
रशिया आणि युक्रेनमधील तणाव आता शिगेला पोहोचला आहे. अशातच रशिया समर्थकांनी केलेल्या गोळीबारामध्ये युक्रेनच्या दोन सैनिकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आल्याने कोणत्याही क्षणी युद्धाला तोड फुटू शकते अशी शक्यता निर्माण झाली आहे. युक्रेनच्या सैन्यदलाने याबाबत माहिती दिली आहे.
युक्रेनच्या सैन्याने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी युक्रेनमधील रशिया समर्थक अलिप्तवाद्यांनी युक्रेनच्या सैन्यावर गोळीबार केला. या गोळीबारामध्ये दोन सैनिकांचा मृत्यू झाला असून चार गंभीर जखमी झाले आहेत. रशियन समर्थक अलिप्तवाद्यांनी केलेल्या गोळीबारामध्ये दोन देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण होत आहे. रशियन समर्थक अलिप्तवाद्यांबाबत युक्रेनच्या सैन्याने आपल्या फेसबुक पेजवरही माहिती दिली आहे.
गेल्या 24 तासामध्ये रशियन समर्थक अलिप्तवाद्यांनी 66 वेळा युद्धबंदी कराराचे उल्लंघन केले असून शनिवारी तब्बल 70 वेळा युद्धबंदी कराराचे उल्लंघन करत युक्रेनच्या सैनिकांवर गोळीबार केला आहे. गोळीबारासह अलिप्तवाद्यांनी तोफगोळ्यांचाही वापर केला असून 30 हून अधिक वसाहतींवर गोळीबारही केला आहे, असे युक्रेनच्या सैन्याने आपल्या फेसबुक पेजवर म्हटले आहे.
दरम्यान, युक्रेनचे राष्ट्रपती वलोडीमीर जेलेस्की यांच्या पक्षाच्या एका प्रवक्त्याने शनिवारी एक वेगळे विधान करत दोन देशांमधील संघर्ष शिगेला पोहोचल्याचे सांगितले. संघर्ष सुरू असलेल्या भागाचा दौरा करण्यासाठी गेलेल्या खासदार आणि परदेशी मीडिया हाऊसच्या पत्रकारांवर रशियन समर्थक अलिप्तवाद्यांनी हल्ला केला. त्यामुळे त्यांना शेल्टर होमचा आश्रय घ्यावा लागला.
एकीकडे युक्रेन रशियन समर्थक अलिप्तवाद्यांवर युद्धबंदी कराराचे उल्लंघन करत असल्याचा आरोप लावत आहे तर दुसरीकडे रशियन समर्थक अलिप्तवादी युक्रेनवर गोळीबाराचा आरोप करत आहेत. अलिप्तवाद्यांनी सोशल मीडिया माध्यम टेलिग्रामवर युक्रेनने अलिप्तवादी नियंत्रित भागावर गोळीबाराचा आरोप केला आहे. या गोळीबाराला जशास तसे उत्तर दिले जाईल असेही त्यांनी म्हटले आहे. युक्रेनचे सैन्य भडकावण्याचे काम करत असल्याचाही दावा अलिप्तवाद्यांनी केला आहे.
युक्रेनमध्ये स्फोट
शुक्रवारी पूर्व युक्रेनमध्ये एका गाडीमध्ये भीषण स्फोट झाला. डोनेट्स्क या शहरामध्ये हा स्फोट झाला. या भागावर रशियन समर्थक अलिप्तवाद्यांनी कब्जा केला आहे. हा स्फोट नक्की कशामुळे झाला याबाबत माहिती नाही, मात्र स्फोटामुळे पूर्व युक्रेनमधील गॅस पाईपलाईनच्या एका मोठ्या भागाला आग लागली आहे.



























































