
> सुहास मळेकर
नाण्याची एक गंमत असते. तुमच्या हातावर ठेवताना तो लांबून अथवा कितीही जवळून ठेवला तरी देणाऱ्याने किती आपुलकीने दिलाय हे चटकन ओळखता येते. त्याला शास्त्रीय काही कारण असेल, पण कळते हे मात्र नक्की. लहानपणी नाणे चुकून जरी फेकले गेले तरी वडीलधारी माणसांकडून फटके मिळत असत. नाणे हातातून जरी पडले तरी ते नमस्कार करून उचलण्याच्या संस्कृतीत आपली पिढी मोठी झाली. ‘नाणे फेकले तर आपल्याकडे पैसे राहत नाहीत. आपण नाणेशापित गरीब होतो’ अशा बालपणी मनावर ठसलेल्या गोष्टी एखाद्या अनुभवाने आणखी ठळक होतात. अशीच एक घटना घडली तेव्हा ते बालपण आठवले. या घटनेला श्रद्धा म्हणा किंवा या घटनेच्या नायकाचा कर्मदरिद्रीपणा म्हणा.
संध्याकाळी स्टेशनला उतरल्यावर बससाठी स्टॅन्ड परिसरात जाताना मध्ये खाण्यासाठी बरेच स्टॉल लागतात. तशी पुष्कळशी बैठी जुनी घरे लागतात. स्टेशनजवळ असल्याने त्या परिसरात घर परवडू शकेल अशीच उच्चभ्रू माणसे स्थिरावली असावीत. या घरांतून काहींनी रस्त्यालगत पडवीत स्वतःचे नीटनेटके स्टॉलदेखील सुरू केले आहेत. इमिटेशन ज्वेलरी, ग्रीटिंग कार्डस्, सॅण्डविचेस, पाणीपुरीसुद्धा… त्यातीलच एकाने अलीकडे नुकताच एक वडापावचा स्टॉल उघडला. वडापाव आणि त्याचा खमंग पार करून पुढे जाणे अस्मादिकांना पाप वाटते. जंकफूड असूनही घरगुती पद्धतीने आणि चविष्ट बनवल्यामुळे तो वडापाव बहुतेक वेळा पोटात जाई. एकदा तर त्यांना म्हटलेसुद्धा, ‘चव छान आहे. ही चव अशीच मेंटेन केलीत तर तुमचा वडापाव खायला लोक स्टॉल शोधत येतील!’ उगाच म्हटले असे वाटले, कारण त्यांच्या चेहऱ्यावरची रेषाही हलली नाही. साधारण महिना झाला, वडापाव खाणे नित्याचे झाले. त्यांच्याकडील कुणाच्या तरी हाताला चव छान होती. त्यामुळे गिऱहाइकेही वाढू लागली. एक दिवस त्यांच्याकडून सुटे पैसे परत घेण्याचा योग आला. त्यांनी डॉलर चक्क हातावर टाकला. निरीक्षण केल्यानंतर खात्री झाली होय, ते कुणालाच स्पर्श होऊ नये म्हणून काळजी घेतायत.
दुसऱ्यांदा तशीच नोट देऊन मी त्या गर्दीत पुन्हा एक वडापाव घेतला. तशीच पुनरावृत्ती झाली. मी आणखी एकाला विचारले, ‘बघा बरं, असा काही अनुभव येतोय का?’ थोडय़ा वेळाने वडापाव खात गाल फुगवलेल्या त्या अनोळखी माणसाने हसत हसत मान डोलावली. ‘अरे तो वडापावही तसेच देतोय, कुणालाही स्पर्श न होण्याची काळजी घेऊन…’ ‘अरेरे, किती दिवस टिकणार आहे हा धंदा?’ उगाच चिंता वाटली. तो फेकत असलेली नाणी आता स्पष्ट दिसू लागली. लोकांनाही लक्षात येऊ लागले. गिऱहाइके रोडावली. साधारण आणखी दोन महिने गेले. तो स्टॉल बंद झाला. साधारण आणखी दोन महिने गेले. तो स्टॉल पुन्हा उघडला. माणूस तोच, वाट बघत राहिला रोज गिऱहाइकांची. वडापावचा धंदा मी पहिल्यांदाच बंद पडलेला पाहिला. वडापावमुळे तो ओळखता आला नाही, मात्र नाण्याने त्याची ओळख सांगितली, नाणेशापित.



























































