
क्षेपणास्त्रे, बॉम्बचे धमाके… सायरनचा आवाज, जीव मुठीत धरून बेसमेंटमध्ये आश्रय, अन्न-पाण्याची टंचाई… अशा भितीदायक वातावरणात हजारो हिंदुस्थानी विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यांच्या पालकांचा जीव इथे टांगणीला लागला आहे. आपल्या मुलांना सुखरूप मायदेशी आणा अशी मागणी देशभरातून होत आहे. विद्यार्थ्यांना बेसमेंटच्या बाहेर पडता येत नाही. कारण सर्वत्र बॉम्बहल्ले, क्षेपणास्त्र हल्ले सुरू आहेत.
क्यीवसह युव्रेनच्या विविध विद्यापीठांमध्ये 18 ते 20 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यातील बहुतांशी विद्यार्थी मेडिकलचे शिक्षण घेत आहेत. आतापर्यंत केवळ 4 हजार विद्यार्थ्यांना हिंदुस्थानात आणण्यात आले. मात्र, रशियाने युक्रेनच्या सर्व विमानतळांवर कब्जा केला आहे. युक्रेनची हवाई हद्द बंद आहे. युक्रेनमध्ये मार्शल लॉ लागू आहे. त्यामुळे अडकलेले 16 हजार विद्यार्थी मायदेशी कधी परत आणणार असा प्रश्न देशभरातून विचारला जात आहे.
हॉस्टेल, मेडिकल कॉलेज, इमारतींच्या बेसमेंटमध्ये, बॉम्ब शेल्टरमध्ये शेकडो विद्यार्थी दाटीवाटीने जीव मुठीत धरून गुरुवारपासून राहात आहेत. तेथे अन्न-पाण्याची टंचाई आहे. जवळचे पैसेही संपत आले आहेत आणि बँका, एटीएमही बंद आहेत.
हंगेरी, पोलंडमार्गे विद्यार्थ्यांना आणण्याची केंद्र सरकारची योजना
हजारो विद्यार्थ्यांना हिंदुस्थानात आणण्यासाठी केंद्र सरकारने पाउले उचलल्याचे वृत्त आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी रात्री रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्याशी बोलताना विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली.
रशियन सैन्याच्या हल्ल्यामुळे युक्रेनचे हवाई क्षेत्र बंद आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना क्यीव येथून रस्ते मार्गाने हंगेरी आणि पोलंड सीमेपर्यंत आणले जाईल. त्यासाठी हिंदुस्थानने हंगेरी आणि पोलंड सीमेवरून सरकारी पथके पाठविली आहेत.
परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रुंगला म्हणाले, सुरक्षित मार्ग शोधला आहे. रस्तेमार्गाने क्यीव येथून पोलंडच्या सीमेवर नऊ तासांत आणि रोमानिया सीमेपर्यंत 12 तासांत पोहचता येईल.
हिंदुस्थानींच्या मदतीसाठी परराष्ट्र मंत्रालयाचा नियंत्रण कक्ष 24X7 सुरू राहिल.
युक्रेन, हंगेरी, पोलंडमधील हिंदुस्थानी दुतावासांना विशेष सूचना दिल्या आहेत. गरज पडल्यास बॉम्ब शेल्टर कसे शोधायचे. सुरक्षित कसे बाहेर पडायचे याविषयी सांगण्यात आले आहे.





























































