जाणून घ्या ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या या गोष्टी… वाचा सविस्तर…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकारला दणका दिल्यानंतर ज्योतिरादित्य सिंधिया चर्चेत आले आहेत. ज्योतिरादित्य शिंदे राजघराण्यातील असून त्यांचे राहणीमान राजेशाही आहे. त्यांची तरुणांमध्येही लोकप्रियता आहे. राजघराण्याशी संबंधित असल्याने ग्वालेरमध्ये त्यांचा दबदबा आहेच. तसेच त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीतूनही जनतेवर छाप पाडली आहे. आपल्याला जनसेवा करता येत नसल्याने आपण काँग्रेसचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्या ट्विटचीही चर्चा होत आहे.

1 जानेवारी 1971 मध्ये ज्योतिरादित्य यांचा सिंधिया राजघराण्यात जन्म झाला. त्यांना राजकारणासह शूटिंग, क्रिकेट, तिरंदाजी आणि कार रेसिंगची आवड आहे. ज्योतिरादित्य यांनी 1993 मध्ये हॉर्वर्ड युनिव्हर्सिटीमधून इकॉनॉमीची डिग्री घेतली. 2001 मध्ये त्यांनी स्टॅनफोर्ड ग्रॅज्यूएट स्कूल ऑफ बिजनेसमधून एमबीएचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी अमेरिकेत चार वर्ष काम केले. त्यांच्याकडे संयुक्त राष्ट्र, न्यूयॉर्क आणि मार्गेन स्टेनलेमध्ये काम करण्याचा अनुभव आहे. बडोद्यातील गायकवाड घराण्यातील प्रियदर्शनी राजे यांच्याशी ज्योतिरादित्य सिंधिया यांचा 12 डिसेंबर 1994 रोजी विवाह झाला आहे. जगातील 50 सर्वात सुंदर महिलांच्या यादीत प्रियदर्शनी यांनी स्थान मिळवले होते. प्रियदर्शनी आणि ज्योतिरादित्य यांना दोन मुले आहेत. त्यांच्या मुलाचे नाव महाआर्यमन तर मुलीचे नाव अनन्या आहे. महाआर्यमन याने देहरादूनमधून शिक्षण पूर्ण केले आहे. सध्या तो अमेरिकेतील येल युनिव्हर्सिटीत शिक्षण घेत आहेत. अनन्या दिल्लीमधील ब्रिटीश स्कूलमध्ये शिक्षण घेत आहे. तिलाही घोडेस्वारी आणि साहसी खेळांची आवड आहे.

राजघराण्याशी संबंधित असल्याने ज्योतिरादित्य यांची जीवनशैली राजेशाही आहे. ते 400 खोल्या असणाऱ्या राजमहालात राहतात. 1874 मध्ये युरोपिअन शैलीत उभारण्यात आलेल्या या राजमहालाचे नाव जयविलास पॅलेस आहे. या राजमहालाच्या 40 खोल्यांमध्ये आता संग्रहालय आहे. सुमारे 40 एकर परिसरात हा राजमहाल पसरला आहे. राजमहालातील दरबार हॉल 100 फूट लांब, 50 फूट रुंद आणि 41 फूट उंच आहे. महालाच्या छताला 3500 किलोचे दोन झुंबर लावलेले आहेत. बेल्जिअमच्या कामगारांकडून हे झुंबर तयार करण्यात आले आहेत. नाइटहूड म्हणून सन्मानित करण्यात आलेल्या मायकल फिलोसे यांनी हा राजमहल उभारला आहे. राजमहालाच्या डायनिंग हॉलमध्ये चांदीची ट्रेन आहे. या चांदीच्या ट्रेनच्या सहाय्याने जेवण वाढले जाते. 1874 मध्ये सिंधिया यांचा राजमहल उभारण्यात आला. त्यावेळी या राजमहलाची किंमत 1 कोटी होती.त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील श्रीगोंदा येथे सिंधिया यांची 19 एकर आणि लिंबण गावात 53 एकर जमीन आहे. ज्योतिरादित्य यांनी 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे 32 कोटी 64 लाख 18 हजार 412 कोटींची संपत्ती आहे.

राजघराणे आणि राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबात असल्याने ज्योतिरादित्य सिंधिया यांना लहानपणापासूनच राजकारणाची आवड होती. वडील माधवराव शिंदे यांच्या निधनानंतर ते सक्रीय राजकारणात आले. फेब्रुवारी 2002 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत विजय मिळवत ज्योतिरादित्य सिंधिया लोकसभेत गेले. 2004 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी पुन्हा विजय मिळवला. केंद्रात मनमोहन सिंग सरकारमध्ये 28 ऑक्टोबर 2012 ते 25 मे 2014 या काळात ते केंद्रीय मंत्री होते.