रोखठोक: आसाराम, अकबर आणि केरळचा बिशप

374

rokhthok‘Me Too’ प्रकरणात महिलांनी वादळ निर्माण केले, पण कायदा काय करणार? आसाराम बापू ‘Me Too’ मध्ये तुरुंगात सडतोय. 20 महिलांनी तक्रार करूनही केंद्रीय मंत्री एम. जे. अकबर यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यायला एक आठवडा लागला. केरळमधल्या एका बिशपने ‘नन’वर बलात्कार केला. हे बिशपसाहेबही जामिनावर मुक्त झाले.

आपल्या देशातील न्यायव्यवस्था किती ढिसाळ पायावर उभी आहे याचे दर्शन रोज घडते. सध्या सुरू असलेली विनयभंग आणि छेडछाडीची प्रकरणे हे त्याचे उत्तम उदाहरण. एकाच गुन्हय़ासाठी दोन संशयित आरोपींना कसा वेगळा न्याय दिला जातो हे केरळच्या बलात्कारी बिशप प्रकरणात समोर आले. आसाराम बापू व केरळच्या बिशपचे प्रकरण सारखेच आहे. रोमन कॅथलिक पाद्री फ्रँको मलक्कल याने एका ‘नन’वर अनेकदा बलात्कार केला. या ननने आरोप केला की, मलक्कलने 2014 साली कुरविलांगडच्या गेस्ट हाऊसमध्ये तिच्यावर बलात्कार केला. ननने आधी चर्चच्या अधिकाऱयांकडे बलात्कारी पाद्रय़ाची तक्रार केली. तेथे हालचाल झाली नाही तेव्हा नन सरळ पोलिसांत गेली. पोलिसांनी सुरुवातीला काहीच हालचाल केली नाही. तेव्हा ती मीडियात गेली. अखेर बिशपला पकडले गेले व सात-आठ दिवसांत तो जामिनावर बाहेर आला. बिशपला इतक्या तडकाफडकी जामीन मिळेल असे वाटले नव्हते, पण बिशपच्या मागे ‘चर्च’चे शक्तिमान साम्राज्य उभे राहिले व बिशप सात-आठ दिवसांत बाहेर आला. हे सर्व सांगण्याचे कारण असे की, आसाराम बापू ‘बिशप’प्रमाणेच विनयभंगाच्या गुह्यात तुरुंगात आहे. सात वर्षांनंतरही आसारामला जामीन मिळालेला नाही. आसाराम सडतोय, पण बिशप मोकाट. बिशपचा बलात्कार प्रतिष्ठत दर्जाचा, धार्मिक अधिष्ठान असलेला होता काय?

आसाराम आतच!
आसाराम बापू हे प्रवचनकार व हिंदू धर्माचे प्रचारक होते. त्यांच्या गुन्हय़ाची शिक्षा त्यांना मिळावी. तरीही आरोप सिद्ध होईपर्यंत जामीन मिळण्याचा अधिकार त्यांना आहे. पण कुणाला तरी बिशपला सोडवायचे होते व कुणाला तरी आसारामना आत सडवून मारायचे आहे. सध्या जे ‘Me Too’चे वादळ उठले आहे त्या वादळात भलेभले गटांगळय़ा खात आहेत; पण खरे गुन्हेगार अजून गजाबाहेर आहेत. काँगेसचा शशी थरूर हे वाया गेलेले बिनडोक विद्वान आहेत. त्यांच्यावर पत्नी सुनंदा थरूर हिला मारण्याचा, आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. पण पोलिसांनी त्यांना एक दिवसही गचांडी पकडून ‘आत’ केले नाही. राममंदिराच्या बाबतीत त्यांनी एक वादग्रस्त विधान केले की, ‘कोणत्याही चांगल्या हिंदूला अयोध्येतील वादग्रस्त जागेवर राममंदिर उभे राहिलेले आवडणार नाही.’ याच थरूर यांनी आसारामवरही टीका केली होती. पण केरळमधील बलात्कारी बिशपविरुद्ध या महाशयांनी शब्द काढला नाही. ‘गुड हिंदू’ आणि ‘बॅड हिंदू’ आहेत, तसे गुड-बॅड मुसलमान, ख्रिश्चनांतही आहेत. थरूर यांना हे समजायला हवे.

अकबरांची वकिली
आसाराम बापूला एक न्याय व त्याच गुन्हय़ासाठी केरळच्या बिशपला दुसरा न्याय, हे जरा गमतीचे आहे. केंद्रातले एक मंत्री एम. जे. अकबर यांच्यावर एकाच वेळी 20 महिलांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले. आता अकबर यांनी त्या महिलांविरुद्ध वकिलांची फौज उभी केली व भाजपचे सर्व प्रवक्ते अकबरांच्या भोवती कवचकुंडले करून उभे आहेत. विनयभंग प्रकरणात महाराष्ट्राचे तत्कालीन उपमुख्यमंत्री रामराव आदिक यांना पद सोडून प्रदीर्घ काळ वनवासात जावे लागले. आंध्रचे राज्यपाल असताना एन. डी. तिवारी यांनाही घरी जावे लागले होते. त्यांनी आंध्र राजभवनाचा जनानखाना केला हे खरे. त्यांच्या विरोधात कोणत्याही महिलेने तक्रार केली नव्हती; पण नैतिकतेच्या मुद्दय़ावर काँगेसने त्यांना राजीनामा द्यायला लावला होता. काँग्रेसच्या ‘एनएसयूआय’ म्हणजे विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष फिरोज खान यांच्यावर एका मुलीने लैंगिक शोषणाचा आरोप करताच काँग्रेसने त्यांचा राजीनामा घेतला, पण एम. जे. अकबर यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यायला एक आठवडा लागला. तोसुद्धा त्यांची पुरती छी थू झाल्यावर. सरकारी पदांवर बसलेल्यांनी अशा आरोपांची झूल पांघरून खुर्च्या उबवणे बरे नाही. पुन्हा प्रश्न तोच आहे. केरळचा बिशप, भाजपचे मंत्री अकबर यांना विनयभंग, बलात्कार करून मोकळे राहण्याचा अधिकार आहे, पण आसारामबापूंना तो अधिकार नाकारला जातो हे संशयास्पद आहे. येथे आसाराम हा विषय प्रतीकात्मक आहे. कायद्याची अंमलबजावणी करण्याचा दुटप्पीपणा एवढाच मुद्दा आहे. आसाराम, एम. जे. अकबर आणि बिशप यांच्यासह अनेकांवर हे आरोप झाले. हे सर्व लोक साहित्य, कला, सामाजिक क्षेत्रातले. पुन्हा मोठय़ांचा त्यांना वरदहस्त होता.

न्यायालय
आजूबाजूचे मोहमयी जग आपल्यासाठीच निर्माण झाले असे अनेकांना वाटते. पदाचा गैरवापर करून उपभोग घेणारे त्यातून निर्माण झाले. राजकारणात, सिने उद्योगातच हे प्रकार घडतात असे नाही, तर समाजातील सर्व थरांत ते चालले आहे व त्याला आमची कायदा-न्यायव्यवस्थादेखील जबाबदार आहे. समलैंगिक संबंध, व्यभिचारास कायदेशीर मान्यता ही त्यांची दोन उदाहरणे. लिव्ह इन रिलेशन्स नावाचा प्रकार संस्कृती व विवाहसंस्था पोखरून टाकतोय, जो आपल्या देशाच्या संस्कृतीचा पाया होता. मात्र हवे तसे स्वच्छंद जगा; कायदाही तुमच्यासाठी स्वच्छंद बनला आहे असेच एकंदर न्यायालयांचे वर्तन दिसते. पुन्हा अशा प्रकरणात आसाराम अडकतो, एम. जे. अकबर यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यायला काही दिवस लागतात आणि केरळचा बिशप बलात्कार करून जामिनावर सुटतो. लता मंगेशकरांपासून किरण रावपर्यंत, अक्षयकुमारपासून आमीर खानपर्यंत सगळे जण तनुश्री दत्ताच्या पाठीशी उभे राहिले, पण बिशपने जिच्यावर बलात्कार केला त्या ननच्या बाजूने यापैकी एकाही व्यक्तीने भूमिका घेतली नाही. अगदी ‘Me Too’च्या मोहिमेचा भाग होत आपल्यावरील अत्याचाराला तोंड फोडणाऱया पीडितांपैकीही कोणी या ननच्या बाजूने एखादे साधे ‘ट्विट’ही केले नाही. ननसारख्या अनेक सामान्य स्त्र्ायांच्या किंकाळय़ा अशाच विरून जातात. ‘रम, रमा आणि रमी’ यांच्या अधीन जाण्याची प्रवृत्ती सगळय़ांत वाढली आहे. प्रत्येक व्यक्तीचे खासगी जीवन वेगळे. त्यांनी पडद्याआड काय केले याची चौकशीही करू नये असे मान्य करू, परंतु तुम्ही देशाचे, राज्याचे पदाधिकारी आहात, सामाजिक व्यासपीठावरून भाषणे झोडता. तुम्ही ‘पब्लिक फिगर’ बनता तेव्हा तुम्हाला असले वर्तन करता येत नाही. आश्चर्य असे की, देशाचे पंतप्रधान सगळय़ा विषयांवर बोलतात, पण आसाराम, अकबर आणि बिशपवर त्यांनी अद्यापि ‘मन की बात’ मांडलेली नाही. तनुश्रीवर कॅमेऱयांचा झोत आहे. केरळची पीडित नन अंधारात गडप झाली आहे.

Twitter – @rautsanjay61
Gmail – [email protected]

आपली प्रतिक्रिया द्या