सिद्धू, आमीर खान, आणि नसरुद्दीन शहा देशद्रोही! संघाच्या नेत्याचे विधान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। लखनौ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते इंद्रेश कुमार यांनी काँग्रेसचे नेते नवज्योतसिंग सिद्धू, अभिनेता आमीर खान आणि ज्येष्ठ अभिनेते नसरुद्दीन शहा हे देशद्रोही असल्याचा आरोप केला आहे. तसेच त्यांची तुलना राजपूत राजा जयचंद आणि बंगालचे नवाब मीर जाफर यांच्याबरोबर केली आहे. सोमवारी उत्तर प्रदेशमधील अलीगढ येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी हिंदुस्थानला अजमल कसाब सारखे तरुण नाही तर माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांची गरज असल्याचे म्हटले आहे.

याबद्दल एएनआयने वृत्त दिले आहे. त्यात हिंदुस्थानला कसाब, याकूब आणि इशरत जहाँ यांसारख्या तरुणांची गरज नसून अशा लोकांची गरज आहे जे अब्दुल कलाम यांनी दाखवलेल्या मार्गावरून चालत आहेत. जो कोणी कसाबच्या पावलांवर पाऊल टाकेल त्याला देशद्रोही मानले जाईल. यावेळी आमीर खान, नसरुद्दीन शहा आणि नवज्योत सिंग सिद्धू यांच्यावरही इंद्रेश कुमार बोलले. हे उत्कृष्ट अभिनेते असतील. पण देशद्रोही असल्याने ते सन्मानाचे दावेदार मात्र नाहीत. ही लोकं मीर जाफर आणि जयचंद सारखी आहेत, असेही कुमार यांनी म्हटले आहे.

तसेच यावेळी त्यांनी अयोध्या प्रकरणावरील सुनावणीला होणाऱ्या विलंबावरही भाष्य केले. काँग्रेस, डावे आणि धार्मिक संघटनाच या विलंबास जबाबदार असल्याचा दावाही कुमार यांनी यावेळी केला.