रोहित शर्मानं ‘वजन’ वापरलं अन् चक्र फिरली; BCCI नं यू टर्न घेत महिन्याभरापूर्वी हटवलेल्या कोचला परत बोलावलं

इंडियन प्रीमियर लीगचा 18 वा हंगाम संपल्यानंतर हिंदुस्थानचा संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात दोन्ही उभय संघांमध्ये पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाईल. या मालिकेपूर्वी मोठ्या घडामोडी घडल्या. आधी रोहित शर्मा आणि नंतर विराट कोहली याने कसोटीतून निवृत्ती घेतली. अर्थात रोहितने कसोटीतून निवृत्ती घेतली असली तरी आजही त्याच्या शब्दाला बीसीसीआयमध्ये मान असल्याचे समोर आले आहे. कारण रोहितच्याच विनंतीवरून महिन्याभरापूर्वी नोकरीवरून काढून टाकण्यात आलेल्या क्षेत्ररक्षण प्रशिक्षकाची बीसीसीआयकडून पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. ‘एनडीटीव्ही‘ने बीसीसीआयमधील सूत्रांच्या हवाल्याने याबाबत वृत्त दिले आहे.

बीसीसीआयने टी. दिलीप यांची टीम इंडियाच्या क्षेत्ररक्षण प्रशिक्षकपदी पुन्हा नियुक्ती केली आहे. विशेष म्हणजे बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेतील खराब कामगिरीनंतर बीसीसीआयने टी. दिलीप यांना नाराळ दिला होता. तेव्हापासून बीसीसीआय नवीन क्षेत्ररक्षण प्रशिक्षकाच्या शोधात होते. परंतु बीसीसीआयला पर्यायी प्रशिक्षक सापडला नाही. त्यामुळे टी. दिलीप यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आली असून त्यांना एक वर्षासाठी करारबद्ध करण्यात आले आहे. अर्थात टी. दिलीप यांच्या पुर्ननियुक्तीमागे रोहित शर्माचा हात आहे.

दरम्यान, रोहित शर्मा याच्या विनंतीवरून बीसीसीआयने टी. दिलीप यांची पुन्हा क्षेत्ररक्षण प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. रोहित शर्मा याने याच महिन्यामध्ये कसोटी क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतरही त्याने आपले वजन वापरले आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्याकडे टी. दिलीप यांच्या नावाची शिफारस केली. रोहितची ही विनंती बीसीसीआयने मान्य केली. त्यामुळे टी. दिलीप टीम इंडियासह इंग्लंड दौऱ्यावर जातील. तर टी. दिलीप यांच्या अनुपस्थितीत क्षेररक्षण प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळणारे रायन टेनटेस्केट हे सहाय्यक प्रशिक्षक म्हणून कायम करतील.

हे वाचा – गिल तर संघातही बसत नाही, मग त्याला कर्णधार कसे केले? बीसीसीआयच्या निर्णयावर वीरू भडकला

दरम्यान, टी. दिलीप हे जवळपास साडे तीन वर्षापासून टीम इंडियासोबत आहेत. 2021 मध्ये त्यांची टीम इंडियाच्या क्षेत्ररक्षण प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती. आर. श्रीधर यांच्या जागी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. 2024 च्या टी-20 वर्ल्डकपनंतर त्यांचा कार्यकाळ संपला होता. त्यानंतर त्यांचा करार मार्च 2025 पर्यंत वाढवण्यात आला होता. परंतु बॉर्डर-गावस्कर मालिकेतील खराब कामगिरीनंतर त्यांना काढून टाकण्यात आले होते.

हिंदुस्थान-इंग्लंड कसोटी मालिकेचे वेळापत्रक

पहिली कसोटी – 20 ते 24 जून – हेडिंग्ले
दुसरी कसोटी – 2 ते 6 जुलै – एजबॅस्टन
तिसरी कसोटी – 10 ते 14 जुलै – लॉर्ड्स
चौथी कसोटी – 23 ते 27 जुलै – मँचेस्टर
पाचवी कसोटी – 31 जुलै ते 4 ऑगस्ट – द ओव्हल

मी निवड समितीचा सदस्य नव्हे, श्रेयस अय्यरबाबत गंभीर विधान