सामना अग्रलेख – विद्यार्थ्यांना दिलासा!

2263

‘नापास’ हा मानहानीकारक शब्द बारावीच्या गुणपत्रिकेतून रद्द करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण नक्कीच कमी होईल. ‘अनुत्तीर्ण’ या नकारात्मक शब्दाऐवजी ‘पुनर्परीक्षेस पात्र’ किंवा ‘कौशल्य विकासास पात्र’ हा सकारात्मक बदल विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक आहे. डॉक्टर, इंजिनीअर, सीए, एमबीए इत्यादी अभ्यासक्रमांच्या पलीकडेदेखील एक जग आहे हे उशिरा का होईना, व्यवस्थेने मान्य केले. त्याचे स्वागतच व्हायला हवे!

दहावीपाठोपाठ बारावीच्या गुणपत्रिकेतूनही ‘नापास’ अर्थात ‘अनुत्तीर्ण’ हा शब्द हद्दपार करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्याच्या शिक्षण विभागाने घेतला आहे. बारावीचे विद्यार्थी आणि पालक या दोघांनाही दिलासा देणारा हा निर्णय आहे. शिक्षणात किंवा अभ्यासात थोडेफार मागे असणे हा काही कलंक असू शकत नाही. बारावीच्या परीक्षेत काही विषयांत कमी गुण मिळाले म्हणून अशा विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर अनुत्तीर्ण असा शेरा मारण्यातून हशील तरी काय होते? असा प्रश्न शिक्षणक्षेत्रातील जाणकार आणि सुधारणावादी मंडळी सातत्याने उपस्थित करीत होती. अभ्यासात तुलनेने मागे असलेल्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवरील ‘अनुत्तीर्ण’ हा शब्द एका तऱहेने त्या विद्यार्थ्यांसाठी मानहानीकारकच होता. इतर विद्यार्थ्यांपेक्षा कमी गुण मिळाले म्हणून काही विद्यार्थ्यांच्या कपाळावर ‘नापास’चा शिक्का मारून अशा विद्यार्थ्यांचे मानसिक खच्चीकरण करण्याचा अधिकार शिक्षण व्यवस्थेला आहे काय? असे एक ना अनेक प्रश्न यासंदर्भाने अलीकडच्या काळात उपस्थित होत होते. त्यावर अक्सीर इलाज म्हणून राज्याच्या शिक्षण विभागाने बारावीच्या गुणपत्रिकेतील ‘नापास’ हा डाग कायमचा मिटवून टाकला आहे.

चार दिवसांपूर्वीच महाराष्ट्रात बारावीच्या परीक्षा सुरू झाल्या. 18 फेब्रुवारीपासून 18 मार्चपर्यंत चालणाऱया या परीक्षेसाठी राज्यभरात सुमारे 15 लाख विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. यात विज्ञान शाखेचे 5 लाख 85 हजार, कला शाखेचे 4 लाख 75 हजार, वाणिज्य शाखेचे 3 लाख 86 हजार आणि कौशल्य विकास अभ्यासक्रमाचे 57 हजार विद्यार्थी परीक्षा देत आहेत. त्याचवेळी ‘नापास’ किंवा ‘अनुत्तीर्ण’ हा शब्दच गुणपत्रिकेतून बाद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे प्रचंड ताण घेऊन परीक्षा केंद्रांत जाणाऱया विद्यार्थ्यांच्या डोक्यावरील ओझे काही प्रमाणात तरी नक्कीच उतरले आहे. या निर्णयानुसार बारावीच्या एक-दोनच नव्हे, तर तीन किंवा त्याहून अधिक विषयांत विद्यार्थी अनुत्तीर्ण असला तर यापुढे त्याच्या गुणपत्रिकेवर ‘अनुत्तीर्ण’ हा उल्लेख केला जाणार नाही. त्याऐवजी गुणपत्रिकेवर ‘पुनर्परीक्षेसाठी पात्र’ असा शेरा असणार आहे. मुख्य परीक्षेनंतर फेरपरीक्षेतदेखील एक किंवा दोन विषयांत विद्यार्थी अनुत्तीर्ण झाला तरी ‘नापास’चा उल्लेख गुणपत्रिकेत न करता ‘पुन्हा एकदा पुनर्परीक्षेसाठी पात्र’ असा शेरा गुणपत्रिकेवर लिहिला जाईल. इतकेच नव्हे, तर पुनर्परीक्षेत श्रेणी विषयांसह तीन किंवा त्याहून अधिक विषयांत विद्यार्थी अनुत्तीर्ण असेल तरीदेखील अशा विद्यार्थ्यांच्या मार्क मेमोंवर ‘अनुत्तीर्ण’ असा उल्लेख न करता ‘कौशल्य विकासास पात्र’ असा उल्लेख केला जाणार आहे. तीन किंवा त्याहून अधिक विषयांत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य व्यवसाय प्रशिक्षण परिषद आणि कौशल्य विकास सोसायटी यांच्या वतीने कौशल्य सेतू योजनेंतर्गत प्रशिक्षण दिले जाणार आहे. पुस्तकी अभ्यासात ज्यांचे मन रमत नाही, पण तांत्रिक कौशल्य आत्मसात करण्याची तयारी आणि वकूब असणाऱया तरुण विद्यार्थ्यांना याचा मोठा लाभ होईल.

बारावीमध्ये नापास झाल्यामुळे विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या आत्महत्यांच्या बातम्या मन विषण्ण करणाऱया असतात. कमी गुण मिळाले म्हणूनही विद्यार्थी गळफास घेतात. एखादा पेपर अवघड गेला तरी विद्यार्थी रेल्वेसमोर उडी घेऊन मृत्यूला कवटाळतात. गुणांची, गुणवत्तेची जीवघेणी स्पर्धा आणि यश व करीअरच्या मागे धावताना होणारी दमछाक यातून नुकतीच मिसरूड फुटलेल्या तरुणांच्या संवेदनशील मनावर एक असह्य दडपण आपसूकच येत असते. व्यवस्थेने आखून ठेवलेल्या चौकटी, कटऑफ लिस्टचे टेन्शन, पालकांचा धाक आणि नको तेवढय़ा अपेक्षा अशी ओझी वागवणाऱया विद्यार्थ्यांना नैराश्य येणार नाही तर काय होईल? याच मानसिक ताणातून विद्यार्थी अनेकदा टोकाचे पाऊल उचलतात. मात्र ‘नापास’ हा मानहानीकारक शब्द बारावीच्या गुणपत्रिकेतून रद्द करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण नक्कीच कमी होईल. ‘अनुत्तीर्ण’ या नकारात्मक शब्दाऐवजी ‘पुनर्परीक्षेस पात्र’ किंवा ‘कौशल्य विकासास पात्र’ हा सकारात्मक बदल विद्यार्थ्यांसाठी नक्कीच दिलासादायक आहे. डॉक्टर, इंजिनीअर, सीए, एमबीए इत्यादी अभ्यासक्रमांच्या पलीकडेदेखील एक जग आहे हे उशिरा का होईना, व्यवस्थेने मान्य केले. त्याचे स्वागतच व्हायला हवे!

आपली प्रतिक्रिया द्या