ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून रोहितला वगळल्याने गावसकर भडकले; म्हणाले, नेटमध्ये घाम गाळणारा खेळाडू…

इंदूयन प्रीमियर लीग (आयपीएल 2020) चा 13 वा हंगाम संपल्यावर हिंदुस्थानचा संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. येथे टीम इंडियाला कसोटी, एक दिवसीय आणि टी-20 मालिका खेळायची आहे. या दौऱ्यासाठी खेळाडूंची निवड करण्यात आली असून बीसीसीआयने सोमवारी तिन्ही फॉर्माटसाठी संघाची घोषणा केली.

आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार आणि टीम इंडियाच्या एक दिवसीय संघाचा उपकर्णधार असलेल्या ‘हिटमॅन’ रोहित शर्मा याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात आराम देण्यात आले आहे. त्याला वगळण्यामागे दुखापत हे कारण बीसीसीआयने दिले आहे.

मात्र आता यावरून घमासान सुरू झाले असून चाहत्यांसह टीम इंडियाचे माजी लिजेंड खेळाडू सुनील गावसकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्याला नक्की कोणत्या कारणामुळे संघात स्थान देण्यात आले नाही हे जाणून घेण्याचा चाहत्यांना पूर्ण अधिकार आहे, असे गावसकर म्हणाले.

सोमवारी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी कसोटी, एक दिवसीय आणि टी-20 संघाची घोषणा करण्यात आली. यानंतर बीसीसीआयने रोहित शर्मा आणि इशांत शर्मा याच्या दुखापतीबाबत माहिती देत आढावा घेत असल्याचे सांगितले. मात्र बीसीसीआयच्या ट्विट नंतर मुंबई इंडियन्सने एक ट्विट केले आणि यात रोहित शर्मा नेट मध्ये सराव करताना दिसला. व्हिडीओमध्ये तो पूर्णपणे फिट असल्याचे दिसत आहे. त्यामुळे ‘हिटमॅन’च्या चाहत्यांनी बीसीसीआयला सवाल केला. सुनील गावसकर यांनीही बीसीसीआयला धारेवर धरले.

https://twitter.com/mipaltan/status/1320792336683560961?s=19

‘ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पहिला कसोटी सामना खेळण्यासाठी अजून जवळपास 1 महिन्याचा अवधी आहे. जर तो (रोहित) मुंबई इंडियन्ससाठी सराव करताना दिसत आहे, तर प्रामाणिकपणे बोलायचे झाल्यास ही नक्की कोणत्या प्रकारची दुखापत आहे काही कळत नाहीये. यात पारदर्शकता हवी आणि खुलासा व्हायला हवा’, असे गावसकर म्हणाले.

‘टीम इंडियाच्या क्रिकेट चाहत्यांना याबाबत जाणून घेण्याचा अधिकार आहे. आपण मान्य करू की आयपीएल फ्रेंचायजी विरोधी संघावर मानसिक दडपण निर्माण करण्यासाठी याबाबत खुलासा करत नसेल, मात्र टीम इंडियाचा विषय येतो तेव्हा सर्व काही पारदर्शक हवे, असेही गावसकर म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या