड यांसारख्या सिनीअर लोकांकडे मी संकलन शिकत गेलो. स्टार नावाचा कुमार गौरव चा पिक्चर होता त्यात मी अप्रेंटिसशिप केली. हे सगळं चालू असतानाच एकदा टी.वी इंडस्ट्री मध्ये संप झाला. काही मागण्यांसाठी शूटिंग बंद झालं. वडील म्हणाले बघितलंस , म्हटलं ना हे क्षेत्र बेभरवशाचं आहे. आता काय करणार आहेस? मग वडिलांचे गोखले नावाचे मित्र आहेत त्यांनी सुचवलं की तू दूरदर्शन मध्ये संकलक म्हणून काम का नाही बघत ? मग मी तिथे नोकरी घेतली. चौदा दिवसांच्या ब्रेक नंतर एक दिवस गॅप दिली जायची आणि पुन्हा रुजू करून घेतलं जायचं ..फिल्म्स, न्यूजचं एडिटिंग मी करायचो. व्हिडीओ बनवायचं ज्ञान तेव्हा फार कमी लोकांना होतं, त्यात मी एक होतो. विनायक चासकरांनी एक दिवस ये जो है जिंदगी ह्या त्या काळातल्या अत्यंत लोकप्रिय अशा विनोदी मालिकेचं संकलन माझ्याकडे दिलं आणि तो माझ्या आयुष्यामधला टर्निंग पॉईंट ठरला.

माझं संकलनकौशल्य बघून मंजू सिंग मला म्हणाल्या अरे तू इतकं छान एडिटिंग करतोस. तिथल्या दूरदर्शनच्या रूटीन कामात का अडकून पडतोस. तुला सतत काम मिळेल याची गॅरंटी मी देते आणि मी दूरदर्शन मधून बाहेर पडलो, आणि एका मागोमाग हिट मालिकांचं संकलन माझ्याकडे आलं. मुजरीम हाजीरसाठी तर मला अवॉर्ड ही मिळालं. पण मग या कामात ही मला सॅच्युरेशन आलं आणि याच वेळेस आभास नावाची मराठी मालिका माझ्याकडे आली. थ्रिल असलेली सात भागांची हे मालिका मी दिग्दर्शित केली. मी स्वतः एडिटर असल्याने मी एका दिवसात एक भाग पूर्ण करायचो. एकदा रमण कुमार यांच्या ‘गजब की ये दुनिया’ या मालिकेचे चार भाग दिग्दर्शित करायची संधी मला मिळाली. त्याच वेळेस अधिकारी ब्रदर्स मधून फोन आला, गौतमभाई कुठेतरी बाहेर जाणार होते , त्यामुळे त्यांनी ‘कमांडर’ मालिकेचे मला काही एपिसोड्स दिग्दर्शित करशील का असं विचारलं आणि मी हो म्हटलं. माझं काम बघून मार्कंड अधिकारींनी मला विचारलं , कॉमेडी सिरिअल डिरेक्ट करोगे क्या?

माझ्यासाठी ही चांगली संधी असल्याने मी लगेच हो म्हटलं. ती मालिका म्हणजे श्रीमान श्रीमती.. अँड रेस्ट इज द हिस्ट्री. ही मालिका अतिशय लोकप्रिय ठरली. त्यानंतर यस बॉस ही मालिका देखील गाजली. एडिटर असल्याचा फायदा मला मिळाला आणि नेमकं काय किती हवं ते माहित होतं. मी शूट करताना 6-7 वेळा सीन ची रिहर्सल करून घेतो. फार ट्रीटमेंट देण्यावर माझा भर नसतो . तू विश्वास ठेवणार नाही. मी सकाळी 7 ते 2 चीच शिफ्ट ठेवायचो. सगळे आनंदात असायचे कारण सकाळी फ्रेश माईंड ने भराभर काम व्हायचं आणि उरलेला दिवस त्यांना फ्री मिळायचा.. अगदी शेखर सुमन सारखा उशिरा सेट वर येणारा अभिनेता देखील वेळेत सेटवर यायचा. अर्थात हे त्या वेळेस शक्य होतं आता नाही. त्या वेळेस आपल्याकडे फीडबॅक हा प्रकार नव्हता. आपल्याला हवं तसं शूट करता यायचं. डिसिजन मेकर मी असायचो, कास्टिंग पासून ते लोकेशन पर्यंत.

कॉमेडी मध्ये थोडं लाऊड असणं अपेक्षित आहे. पण तुम्ही ओल्ड स्कूल चे आहात असं ऐकवलं जातं, पण आजही हा ट्रक लोकप्रिय आहे. रोहित शेट्टीचा ओव्हर द टॉप कॉमेडी आणि थ्रिलर सिनेमा लोक डोक्यावर घेतात, साराभाई व्हर्सेस साराभाई ही माझी अत्यंत आवडती मालिका पण ती क्लासी असल्याने मासेस ना तितकी समजली नाही असं मी म्हणेन. त्यांनतर बी.पी. याना सहज म्हणून भेटायला गेलो तर त्यांनी सी. आय. डी दिग्दर्शित करशील का असं मला विचारलं. कॉमेडी बरोबरच थ्रिलर हा ही माझा झोन असल्याने मी होकार दिला. अशा तऱ्हेने मी दिग्दर्शनाचं माझं काम एन्जॉय करत होतो. याच दरम्यान ‘लव्ह का तडका’ ही फिल्म देखील मी दिग्दर्शित केली. ‘बेवडादास’ ही माझी फिल्म सुद्धा बनून तयार आहे.

मी विचारलं, तुझा गुरु कोण आहे असं म्हणशील तू ? तेव्हा राजन म्हणाला तसं मी खूप जणांकडे शिकलो पण माझं एडिटिंगचं टेबल हाच माझा गुरु. तोच मला शिकवत गेला. योग्य काय अयोग्य काय. मंजू सिन्हा आणि कुंदन शहा यांच्याकडून ही खूप गोष्टी शिकलो. संजीव भट्टाचार्य यांच्याकडून चिकाटी तर वी. एन. मयेकर यांच्याकडून शांत रहाणं शिकलो. एक किस्सा सांगतो. हृषीकेश मुखर्जी यांचा मी भक्त. ते आजारी असताना त्यांनी राकेश बेदींना सांगितलं की तुमच्या टीम ला घेऊन भेटायला या. त्यांच्या वाढदिवशी आम्ही त्यांना भेटायला गेलो. त्यांनी आमची खूप तारीफ केली. ते म्हणाले माझं सगळ्यात पेनफुल इंजेक्शन मी नर्सला आठ ते साडे आठ च्या वेळेस द्यायला सांगायचो, कारण तेव्हा तुमची मालिका चालू असते, मी मनमुराद हसत असतो आणि इंजेक्शनचं दुःख विसरून जातो. मी म्हटलं, याहून मोठी कॉम्प्लिमेंट काय असेल. मला म्हणाले कैसे सुझता है तुम्हे ये सब ? कहाँ से लाते हो इतना कॉमिक सेन्स? याचं श्रेय मी लेखक अशोक पाटोळे यांना ही देतो. त्यांचा कॉमेडीचा सेन्स अफलातून होता.

मी म्हटलं नाटक सिनेमा वगैरे काही करण्याचा मानस आहे का? राजन म्हणाला इच्छा आहे, पण त्यासाठी वेळ द्यावा लागतो शिवाय तितके पैसे ही नाहीत. चांगलं प्रपोजल यायला हवं .मी विचारलं की आणि वेब सिरीज? राजन म्हणाला तुला माहित आहे का? वेब सिरीज वाले टी.व्ही करणाऱयांना खडय़ासारखं बाजूला काढतात, त्यांचं म्हणणं, वेबचे प्रेक्षक वेगळे आहेत, त्यांना सात्विक लिखाण किंवा दिग्दर्शन नको आहे, काहीतरी नवं सेन्सेशनल देणारी व्यक्ती हवी. आपण हे करू शकतो, पण संधी द्यायला हवी. तरीही मला वाटतं की त्यात अनावश्यकपणे गोष्टी मांडल्या असतात आणि अशा व्हल्गर गोष्टींना फार आयुष्य नसतं, शेवटी जे क्लासिक असतं तेच टिकतं.

मी विचारलं टी. व्ही आणि फिल्म मध्ये काय फरक आहे? यावर तो म्हणाला टीव्ही न्यूजपेपर सारखा आहे. त्यातल्या बातमीचं आयुष्य जसं आजच्या पुरतं असतं, तसं सिनेमाचं नसतं. ती कादंबरीसारखी दीर्घ काळापर्यंत मनात रुंजी घालत असते. फिल्ममध्ये तुम्ही तुमच्या व्हिजनने काम करता तर मालिकेमध्ये चॅनलच्या! मी शेवटचा प्रश्न विचारला की बायकोची कशी साथ लाभली ? तेव्हा म्हणाला आपण टीव्ही इंडस्ट्रीमधली माणसं त्यामुळे एकाने घराची बाजू सांभाळावी लागते. माझी बायको रश्मिताने ती भक्कमपणे सांभाळली आहे. राजन हसत पुढे म्हणाला बायको समंजस असेल तर घरात कॉमेडी चित्र असतं.. रागावली तर थ्रिलर असतं, पण मी उत्तम एडिटर असल्याने सगळं नीट सांभाळून घेतो. राजनच्या साध्या समंजस स्वभावाचं, त्याने मिळवलेल्या यशाचं मला मनापासून कौतुक वाटतं.