लोकसभा निवडणुकीपूर्वी सत्ताधाऱ्यांवर 759 कोटी रुपयांच्या निधीची खैरात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी राज्य सरकारने सत्ताधाऱ्यांवर निधीची खैरात केली आहे. राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये नागरी सुविधा पुरवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वित्त व नियोजन विभागाने तब्बल 759 कोटी 50 लाख रुपयांच्या निधी दिला आहे. बारामती नगर परिषदेला 223 कोटी तर पुणे महापालिकेला 100 कोटी दिले आहेत. या निधीवाटपात ‘दादा’गिरी दिसून आली आहे.

राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विविध नागरी सेवासुविधा पुरवण्यासाठी नियोजन विभागाने आज निधीचे वाटप केले आहे. विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये रस्ते, पेव्हर ब्लाक, संरक्षक भिंती, सभामंडप, सुशोभीकरण, सौरपथ दिवे, पादचारी पूल, गटाराची कामे, वस्ती सुधारणा,  रस्ते काँक्रीटीकरण अशा कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे.

सत्ताधाऱ्यांवर निधीची खैरात

अजित पवारांच्या नियोजन विभागाने सत्ताधारी पक्षावर खैरात केल्याचे दिसून येते. मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिह्यातील शहापूर-वाडा नगर पंचायतीला 30 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. या निधीतून इतर विकासकामांबरोबरच शहापूरमध्ये एक वातानुकूलित व्यायामशाळा होणार आहे. नाशिकमधील दिंडोरी-पेठ नगर पंचायतीला 30 कोटी रुपये दिले आहेत. अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीवर डोळा ठेवत बारामती नगर परिषदेला सर्वाधिक म्हणजे 223 कोटी 50 लाख रुपयांचा निधी दिला आहे. अजित पवारच पालकमंत्री असलेल्या पुणे महानगरपालिकेला 100 कोटींचा निधी मिळाला आहे.