
दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाचे लोण आता देशभरात पसरले असून बुधवारी मुंबईतही अनेक ठिकाणी विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी काही विद्यार्थ्यांची धरपकड केली. मात्र, या कारवाई दरम्यान पोलीस अधिकाऱ्याने विद्यार्थ्यांना थेट धमकी दिल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी यासंदर्भातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत भाजप सरकारवर निशाणा साधला आहे.
आमदार रोहित पवार यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर हा व्हिडिओ शेअर करत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. आंदोलन चिरडण्यासाठी आंदोलकांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात भाजपचा हात जगात कोणीच धरू शकत नाही, असा घणाघाती आरोप त्यांनी केला. व्हिडिओमधील पोलीस अधिकाऱ्याच्या वर्तनावर प्रश्न उपस्थित करत, हा पोलीस अधिकारी आहे की अमली पदार्थांचा स्मगलर, असा सवाल त्यांनी विचारला.
आंदोलन चिरडण्यासाठी आंदोलकांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात भाजपचा हात जगात कुणीच धरणार नाही.. त्याचा यापेक्षा दुसरा कोणता पुरावा पाहिजे? हा पोलीस अधिकारी आहे की अमली पदार्थांचा स्मगलर? सरकारने आधी या पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करून त्याची चौकशी करावी… यापुढे शांततेत आंदोलन… pic.twitter.com/jtLKiwARYu
— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 23, 2026
तसेच, संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर सरकारने तातडीने गुन्हा दाखल करून त्याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे. यापुढे जर शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला, तर ते अजिबात सहन केले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी सरकार आणि पोलीस प्रशासनाला दिला आहे.



























































