
शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत राबविण्यात येणाऱ्य़ा आरटीई प्रवेशाच्या यंदा 30 हजार 600 जागा अद्याप रिक्त आहेत. राज्यात प्रवेशासाठी 96 हजार 684 जागा उपलब्ध असून त्यांपैकी केवळ 66 हजार 84 जागावरच प्रवेश झाले आहेत.
‘आरटीई’च्या प्रवेशाच्या सोडतीत नाव आलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया पूर्ण होऊन प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेशही पूर्ण होत आले आहेत; मात्र तरीही अजून 30 हजारांपेक्षा अधिक जागा रिक्त राहिल्या आहेत. गेल्या वर्षी वर्ष 2020 मध्ये ‘आरटीई’च्या एक लाख 15 हजार जागा होत्या. त्यात यंदा घट झाली आहे. यंदा केवळ 96 हजार 684 जागाच प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. जागा उपलब्ध असताना आणि प्रतीक्षा यादीतील विद्यार्थी रांगेत असतानाही प्रवेश का होत नाहीत, असा प्रश्न पालक विचारत आहेत.
जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावेत यासाठी आरटीई प्रवेशाची मुदत वाढविण्यात आली आहे. आणखी 20 ते 25 दिवस आरटीईचे प्रवेश होणार आहेत. मुंबई विभाग आरटीई प्रवेशाच्या एकूण 6 हजार 463 जागा उपलब्ध आहेत. त्यांपैकी केवळ 3 हजार 107 जागांवरच प्रवेश झाले आहेत. 3 हजार 356 जागा अजूनही रिक्त आहेत.

































































