अहंकारी झाले त्यांना प्रभू रामाने 240 वर थांबवले; आरएसएस नेत्याची भाजपवर बोचरी टीका

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते इंद्रेश कुमार यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपच्या निराशाजनक कामगिरीसाठी त्यांचा ‘अहंकार’ कारणीभूत असल्याचं म्हटलं आहे. निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे भाजपला त्यांच्या वैचारिक मातृसंस्थेकडून टीकेचा सामना करावा लागत आहे.

गुरुवारी जयपूरजवळील कानोटा येथे एका कार्यक्रमात बोलताना इंद्रेश कुमार म्हणाले, ‘ज्यांनी प्रभू रामाची भक्ती केली ते हळूहळू अहंकारी बनले. त्या पक्षाला सर्वात मोठा पक्ष घोषित करण्यात आला होता, परंतु अहंकारामुळे प्रभू रामाने 240 वर थांबवले’.

लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक 240 जागा जिंकणाऱ्या पण बहुमताचा आकडा ओलांडण्यात अपयशी ठरलेल्या भाजपवर वारंवार टीका होऊ लागली आहे. 2014 नंतर पक्षाचं हे सर्वात वाईट प्रदर्शन देखील होतं.

यावेळी कुमार यांनी INDIA आघाडीवर देखील टीका केली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी जनसेवेत नम्रता आवश्यक असल्याचं काही दिवसांपूर्वीच सांगितलं होतं. त्यानंतर आता आरएसएस नेत्याचं हे वक्तव्य आलं आहे.

भागवत म्हणाले, ‘खरा सेवक प्रतिष्ठा राखतो. तो काम करताना शिष्टाचार पाळतो. ‘मी हे काम केलं’ असं म्हणण्याचा घमेंड त्याच्यात नसतो. तोच खरा सेवक म्हणता येईल’, असं म्हणत त्यांनी नरेंद्र मोदींचं नाव न घेता समाचार घेतला.

काही दिवसांपूर्वी भागवत यांनी अहिंसा आणि सत्याच्या तत्त्वांचा हवाला देत सर्वांप्रती नम्रता आणि सद्भावनेची गरज व्यक्त केली होती.