
सामना प्रतिनिधी । मुंबई
गेल्या काही दिवसांत धावत्या लोकलवर दगडफेक करण्याचे प्रकार अचानक वाढल्याने रेल्वे सुरक्षा दलाने अशा घाटकोपर व दादर रेल्वे मार्गावरील दहा धोकादायक स्पॉटची निवड करीत त्या ठिकाणी सीसीटीव्ही लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी कुर्ला ते दादर भागांत चार ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात आले असून उर्वरीत सहा सीसीटीव्ही कॅमेरे लवकरच लावण्यात येणार आहेत. दरम्यान, शीव-माटुंगा दरम्यान लोकलवर पुन्हा बाटली फेकल्याचा प्रकार गुरुवारी सायंकाळी घडला असून याप्रकरणात दोघांना तर वडाळ्यातील आणखी एका प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली आहे.
दगडफेकीच्या घटनांनंतर आरपीएफने कांजूरमार्ग विक्रोळी-घाटकोपर – विद्याविहार भागांत 16 आरपीएफ जवानांचे पथक तैनात केले. तसेच साध्या वेषात लोकलमध्ये आरपीएफ जवानांना उभे केले. जीआरपी आणि शहर पोलिसांच्या मदतीने झोपडपट्टीत जाऊन जनजागृती केली. दादर-कुर्ला-विद्याविहार परिसरात जेथे रेल्वे क्रॉसिंग आहे, पादचारी पूल आहे, झोपडपट्टी आहे अशा एकूण दहा ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असल्याचे रेल्वे सुरक्षा दलाच्या सूत्रांनी स्पष्ट केले.
लोकलवर दगड किंवा बाटली फेकण्याचे सत्र सुरूच असून पुन्हा चालत्या लोकलवर बाटली फेकल्याने एक प्रवाशी किरकोळ जखमी झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी सायन-माटुंगा दरम्यान घडली. या वेळी गस्तीवर असलेल्या आरपीएफ जवानांनी देवेंद्र अशोक बनावकर (30) याला अटक करून लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात दिले. घटनास्थळावरून दोघे पळाले होते. त्यापैकी मनोज जैसवार याला आज अटक करण्यात आली.
दरम्यान, लोकलच्या दरवाजावर उभ्या असलेल्या प्रवाशाच्या हातावर फटका मारून मोबाईल चोरणाऱया दुकलीला वडाळा रेल्वे पोलिसांनी अटक केली. राहुल दिलीप चव्हाण आणि मुस्ताक माणिक मुल्ला अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.


























































