लेख : स्त्रीचा सन्मान करणारे व्रत

>>वृषाली पंढरी<<

गणेश चतुर्थींच्या आदल्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुद्ध तृतीयेला ‘हरितालिका’ असे म्हणतात. हरिता म्हणजे जिला नेले ती आणि आलि म्हणजे सखी. पार्वतीला शिवप्राप्तीसाठी सखी तपश्वर्येला घेऊन गेली म्हणून पार्वतीला ‘हरितालिका’ असे म्हणतात. मैत्रिणींच्या साह्याने पार्वतीने केलेले शंकराची प्राप्ती असा या शब्दाचा अर्थ आहे. हरितालिका कथा ही भविष्य पुराणातील हरगौरी संवादात आली आहे. ‘शिवा भूत्वा शिवां यजेत्’ या भावनेने हरितालिकेची पूजा करावी असे म्हटले. हिंदू कुमारिका आपल्या मनासारखा पती मिळावी म्हणून ‘हरतालिका’ हे व्रत अत्यंत मनोभावे करतात. आपल्याकडे विवाहित स्त्रियाही हे व्रत करतात. विवाह झाल्यानंतर इच्छित पती मिळाल्यानंतर एकदा घेतलेले शंकराचे व्रत मोडू नये अशी महिलांची श्रद्धा असते म्हणून त्या हे व्रत आजन्म करतात.

या व्रतामध्ये स्वच्छ केलेल्या जागेवर रांगोळी काढून चौरंग ठेवतात. केळीच्या खांबांनी चारही बाजूंनी सुशोभित केलेल्या चौरंगावर पार्वती आणि शंकराची स्थापना करून त्याची षोडशोपचारे पूजा करतात. धूप-दीप, नैवेद्य दाखवून अनेक झाडांच्या पत्री (पाने), फुले यांसह पूजा केली जाते. या पूजेत जी पत्री वाहतात, त्यात जाई, शेवंती, पारिजातक, तुळस, रुई, शमी, दुर्वा, आघाडा, चाफा, केवडा, डाळिंब, आंबा यांची पाने वाहतात. ‘सखे पार्वती, तुला जसा इच्छित वर मिळाला तसा आम्हाला मिळू दे. अखंड सौभाग्य लाभू दे,’ अशी प्रार्थना करून आरती केली जाते.

शिवपार्वती किंवा उमा महेश्वर हे जगताचे माता-पिता म्हणून ओळखले जातात. स्त्री तत्त्व आणि पुरुष तत्त्व यांच्या मेळणीतून विश्वाची निर्मिती झाली आहे. म्हणून आपण या तत्त्वांचे पूजन करतो. आदिशक्तीच्या पूजनातून या तत्त्वाचे प्रकटन आपल्यात व्हावे म्हणून प्रार्थना करायची पद्धत आहे.

दक्षिण हिंदुस्थानात अनेक कुमारिका हे व्रत करतात. गुजरातमध्ये किंवा बंगालमध्ये हरितालिका नसते. तामीळनाडूमध्ये माघ शुद्ध द्वितीयेपासून तीन दिवस गौरी उत्सव चालतो. तेथे कुमारिका आभि सौभाग्यवती स्त्रियाही हे व्रत करतात. महाराष्ट्रामध्ये अनेक विवाहित स्त्रिया आणि विधवा स्त्रियांही हे व्रत करतात. श्रावण शुद्ध तृतीयेला सुवर्णगौरी (मधुश्रावणिका), श्रावण कृष्ण तृतीयेला कज्जली गौरी आणि भाद्रपद शुद्ध तृतीयेला हरितालिका ही व्रते करून सौभाग्यवती स्त्रियांनी तीनदा गौरी पूजा करावी, असे शास्त्रात सांगितले आहे.