
सामना प्रतिनिधी । मुंबई
विक्रोळीतील शिवसेना आमदार सुनील राऊत यांच्याविरुद्ध सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणारा आरटीआय कार्यकर्ता राजेश भिंगार्डे याला शिवसैनिकांनी आज चांगलाच दणका दिला. भिंगार्डेवर कारवाई झालीच पाहिजे यासाठी शिवसैनिकांनी विक्रोळी पोलीस ठाण्यावरच मोर्चा नेला. त्यावर दोन दिवसांत कारवाई करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले.
भिंगार्डे आणि आमदार राऊत यांची ओळख नसतानाही भिंगार्डेने सोशल मीडियावरून त्यांची बदनामी सुरू केली. निवडणुका जवळ आल्यामुळे विरोधी पक्षातील कुणीतही भिंगार्डे याला हाताशी धरून हे राजकारण करत असल्याची चर्चा आहे. भिंगार्डे हा खंडणीखोर आरटीआय कार्यकर्ता असून त्याच्याविरुद्ध विक्रोळी पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल असल्याचेही उघड झाले आहे. त्याने आमदार राऊत यांच्याबद्दल टाकलेल्या पोस्ट डिलीट करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. भिंगार्डे याने आपल्यावरच नव्हे तर कोणत्याही शिवसैनिकाविरुद्ध असे आक्षेपार्ह काम केल्यास किंवा पोलिसांनी त्याच्यावर कारवाईस दिरंगाई केल्यास त्याला शिवसेना स्टाइलने आम्हीच धडा शिकवू, असा इशाराही यावेळी आमदार राऊत यांनी दिला.





























































