
राज्याचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी सकाळी पत्रकार परिषद घेऊन जीएसटी परतावा, कोरोनाची वाढती प्रकरणे, ओबीसी आरक्षण, राज्यसभा निवडणूक, नामांतरण अशा विविध मुद्द्यांवर सरकार म्हणून महाविकास आघाडी आणि आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका अगदी स्पष्ट शब्दात मांडली. यामुळे विविध प्रश्नावर सरकार काय पावलं उचलत आहे, महाविकास आघाडीची निश्चित दिशा काय तेही त्यांनी स्पष्ट सांगितले.
संपूर्ण देशातील 21 विविध राज्यांची 86 हजार 912 कोटी रुपयांची थकबाकी केंद्राने दिली आहे. त्यापैकी एकूण थकबाकी पैकी महाराष्ट्राची 14 हजार 145 कोटी रुपये इतकी थकबाकीची रक्कम देण्यात आली आहे. अद्याप केंद्राकडून येणारी एकूण रक्कम 15 हजार 502 कोटी रुपये आहे. जीएसटी कायदा अस्तित्वात आला त्यानंतर 2019-20 मधील 1 हजार 29 कोटी रुपये येणे बाकी आहे. 2020-21 मधील 6 हजार 470 कोटी रुपये येणे बाकी आहे. 8 हजार 03 कोटी बाकी आहेत. म्हणजे एकूण 15 हजार 502 कोटी रुपये बाकी आहेत. ती रक्कम लवकरात लवकर राज्याला मिळावा अशी मागणी आणि प्रयत्न आमच्याकडून सुरू राहिल. ते पैसे वेळत मिळाले तर राज्याच्या विकास कामांसाठी त्याचा फायदा होऊ शकले, अशी भूमिका थकबाकी मागण्यामागे असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
कोरोनाची प्रकरणे वाढली, काळजी घ्या, नियम पाळा!
कोरोनाची प्रकरणे वाढायला लागली आहेत. मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीवेळी याची चर्चा झाली. कोरोनाची प्रकरणे वाढणे हे काळजी वाटण्यासारखे आहे. सर्वांनी मास्क वापरणं, गर्दी टाळणं आणि इतर गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. कारण संख्या जर वाढत गेली तर नंतर कशी हाताबाहेर जाते हे पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेच्यावेळी दिसून आलं आहे. तेव्हा आधीच काळजी घेतली पाहिजे. सार्वजनिक आरोग्य विभाग आणि संबंधित विभाग यावर लक्ष ठेवून आहेत, असे त्यांनी सांगितले आहे.
निवडणुकीत ओबीसी आरक्षणासाठी प्रयत्नशील!
निवडणुकीत ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. निवडणुकीत उभे राहण्यासाठीचे ओबीसीचे आरक्षण काढण्यात आले असून एससी आणि एसटी साठीचेच आरक्षण कायम ठेवले आहे. आमचा प्रयत्न आहे की निवडणुका लागतील तेव्हा कुठल्याही परिस्थितीत OBC ना त्यांच्या प्रमाणात उमेदवारी मिळाल्या पाहिजे. तसेच आरक्षण 50 टक्क्यांच्या वर आम्ही जाणार नाही. पण ज्याप्रमाणे मध्य प्रदेशच्या बाबतीत मदत झाली आहे, तशी मदत होण्याच्या दृष्टीकोनातून काम सुरू आहे. बांठीया समिती डाटा गोळा करत आहे.
विरोधीपक्षाने समजून घ्यावे!
जी रक्कम आम्ही मागत आहोत ती आधीची बाकी असलेली रक्कम आहे. आम्हाला जेवढं शक्य असले तेवढा निर्णय पेट्रोल-डिझेलच्या संदर्भात घेतलेला आहे. तसेच सीएनजी गॅसचा दर कमी केला आहे. हे विरोधीपक्षाने समजून घेतले पाहिजे.
नामांतरासोबतच अन्य अनेक प्रश्न महत्त्वाचे
नामांतरणांसंदर्भात वेगवेगळ्या मागण्या आधीपासून सुरू आहेत. महापुरुषांचे नाव देणे हे चांगले आहे. पण यासोबतच अन्य अनेक गोष्टींवरही काम होणे गरजेचे आहे.
आमची मते शिवसेनेच्या उमेदवाराला!
पाच उमेदवार नक्की निवडून येणार हे क्लिअर आहे. सहाव्या जागेसाठी शिवसेना आणि भाजपने उमेदवार दिला आहे. 3 तारखेला कुणी माघार घेणार की 7 जण लढणार हे स्पष्ट होईल. गेल्यावेळी शिवसेनेने आम्हाला मदत केली होती. त्यामुळे आमची यंदाची मते शिवसेनेच्या उमेदवाराला जाणार. राहिला प्रश्न फक्त अपक्षांचा आहे. ते कुठेही दाखवता येणार नाही.


























































