बीड येथील ज्ञानराधा मल्टिस्टेट को-ऑप.क्रेडिट सोसायटीमध्ये कर्जत-जामखेड मतदारसंघातील सर्वसामान्य खातेदारांचे 90 कोटी रूपये अडकले आहेत. या खातेदारांसह इतरही खातेदारांचे हक्काचे पैसे परत देण्यात यावेत आणि सर्वसामान्य जनतेची फसवणूक करणाऱ्या या संस्थेसह इतर संस्थांची चौकशी करून कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन् यांच्याकडे केली. याबाबत रोहित पवार यांनी बुधवारी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन् यांची भेट घेत त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली आणि याबाबतचे पत्र त्यांना दिले.
बीडमधील ज्ञानराधा मल्टिस्टेट को-ऑप.क्रेडिट सोसायटीमध्ये कर्जत-जामखेड मतदारसंघातील सुमारे साडेसहा हजारहून अधिक सभासद असून त्यांच्या सुमारे 90 कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. हे सर्व खातेदार शेतकरी, कामगार व सामान्य कुटुंबातील आहेत. या सर्व खातेदारांनी आपली आयुष्याची पुंजी साठवून त्या संस्थेमध्ये दिली होती. काहींनी मुलांच्या शिक्षणासाठी, मुलींच्या लग्नासाठी तर काहींनी आपल्या आरोग्यासाठी पैसे साठवून ठेवावेत या हेतून या संस्थेमध्ये ठेवीच्या स्वरूपात पैसे ठेवले होते. मात्र, या संस्थेने हे पैसे इतरत्र वळवल्याने सर्वसामान्य खातेदारांना हक्काचे पैसे मिळत नाहीत. त्यामुळे ते अडचणीत आले आहेत. या सर्व ठेवीदारांनी आमदार रोहित पवार यांची भेट घेऊन यात लक्ष घालण्याची मागणी केली होती.
त्यांनंतर लगेचच याबाबत रोहित पवार यांनी बुधवारी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची भेट घेत सविस्तर चर्चा केली. सामान्य ठेवीदारांची फसवणूक करणाऱ्या या आणि अशा इतरही संस्थांची चौकशी करुन त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी आणि कर्जत जामखेड मतदारसंघातील ठेवीदारांसह फसवणूक झालेल्या सर्वांचेच पैसे परत मिळण्यासाठी सहकार्य करावे, अशी विनंती रोहित पवार यांनी राज्यपालांकडे केली. तसेच याबाबतचे पत्रही त्यांनी राज्यपालांना दिले आहे. राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी यासंदर्भातील माहिती मागवून लवकरच प्रशासनाला योग्य त्या सूचना देण्याचे आश्वासन दिल्याचे रोहित पवार यांनी सांगितले.