रोखठोक – कावळे उडाले स्वामी!

5039

rokhthokरोजची पक्षांतरे हा आता जनमानसात थट्टेचा विषय झाला. शहाबानो प्रकरणात आरिफ मोहम्मद खान व संयुक्त महाराष्ट्र लढय़ात चिंतामणराव देशमुखांनी पक्ष सोडले ते आदर्श पक्षांतर होते. आज रामदास फुटाणे म्हणतात, ‘मोगलांनी धर्मांतरं कशी केली हे पक्षांतरामुळे कळले!’ राजकारणाचे इतके विडंबन कधीच झाले नव्हते.

हाराष्ट्राच्या निवडणूक वेळापत्रकाची घोषणा एव्हाना झाली असेल. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा हे 17 तारखेला महाराष्ट्रात आले. मुख्य निवडणूक आयुक्त नक्की वेळापत्रक ठरवायला आले, की महाराष्ट्रात हवी असलेली पक्षांतरे पूर्ण झाली की नाहीत ते पाहायला आले? असा विनोद त्यावर कुणी तरी केला. सध्या पक्षांतरावर जेवढे विनोद सुरू आहेत तेवढे कुणावर होत नाहीत. पक्षांतरावर खास विनोदी कार्यक्रम मराठी वृत्तवाहिन्यांवर सुरू आहेत. आज आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे व बाळासाहेब ठाकरे नाहीत. नाहीतर आजच्या पक्षांतरावर त्यांनी रोजच हास्यस्फोट घडवले असते. पक्षांतराच्या गढूळ लाटेवर मागच्या स्तंभात मी लिहिले, पण लाटांचे उसळणे थांबले नाही व त्यापेक्षा विनोदाचा महापूर थांबला नाही. प्रसिद्ध वात्रटिकाकार रामदास फुटाणे हे यात सगळय़ात पुढे, तसे इतरही आहेत. ‘इंडिया टुडे’चे पत्रकार साहिल जोशी यांनी त्यांच्या ‘ट्विटर’वर एक विनोद टाकला.
डॉक्टर (पेशंटला) – काय त्रास होतोय?
पेशंट – गुदमरतंय व घुसमटतंय!
डॉक्टर – ही औषधं तीन दिवस घ्या.
जर नाही बरं वाटलं तर ‘पक्ष’ बदला!
‘पक्ष’ बदलणे हा आता रोजचाच कार्यक्रम झाला आहे. मंगळवेढ्याचे कवी शिवाजी सातपुते यांनी त्यावर मार्मिक
भाष्य केले.
‘‘ना रुपया घसरला,
ना डॉलर घसरला
लाजून लोकशाही म्हणाली
डोक्यावरून पदर घसरला.’’
उदयनराजे भोसले हे पंधरा वर्षे राष्ट्रवादीत होते. ही पंधरा वर्षे आपण घुसमटत होतो असे ते म्हणाले. यावर शरद पवार यांनी, ‘‘घुसमटीतून बाहेर पडायला पंधरा वर्षे लागली काय?’’ असा प्रश्न विचारला!

(‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीने सध्याच्या ‘पक्षांतरी’ राजकारणावर एक कविसंमेलन आयोजित केले. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून आलेले हे सर्व कवी. त्यांनी जणू विडंबनात्मक लोकभावनाच व्यक्त केली. शिरूर तालुक्यातील कवी भरत दौंडकर यांची ही कविता…)
कावळे उडाले स्वामी…
पक्ष श्राद्धाला थांबूनही
निवद मिळंल का नाही
याची आता कोण देईल हमी?
नव्या पिंडांच्या शोधात
कावळे उडाले स्वामी…!

दुसऱयांचे पिंड उचलणारे,
आता स्वतःला काकस्पर्श होऊ नये म्हणून
रात्रंदिवस जागे आहेत
नव्या वॉशिंग पावडरखाली
जुना मळ धुऊन घ्यायला
रांगा लावून उभे आहेत
स्वामी, रांगा लावून उभे आहेत…!

कावळय़ांनो जा, जातीपातीनो जा,
आरक्षणाची महाआरती चालू आहे
बेकारांनो बाजूला व्हा…
सध्या फक्त नेत्यांचीच
मेगा भरती चालू आहे…!

सरडय़ांना आता रंग बदलायची
गरजच नाही
माणसं आहेत ना,
निळय़ातून हिरवी
हिरव्यांतून भगवी झालेली,
सगळे रंग बदलून बदलून
पुन्हा बेरंग झालेली
या बेरंग बेवफाईचा
तुम्ही टिळा काय लावून घेता?
अन्नावर घोटलेली त्यांची
लाळ काय घोटून घेता…?

आपल्या संकटावरचा
उगवलेला स्वप्नांचा हिरवा वाफा तोडून
हे पळून चालले आहेत गेंडे…
शेजेवरची चादर बदलावी
तसे बदलत आहेत यांचे झेंडे…!

कमळाची पाकळी पाकळी वाढत आहे
घडय़ाळाचे काटे काटे गळत आहेत
‘ईडी’च्या सरणावर जळण्याआधी
मुडदेसुद्धा जिवंत होऊन
सैरावैरा पळत आहेत…
सीबीआयची नाळ ठोकण्याआधी
लंगडी जनावरंसुद्धा
उन्मत्त होऊन उधळत आहेत स्वामी…!

इकडून तिकडे आधी
खुजे जात होते
आता राजे पण जात आहेत
स्वतःची हवा निघून जाईल
म्हणून आळ रयतेवर घेत आहेत
शिवबा, तुझ्या स्वराज्याला
बघ ना कशा,
इंच इंच जखमा होत आहेत…!

कपाळावरचं कुंकू बदलून
जर सुखानं नांदत असेल
तुमची लोकशाही
तर आमची काहीच हरकत नाही
इच्छा इतकीच,
नखावरच्या शाईपेक्षा
मोठी होऊ नये पेशवाई…!

आमची तेव्हाही हरकत नव्हती
जेव्हा खिशातच राहिले होते राजीनामे
स्वबळाचं फिटलं धोतर
आणि काडीमोड घेता आला नाही
म्हणून पुन्हा लावून घेतला म्होतर…!

पाचुंडे पाचुंडे पचवून पावन झालेला पंजा
आता फक्त एकाच पिंडीत मावत आहे
इंजिनालाच माहीत नाही
ते कोणत्या दिशेने धावत आहे…!

माझ्या बहुजनांचे असे कसे मंथर झाले
एवढा मोठा जनसागर पिळूनही
वंचितांचे संचित वंचितच राहिले
इतक्या वेळा कात टाकूनही
इतक्या त्वेषाने सळसळूनही
सगळे कणे गल्लीतच राहिले
मग दोन तोंडाचे निळे साप
दिल्लीत कसे काय गेले?
आता एका तोंडाने बोललेले
दुसऱया तोंडाला आठवत नाही
आणि आठवले तरी
ऐत्या बिळातून उठवत नाही…!

फुटाण्यांचे विडंबन
रामदास फुटाणे यांच्या प्रतिभेस बहर यावा असे वातावरण सध्या महाराष्ट्रात आहे. ‘पक्षांतरा’वरील त्यांच्या काही वात्रटिका म्हणजे लोकांच्या ‘मन की बात’ आहेत.

 • इतिहास
  हळूहळू मन
  भूतकाळाकडे वळलं
  मोगलांनी धर्मांतरं कशी केली
  हे पक्षांतरामुळे कळलं!
 • पक्षांतर
  सावत्र पक्षाशी
  भ्रातृभाव जोडला
  पितृपक्षाच्या उंबरठय़ावर
  मातृपक्ष सोडला!
  येत्या पंधरवडय़ात
  कावळे खाली येतील
  आपापला पिंड शोधताना
  गोंधळून जातील!
 • निष्ठा
  बुडत्या जहाजातून
  उडय़ा मारणाऱया
  उंदराकडे पहात
  बाप्पा पायाजवळील उंदरास म्हणाले-
  ‘‘मीही दहा दिवसांत बुडणार आहे.
  तूही का जात नाहीस?’’
  डबडबलेले डोळे म्हणाले –
  बुडण्याची भीती नाही
  पक्षांतरासारखा कसा वागेन?
  ते मिठाला जागत नाहीत
  मी बुडेपर्यंत जागेन!
  रामदास फुटाणे यांनी उंदराचे रूपक मांडले. नितीन गडकरी यांनी जाहीर सभेत सांगितले, पक्ष बदलणारे सगळे ‘उंदीर’ आहेत.

नवे विनोद
पक्षांतराकडे सध्या गांभीर्याने घेण्याची गरज नाही. ते ‘व्हायरल तापा’प्रमाणे आहे. हा ताप कुणालाही येऊ शकतो. सर्वच पक्षांचे उमेदवारी वाटप पूर्ण झाल्यावर हा ‘ताप’ अधिक वाढलेला दिसेल. निष्ठावंतांना नवा पर्यायी शब्द ‘निसटावंत’ आला. तो शब्द उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत खेळताना दिसेल. पक्षांतरावर आणखी एक विनोद या काळात गाजला.
कार्यकर्ता – साहेब, आज कोणता झेंडा घेऊ हाती?
नेता – तू फक्त हातात दांडा ठेव. दांडय़ावर कोणता झेंडा लावायचा ते नंतर पाहू.
त्यावर एक राजकीय सुविचार सर्वत्र प्रसिद्ध झाला. ‘‘कार्यकर्त्यांनो, सकाळी उठल्यावर प्रचार सुरू करण्यापूर्वी आपला नेता त्याच पक्षात आहे का, याची खात्री करून मगच प्रचाराला सुरुवात करावी!’’
पक्षांतराच्या विनोदाचे शेवटचे ‘टोक’ काय? ते पुढच्या विनोदावरून समजेल.
‘‘मुख्यमंत्री आणि उद्धवजी केबिनमध्ये बोलत बसले होते. अचानक आपला गण्या तिथे कुतूहलाने बघायला गेला. तिथे उदयनराजे भोसले, भास्कर जाधव, गणेश नाईक, पिचड, पद्मसिंह पाटील, सचिन अहिर वगैरे लोकांना बघून तो ओरडत बाहेर आला, ‘मुख्यमंत्री आणि उद्धवजींनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला’ म्हणून.’’

राजीनामे
अनेक आमदारांनी निवडणुकीच्या तोंडावर आमदारकीचे राजीनामे दिले. त्या मतदारसंघात पोटनिवडणूक होणार नाही. पण सातारचे खासदार उदयनराजे भोसले यांनी लोकसभा निवडणुकीनंतर तीन महिन्यांत राजीनामा दिला. त्यामुळे तेथे पोटनिवडणूक घ्यावी लागेल व हा भुर्दंड सरकारच्या तिजोरीवर पडेल. अशा पोटनिवडणुकांचा खर्च राजीनामा देऊन पक्षांतर करणाऱ्या आमदार, खासदारांकडून वसूल करावा अशी एक सूचना आली होती. ती योग्य आहे. पक्ष बदलणारी सगळीच माणसे स्वार्थी व संधीसाधू असतात असे समजण्याचे कारण नाही. पक्षश्रेष्ठींबरोबर विचारप्रणालीविषयी मूलभूत स्वरूपाचे वैचारिक मतभेद झाल्यास पक्ष बदलले जातात. राजीव गांधींबरोबर शहाबानो प्रकरणात अरिफ मोहम्मद खान यांचे मतभेद झाले व त्यामुळे आरिफ मोहम्मद खान यांनी काँग्रेस सोडली. गेल्या काही वर्षांतले पक्षांतराचे हे आदर्श उदाहरण ठरावे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ात नेहरू मराठी माणसांवर अन्याय करतात, महाराष्ट्राशी आकसाने वागतात म्हणून केंद्रीय मंत्रीपदासह काँग्रेसचा त्याग करणारे चिंतामणराव देशमुख हे एक आदर्श उदाहरण. देशात ज्या पक्षाची किंवा नेत्याची हवा असते त्यांच्या बाजूने पक्षांतराची लाट निर्माण होते. हे मी इंदिरा गांधी यांच्या वैभवाच्या काळात पाहिले. तसे अठरापगड लोकांनी निर्माण केलेल्या जनता पक्षाच्या काळातही पाहिले. पक्षांतराला कोणतीही वैचारिक निष्ठा नसते. आणीबाणीत जगजीवनराम यांनी व नंतर यशवंतरावांनी पक्ष सोडला, पण शेवटी ते पुन्हा काँग्रेस पक्षात आले. शिवसेनेतून बाहेर पडलेले अनेकजण पुन्हा शिवसेनेत आले. ‘प्रत्येक माणसाची एक किंमत असते’, असे ब्रिटनचा पहिला पंतप्रधान रॉबर्ट वॉलपोल म्हणत असे. अशी किंमत आज मोजली जात आहे. मोजून देणारे व मोजून घेणारे एकाच तागडीत बसले आहेत. न्यायाची भाषा त्यामुळे करायची कोणी?

गेल्या चारेक महिन्यांतील पक्षांतरे हा जनतेच्या दृष्टीने थट्टेचा विषय ठरला, पण संसदीय लोकशाहीत हे घडायचेच. पक्षांतरांवर समाज माध्यमांवर चाललेला एक विनोद देतो व हा विषय संपवतो.

‘इतिहासात नोंद राहील की,
2019च्या पावसाळय़ात
बेडकांपेक्षा
नेत्यांनी जास्त उडय़ा
मारल्या होत्या…’

Twitter- @rautsanjay61
Email- rautsanjay61[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या