रोखठोक – ‘वीर सावरकर’ अंदमानातले आणि रत्नागिरीतले!

5393

rokhthokवीर सावरकरांचे क्रांतिकार्य अमर आहे. 14 वर्षे अंदमानात त्यांनी यातना भोगल्या. अटी, शर्तींवर त्यांनी अंदमानातून सुटका करून घेतली. सावरकरांनी बाहेर यावे ही सगळ्यांचीच इच्छा होती. सावरकरांना इंग्रजांनी फाशीची शिक्षा ठोठावली असती तर सावरकर हसत हसत फासावर गेले असते. सावरकरांनी मृत्यूला अनेकदा चकवले. त्यांनी अंदमानानंतरचे रत्नागिरीतले आयुष्यही राष्ट्रीय कामासाठीच अर्पण केले.

स्वातंत्र्य लढ्यात आणि देश घडविण्यात कोणतेही योगदान नसलेले लोक स्वातंत्र्यवीरांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करतात. आता ही फॅशन झाली आहे. वीर सावरकरांवरून पुन्हा वादळ उठले आहे. वीर सावरकर यांनी इंग्रजांची माफी मागितल्यामुळेच त्यांची सुटका झाली. सावरकर हे माफीवीर आहेत असे आरोप पुनःपुन्हा होत आहेत. महात्मा गांधी, पंडित नेहरू यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील सहभागाबद्दलही अनेकदा शंका उपस्थित केल्या गेल्या; पण वीर सावरकर व त्यांच्यासारख्या असंख्य सशस्त्र क्रांतिकारकांच्या वाट्याला ज्या यातना, छळ अंदमानच्या तुरुंगात आला तशा यातना गांधी, नेहरू, बोस, सरदार पटेलांच्या वाट्याला आल्या नाहीत. काही क्रांतिकारक फासावर गेले. सावरकरांसारखे काही अंदमानच्या काळकोठडीत 14 वर्षे रोज फासावर जात राहिले. वीर सावरकर इंग्रजांची सपशेल माफी मागून सुटले हे अर्धसत्य आहे आणि समजा अंदमानातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी माफीचा ‘डाव’ खेळला असेल तर त्यात काही चूक असेल असे मला वाटत नाही. सावरकरांनी अंदमानातून बाहेर पडण्यासाठी ‘माफीनाट्य’ केले असेल तर ते भीतीपोटी नाही किंवा देशविरोधी नाही. राजकारणात असे गनिमी कावे जगभरात खेळले गेले आहेत. ‘‘सावरकरांसारखी उत्कट चैतन्यमय व्यक्ती कारागृहात जीवन कंठीत असलेली मी सहनच करू शकत नाही,’’ असे सावरकरांचा इंग्रज मित्र डेव्हिड गार्नेरचे मत होते. म. गांधींपासून सगळ्यांचेच हे मत होते.

लंडन ते रत्नागिरी
वीर सावरकरांना लंडनमध्ये 13 मार्च 1910 रोजी अटक झाली. ब्रिटिश सरकारने त्यांना 50 वर्षांची शिक्षा ठोठावली, पण ते 6 जानेवारी 1924 रोजी जवळजवळ 14 वर्षे काळ्यापाण्याची शिक्षा भोगून मुक्त झाले. परंतु मुक्ततेनंतर राजकारणात सहभागी होणार नाही ही शर्त असल्यामुळे त्यांना ब्रह्मदेशाच्या थिबा राजाप्रमाणे रत्नागिरीत स्थानबद्ध करून ठेवण्यात आले. परवानगी घेतल्याशिवाय त्यांना रत्नागिरी जिल्ह्यात संचार करता येत नसे. रत्नागिरीतील त्यांच्या वास्तव्याला दि. 8 जानेवारी 1924 ला प्रारंभ झाला. त्यांनी रत्नागिरी हिंदू महासभा दि. 23 जानेवारीला स्थापन केली. पुढे हो-ना करता इंग्रज सरकारने त्यांना 13 वर्षे 5 महिन्यांच्या स्थानबद्धतेनंतर म्हणजे 10 मे 1937 रोजी विनाअट मुक्त केले. इंग्रज राजवटीत कोणी प्रसंगानुसार देशभक्त बनले तर कोणी अपघाताने वा योगायोगाने देशभक्तीचा आश्रय घेतला, पण देशभक्तीचे बुद्धीपुरस्पर सतीचे वाण घेतलेला अभिजात, ज्वलंत नि अमर देशभक्त कसा असतो ते सावरकरांच्या जीवन संघर्षावरून दिसून येते. अंदमानातून सावरकर रत्नागिरीत आले. एका परीने तो खुला तुरुंगच होता. रत्नागिरीत सावरकरांनी राजकीय पथ्ये पाळली; पण या काळात त्यांनी सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक कार्य केले ते महत्त्वाचे. रत्नागिरीत सावरकरांनी अस्पृश्य निवारणाचे मोठेच कार्य केले. त्या काळी मंदिरांमध्ये अस्पृश्यांना प्रवेशबंदी होती. त्यावरच सावरकरांनी घाव घातला. रत्नागिरीतील विठ्ठल मंदिरात एक प्रसंग घडला. सावरकरांनी विठू मांग याच्यासह तेथे प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. सावरकरांना प्रवेश मिळाला, पण विठूला मात्र विरोध झाला. हाच प्रसंग पुढे सावरकरांनी दानशूर व्यक्तिमत्त्व भागोजी शेठ कीर यांच्यामार्फत उभारलेल्या स्वतंत्र पतितपावन मंदिराच्या निर्मितीसाठी कारणीभूत ठरला. अस्पृश्यांसह सर्व जातीधर्माच्या लोकांना मंदिरात मुक्त प्रवेश मिळावा, तेथे पूजाअर्चा करता यावी यासाठी सावरकरांनी हे मंदिर उभारले. या मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करणारा विठू पहिला अस्पृश्य ठरला. पुढील काळात अनेक मंदिरे सावरकरांमुळे अस्पृश्यांसाठी खुली झाली. एवढेच नव्हे तर सर्व जातीजमातींच्या लोकांच्या ‘सहभोजनां’चाही धडाका सावरकरांनी लावला. आंतरजातीय विवाह घडवून आणले. रत्नागिरीतील स्थानबद्धतेत त्यांनी हिंदू धर्माच्या अधःपतनाला कारणीभूत ठरलेल्या जातीव्यवस्थेच्या बेड्या तोडण्याचे जे कार्य केले ते अजोडच म्हणावे लागेल.

अफाट लोकप्रियता
अंदमानातून मुक्त केल्यावर सावरकरांना रत्नागिरीत ठेवण्यात आले, पण तेथेही सावरकरांभोवती कार्यकर्ते गोळा होऊ लागले. सावरकरांशी संबंध ठेवणे, आपल्या घरी आश्रय देणे हे त्या काळी जोखमीचे होते. त्यांना कोण कोण भेटतात, काय काय चर्चा चालते यावर पोलिसांची नेहमी पाळत असे. सावरकरांना मुक्त केले ते राजकारणात भाग घेणार नाही या अटीवर. राजकारणात भाग घेतात असे आढळून आल्यास त्यांना पुन्हा कारावास पत्करावा लागेल, असे बजावण्यात आले होते. तरीही चळवळे तरुण त्यांच्या अवतीभवती जमू लागलेच. शहरातून सावरकर पायी चालले की लोक त्यांच्याकडे आदराने पाहत. एकमेकांना खुणावून म्हणत, हेच, हेच ते सावरकर अंदमानात होते ना? बोटीच्या संडासाच्या भोकातून उसळत्या सागरात उडी घेऊन इंग्रजांना चकविले ते सावरकर हेच. अंदमानात घाण्याला बांधून इंग्रजांनी छळले, भर तारुण्यात देशासाठी दुःख सोसले ते सावरकर हेच. अशिक्षित, सुशिक्षित वर्ग, नोकरपेशाचे लोक आदराने, पण भीतभीतच सावरकरांकडे पाहत. डॉक्टर, वकील, सरकारी नोकर त्यांना टाळत असत. भेट झालीच तर दुरूनच नमस्कार करून पुढे जात. सावरकरांशी ओळख आहे असे दाखविणे हे धोक्याचे आहे असे समजत. काळी टोपी, टोकदार मिशा, बाजूचे लांब कल्ले, डोळय़ास चष्मा, अंगात पांढरा कोट, नेसण्याला धोतर, हातात छत्री अशा वेशात लोकांना त्यांचे दर्शन होई व या तेजस्वी बाणेदार पुरुषसिंहास ते आदराने वंदन करीत. विठ्ठल मंदिरात सावरकरांचे भाषण होणार असे जाहीर होताच प्रचंड गर्दी जमत असे. त्यांच्या वाणीचा ओजस्वी ओघ सुरू होताच सर्व वातावरण भारावून जात असे. सभा संपल्यावर जो तो आपापसात कुजबुजायचा की सावरकर म्हणतात ते खरे. असे भाषण आयुष्यात ऐकले नाही!

गांधीजी रत्नागिरीत
रत्नागिरीत सावरकरांना भेटण्यासाठी अनेक महत्त्वाचे लोक आले. त्यात महात्मा गांधी होते. महात्मा गांधींनी सर्व देशभर राजकीय लोकजागृतीसाठी दौरा काढला. या दौऱ्यात ते रत्नागिरीस आले. देशभक्त सावरकरांवर राजकारणात भाग घेण्यास बंदी होती आणि म. गांधी हे खादी व राजकीय विधायक कार्याच्या प्रचारार्थ बाहेर पडलेले. असे असल्याने सावरकर हे म. गांधींना भेटण्यास गेले नाहीत. महात्माजींनी आपल्या भाषणात सावरकरांच्या सामाजिक चळवळीचा गौरव करून भेटण्याची इच्छा प्रकट केली. तात्याराव यांनी श्री. विष्णुपंत दामले यांना चिठ्ठी देऊन महात्माजींकडे पाठविले. विष्णुपंत दामले महात्माजींना भेटण्यास आले, पण स्वयंसेवक त्यांना भेट घेऊ देईना. त्यांना विष्णुपंतांचा फटकळ स्वभाव माहीत होता, पण दामले यांनी फक्त चिठ्ठी देऊन महात्माजींचे दर्शन घेऊन व त्यांना नमस्कार करून मी परत येतो असे सांगितल्याने भेटण्यास परवानगी देण्यात आली. वेळात वेळ काढून महात्माजी सावरकरांच्या निवासस्थानी भेटण्यास गेले. दोन देशभक्तांच्या भेटीचा हा क्षण होता. इंग्लंडमध्ये असताना एकमेकांना परिचित होते. आफ्रिकेतील सत्याग्रहाच्या प्रचारार्थ हिंदी माणसांना जाणीव देण्यासाठी महात्माजींनी जो संपर्क हिंदी माणसांशी ठेवला त्यामुळे परस्परांचा संबंध आला होता, पण राजकीय मते भिन्न असल्याने दोघे एकत्र कार्य करू शकले नाहीत. सावरकर ज्वलंत जहाल पुढारी. इंग्लंडमधील त्यांच्या हालचाली या सशस्त्र क्रांतीच्या मार्गातील होत्या. विद्यार्थी त्यांच्याकडे आदराने पाहत तर काही भीतीने पाहात. महात्मा गांधी आणि सावरकरांच्या स्वातंत्र्य मिळविण्याच्या मार्गात भिन्नता असल्याने त्यांच्यात जे मतभेद होते त्यामुळे त्या दोघांत अधिक परिचय झाला नाही. पुष्कळ वर्षांनंतर हे दोन देशभक्त एकमेकांस भेटले. अस्पृश्यता व स्वदेशी यावर दोघांची चर्चा झाली. एकमत झाले. सावरकर करीत असलेल्या कार्याबद्दल महात्मा गांधींनी आपल्या भाषणात धन्यवाद दिले. स्वातंत्र्य मिळविण्याच्या लढय़ातील महात्मा गांधींची अहिंसा ही सावरकरांना मान्य नव्हती. म. गांधींनी भेटीत मात्र शुद्धीबाबत दोघांत बरीच चर्चा केली. महात्माजी म्हणाले, बळजबरीने मनुष्य बाटू शकत नाही तर मग शुद्धी कशाला हवी? तेव्हा सावरकरांनी आज वस्तुस्थिती काय आहे? खाणे, बळजबरीने बाटवणे यावर ‘मी बाटलो’ या समजुतीवर उपाय म्हणून शुद्धिसमारंभ करणे जरुरी आहे हे दाखवून दिले. चर्चा संपली. निघता निघता महात्माजींनी सावरकरांच्या पत्नीला भेटण्याची इच्छा प्रकट केली. माई (यमुनाबाई) सावरकर आल्या. त्यांना महात्माजी व कस्तुरबा यांनी नमस्कार केला व महात्माजी कस्तुरबांना म्हणाले, आपल्या पतीला 50 वर्षांची काळ्या पाण्याची खडतर शिक्षा झाली असता मनोधैर्य दाखवून संकटास तोंड दिले त्या या थोर साध्वीला नमस्कार करूया. स्वदेशी व अस्पृश्यता निवारण या दोन्ही कार्याला आपला आशीर्वाद असू दे, असे महात्माजी म्हणाले. स्वा. सावरकर म्हणाले, अवश्य अवश्य. दोघा देशभक्तांनी एकमेकांना वंदन करून निरोप घेतला.

डॉ. आंबेडकर व सावरकर यांची भेट
वराडकर खून खटल्यात आरोपीच्या वतीने काम चालविण्यासाठी बॅ. बाबासाहेब आंबेडकर रत्नागिरीस आले. येथे आल्यावर त्यांची व सावरकरांची भेट होण्यासाठी श्री. डी. एन. मलुष्टे यांना सावरकरांनी पाठविले व निमंत्रण दिले. तात्यारावांनी स्वतः डॉ. आंबेडकरांची भेट घेतली. या वेळी डॉ. आंबेडकरांनी स्पृश्य हिंदू समाजावर कडक टीका केली. समाज कसा जुलूम करीत आहे, हिंदू सभा ढोंगी आहे, असे सांगितले. झालेल्या धार्मिक जुलमामुळे ते चिडलेले होते. ते हिंदू समाजाबद्दल तुच्छतेने बोलत होते. तात्यारावांनी याबाबतीत आंबेडकर यांना नीट समजावून सांगितले. बरीच चर्चा होऊन आंबेडकरांचे एक व्याख्यान विठ्ठल मंदिरात ठेवण्यात आले. ते त्यांनी मान्य केले. पण या सामाजिक चळवळीच्या विरुद्ध असणाऱ्या मंडळींनी विशेषतः कोर्टातील वकील मंडळींनी सावरकरांविरुद्ध डॉ. आंबेडकरांना या चळवळीला कोणाचाही पाठिंबा नाही, सभेस लोक जमणार नाहीत, दंगल होईल, असा प्रचार केल्यामुळे व्याख्यानाचा बेत डॉ. आंबेडकरांनी बदलला. तात्यारावांना हे कळताच त्यांनी येऊन आंबेडकरांची भेट घेतली. पुढाऱ्यांनी कधी माघार घेऊ नये असे सांगितले. सुधारणा म्हणजे रुढीविरुद्ध सामनाच आहे. सर्व लोक अनुकूल असणार नाहीत. विरोधकांना तोंड देऊन आपण सभा पार पाडू इत्यादी समजावून सांगून समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण यश न येता व्याख्यान स्थगित करण्यात आले.

क्रांतिकारकांचा ओघ
राष्ट्रीय कीर्तीचे एक क्रांतिकारक भाई परमानंद हे पंजाबमधून रत्नागिरीस खास सावरकरांना भेटण्यासाठी आले. अंदमान कारावासात सावरकर व परमानंद एकत्र होते. परमानंद यांच्या स्वागतासाठी सावरकर स्वतः हजर होते. सेनापती बापट हेदेखील सावरकर यांना भेटण्यासाठी आले. सेनापती बापटही स्वातंत्र्य लढय़ातील एक क्रांतिवीर होते. प्रसिद्ध क्रांतिकारक व अंदमानातील सावरकरांचे सहप्रवासी पृथ्वीसिंग ठाकर यांनी रत्नागिरीत येऊन गुप्तपणे सावरकरांची भेट घेतली. ते योगी पुरुषाच्या वेशात आले. पतितपावन मंदिरात येऊन त्यांनी सावरकरांची चौकशी केली. त्यांना सावरकरांच्या भेटीस नेण्यात आले. तेथे ते सावरकरांना मिठी मारून गहिवरले. दोघांच्या डोळय़ांतून बराच वेळ अश्रुधारा वाहत होत्या. युसूफ मेहर अली, कवी माधव ज्युलियन, ज्ञानकोशकार डॉ. केतकर, नेपाळचे राजपुत्र हेमचंद्र समशेर जंग रत्नागिरीत येऊन सावरकरांना भेटले व नेपाळ हिंदुराष्ट्रासाठी मार्गदर्शन घेतले. सावरकर रत्नागिरीत सरकारी अटी-शर्तींचे पालन करीत. अलिप्त असल्यासारखे वागत, पण त्यांना जे करायचे ते वेगळया मार्गाने करीतच होते. अंदमानात फुकट सडत राहण्यापेक्षा गनिमी कावा वापरून आधी बाहेर पडावे व मग मातृभूमीची सेवा करावी असे त्यांनी ठरवले व त्यांना सगळ्यांचाच पाठिंबा होता. सावरकर अंदमानच्या काळकोठडीत 14 वर्षे राहिले. सावरकरांना ‘माफीवीर’ म्हणणाऱ्या कोणीही तेथे 72 तास राहून दाखवावे.

भाषाशुद्धीचे आंदोलन
सावरकरांनी रत्नागिरीत भाषाशुद्धी, अस्पृश्यता निवारण, हिंदू संघटन असे कार्य केले. इंग्रजी शब्दांना ‘मराठी’ शब्द निर्माण करून त्यांनी इंग्रजी रोजच्या जीवनातून हद्दपार केली. दिनांक, बोलपट, टंकलेखन, परिचारिका, महापौर या शब्दांची आधी टवाळी करणारे लोक आता तेच शब्द अभिमानाने वापरीत आहेत. हवा हा शब्द परकीय आहे. सावरकरांपासून प्रेरणा घेऊन माधव ज्युलियन यांनी भाषाशुद्धीवर काम केले. रत्नागिरीतल्या एका भाषणात माधवराव सांगतात, ‘‘हवा हा शब्द परकीय आहे. त्याला मराठीत शब्द कोणता द्यावा याचा मी बरेच दिवस विचार करीत होतो, पण शब्द सुचेना. एक दिवस रस्त्याने फिरत असताना एक शेतकरी माझ्या जवळून गेला. जाता जाता तो मला म्हणाला, ‘राव, आज काय गार वारं सुटलं आहे.’ हा शब्द ऐकताच माझ्या विचारास धक्का बसला. वारं वारं तीच ही हवा, पण सावरकरांमुळेच हे शक्य झाले!

सावरकर अंदमानात ‘राजद्रोही’ म्हणून गेले ते देशभक्त म्हणूनच व अटी, शर्तींवर 14 वर्षांच्या यातनातून सुटका करून घेतली तीसुद्धा देशभक्त म्हणूनच. अंदमानातून सुटल्यावर त्यांनी राजकीय कार्य केले नाही, पण सार्वजनिक कार्य करून दाखवले. सावरकर भ्याड नव्हते. सावरकरांना ब्रिटिशांनी फाशीची शिक्षा ठोठावली असती तर ते अभिमानाने, हसत हसत फाशीच्या स्तंभावर चढले असते, पण त्यांनी मृत्यूला चकवले. वारंवार चकवले. जे जीवन मिळाले ते त्यांनी राष्ट्राच्याच कारणी लावले. अंदमानातले सावरकर वेगळे आणि रत्नागिरीचे सावरकर वेगळे होते. रत्नागिरीच्या सावरकरांवरही मी तितकेच प्रेम करतो.

Twitter- @rautsanjay61
Email- [email protected]

आपली प्रतिक्रिया द्या