
सामना प्रतिनिधी, मुंबई
मुंबई शहर आणि परिसरात आरटीओने गेल्या काही दिवसांत तब्बल पाच हजारांहून अधिक ऑटोरिक्षा चालकांवर कारवाई केली. अनधिकृतपणे चालविण्यात येणाऱया, एकाच परवान्यावर चालणाऱ्या, परवाना नूतनीकरण न झालेल्या तसेच बोगस ऑटोरिक्षांविरोधात परिवहन विभागाने महिनाभरापासून धडक कारवाई सुरू केली आहे. यात 2600 रिक्षांचे लायसन्स जप्त करण्यात आले आहे.
बोगस ऑटोरिक्षा चालकांविरोधात परिवहन विभागाने बेधडक कारवाई सुरू केली आहे. परिवहन आयुक्त कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार या तपासणी मोहिमेत एकूण 5,212 रिक्षांविरोधात तक्रारी प्राप्त झाल्या तर त्यात भाडे नाकारल्याने 705 जणांवर कारवाई झाली असून जादा भाडे आकारल्याप्रकरणी 38 रिक्षाचालकांवर कारवाई झाली आहे. जादा प्रवासी कोंबल्याच्या प्रकरणात 339जणांवर तसेच लायसन्स नसल्याने 3125 चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच 2600 रिक्षाचालकांचे लायसन्स जप्त करण्यात आले असून 171 रिक्षाही आरटीओने या मोहिमेत जप्त केल्या आहेत.
तक्रारींसाठी टोल फ्री क्रमांक
कुर्ला ते बीकेसी, टिळक नगर टर्मिनस, वांद्रे स्थानक परिसर अशा भागात बेकायदेशीर रिक्षांचे पेव फुटले आहे. बीकेसीवरून विमानतळाला जाताना तसेच विलेपार्ले जुहू आदी परिसरात रिक्षाचालकांची दादागिरी सहन करावी लागत आहे. याबाबत आरटीओच्या 1800220110 या टोल क्रमांकावर तक्रारी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अनधिकृत रिक्षांवर कारवाई करण्यासाठी परिवहन विभागाकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याने अडचण निर्माण होत आहे.’



























































