हिंदुस्थान कदापि दहशतवाद खपवून घेणार नाही! परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांचे संयुक्त राष्ट्रसंघाच्या सभेत पाकला खडे बोल

हिंदुस्थान दहशतवाद कदापी खपवून घेणार नाही, दहशतवाद पसरविणाऱया आणि दहशतवादाला खतपाणी घालणाऱया देशांवर कारवाई व्हायलाच हवी, अशा कठोर शब्दांत परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेत 77 व्या सत्राला संबोधित करताना नामोल्लेख न करता पाकिस्तानला खडे बोल सुनावले.

आपल्या 16 मिनिटांच्या भाषणात त्यांनी याचसाठी हिंदुस्थान लवकरच जी-20 आणि दहशतवादाचा प्रतिकार करणाऱया समितीचे अध्यक्षस्थान भूषविणार असल्याचेही त्यांनी ठणकावून सांगितले. जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशातील 103 कोटी जनतेच्या शुभेच्छा घेऊन आपण आलो आहोत. ते पुढे म्हणाले की, संयुक्त राष्ट्र संघ गुन्हेगारांवर प्र्रतिबंध लावून दहशतवादाला उत्तर देतो. संयुक्त राष्ट्र संघाची सुरक्षा परिषद 1267 समितीतील राजकीय नेतृत्व संयुक्त राष्ट्राने घोषित केलेल्या दहशतवाद्यांची पाठराखण करत असतात. ते त्यांच्या जोखमीवर करीत आहेत. असे करून ते आपले प्रतिष्ठा सुधारू शकत नाहीत, असे बजावत चीनकडे अंगुलीनिर्देश केला. चीनने अनेकवेळा पाकिस्तानच्या दहशतवाद्यांना सुरक्षा परिषदेच्या ग्लोबल टेररिस्ट लिस्टमध्ये सामील करण्यास नकार दिला आहे.

दुसऱयांवर वाटेल तसे आरोप करून कोणी आपली पापे लपवू शकत नाही, असे त्यांनी भाषणात स्पष्टच सांगितले. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज यांनी 370 कलम लादुन कश्मीरचे हिंदू टेरिटेरीत रूपांतर केले जात असल्याच्या आरोपाचा कठोर शब्दांत समाचार घेतला.