“गुंडांना पाठीशी घालून आणि निरपराधांना गुन्ह्यात गोवून मंत्री म्हणून आपण…”, रोहित पवारांचा चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा

पुण्यातील वडगाव येथील रिक्षा अपघात प्रकरणामुळे प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील ही अडचणीत आली आहे. या प्रकरणी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांना फोन करत गौतमी पाटीलला उचलायचे की नाही? अशी विचारणा केली. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला असून कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्या बाबतीत एवढी तत्परता का दाखवली जात नाही असा सवाल उपस्थित होत आहे. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी यावरून चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.

रोहित पवार यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करत चंद्रकांत पाटील यांचा खरपूस समाचार घेतला. तुमच्या मतदारसंघातला एक नामचीन गुंड भरदिवसा पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून परदेशात पळून जातो, पण त्याच्या अटकेसाठी आपण कधी पोलिसांना फोन केल्याचं दिसलं नाही, असे ते म्हणाले.

गौतमी पाटील हिला मी ओळखत नाही, पण तिच्या गाडीमुळं रिक्षाचा अपघात झाला असेल तर निश्चितच त्याची चौकशी झाली पाहिजे, दोषी असेल त्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, त्या रिक्षावाल्या कुटुंबाला भरीव मदत मिळाली पाहिजे आणि जखमीचा वैद्यकीय खर्चही वसूल केला पाहिजे. पण अपघातग्रस्त गाडीत गौतमी पाटील नसताना तिला उचलण्यासाठी पोलिसांवर दबाव आणणं हे आपल्यासारख्या नेत्याला शोभणारं नाही, असे रोहित पवार म्हणाले.

गौतमी पाटीलला उचलायचं की नाही? चंद्रकांत पाटील यांचा पोलीस उपायुक्तांना फोन, घायवळ प्रकरणात मौन

आपल्याविषयी माझ्या मनात आदर आहे, आपण संवेदनशील आहात. पण कार्यकर्त्यांचं किती ऐकायचं हेही आपण ठरवलं पाहिजे. महिला, गरीब, सामान्य माणूस यांना त्रास देणाऱ्या गुंडांना जेरबंद करण्यासाठी मंत्र्यांनी असे फोन केले तर राज्यात खऱ्या अर्थाने रामराज्य येईल.. पण गुंडांना पाठीशी घालून आणि निरपराधांना गुन्ह्यात गोवून मंत्री म्हणून आपण कोणता आदर्श घालून देत आहात? असा सवालही रोहित पवार यांनी केला.