
हिंदुस्थानच्या पुढाकाराने पार पडलेल्या आठ देशांच्या प्रादेशिक सुरक्षा परिषदेने अफगाणिस्तानच्या भूमीचा दहशतवादासाठी वापर होऊ न देण्याचा संकल्प केला. तो वाईट नाहीच, पण आता पाकिस्तानच्या पुढाकाराने होत असलेल्या परिषदेतही असाच दहशवादविरोधी ठराव मंजूर व्हायला हवा. त्यात अफगाणिस्तानातील तालिबान-2 राजवट म्हणजे जुन्याच दहशतवादाचा नवा खेळ आहे. तेव्हा अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर दहशतवादासाठी होऊ न देण्याचा मनोदय म्हणजे सैतानाकडून भूतदयेची अपेक्षा करण्यासारखेच आहे.
दहशतवादासाठी अफगाणिस्तानच्या भूमीचा कदापि वापर होऊ देणार नाही असा निश्चय आणि मनोदय हिंदुस्थान व रशियासह आठ देशांनी बुधवारी जाहीर केला. हा संकल्प उत्तम आहे. मात्र, दिल्लीतील प्रादेशिक सुरक्षा परिषदेत ज्या आठ देशांनी हा संकल्प जाहीर केला, त्यांचे अफगाणिस्तानातील तालिबान्यांच्या हुकमतीवर तेवढे नियंत्रण खरेच आहे काय? खरे तर हा निश्चय जगभरातील देशांनी करून काय हशील होणार आहे? दहशतवादासाठी अफगाणिस्तानचा वापर करू देणार नाही हा निश्चय करणे आवश्यक आहे तो अफगाणच्या सत्तेत परतलेल्या तालिबान्यांनी. तालिबानी सरकार यावर काहीच बोलायला तयार नाही आणि हिंदुस्थानसह आठ देशांच्या परिषदेने मात्र अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर अतिरेक्यांना प्रशिक्षण देण्यासाठी, दहशतवादी कारवायांसाठी, हल्ल्यांचा कट रचण्यासाठी आणि टेरर फंडिंगसाठी होऊ देणार नाही असा मनोदय जाहीर करून टाकला आहे. तालिबानचा नव्याने झालेला उदय ही समस्त जगासाठीच धोक्याची घंटा आहे. त्यामुळे तालिबान सरकारवर दहशतवादाचा मार्ग सोडण्यासाठी जगभरातील देशांनी एकत्रितपणे दबाव आणणे आवश्यक आहे. हिंदुस्थान सरकारने बुधवारी दिल्लीत आयोजित केलेली प्रादेशिक सुरक्षा परिषद त्याच कारणासाठी होती. या परिषदेत हिंदुस्थान, रशिया, इराण, कझाकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उझबेकिस्तान या देशांच्या सुरक्षा प्रमुखांनी सहभाग घेतला.
चीन आणि पाकिस्तानने
मात्र हिंदुस्थानने आयोजित केलेल्या या परिषदेवर बहिष्कार घातला होता. तालिबानच्या सरकारला आपण मान्यताच न दिल्यामुळे त्यांना या परिषदेचे निमंत्रण देण्याचा प्रश्नच नव्हता. हिंदुस्थानच्या पुढाकाराने राजधानी दिल्लीत पार पडलेल्या या प्रादेशिक सुरक्षा परिषदेत सहभागी झालेल्या देशांनी एक संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध केला. अफगाणमधील सद्यस्थिती पाहता हा देश दहशतवाद्यांचे नंदनवन बनू देणार नाही अशी ग्वाही या जाहीरनाम्यातून देण्यात आली. या आठ देशांनी मिळून एकत्रितपणे जी कटिबद्धता व्यक्त केली, तिचे स्वागत करायला काहीच हरकत नाही. मात्र, खुद्द तालिबान सरकार, पाकिस्तान आणि चीन या तीन देशांची याविषयी नेमकी काय भूमिका आहे? अमेरिकेच्या सैन्याने अफगाणमधून माघार घेतल्यापासून चीन आणि पाकिस्तान हे हिंदुस्थानचे दोन शत्रू तालिबानच्या बाळाला एक मिनिटही मांडीवरून खाली सोडायला तयार नाहीत. शिवाय रशियाही तालिबान्यांना कडेवर घेण्यासाठी सज्ज दिसतो. यात प्रत्येकाचे छुपे अजेंडे दडले आहेत. अफगाणिस्तानचा आणि उपासमारीत होरपळणाऱया तेथील जनतेच्या कल्याणाचा मानवतावादी विचार घेऊन कोणीच उभे नाही. अफगाणिस्तानात पुन्हा एकदा तालिबानी राजवट सत्तेच्या तख्तावर बसल्यापासून आंतरराष्ट्रीय पातळीवर मुत्सद्देगिरीच्या बाबतीत मात्र सातत्याने वेगवान घडामोडी घडताना दिसत आहेत. हिंदुस्थानपुरते बोलायचे तर अमेरिकेने अफगाणिस्तानातून काढता पाय घेणे
आपल्यासाठी मोठीच डोकेदुखी
ठरली आहे. अफगाणात सत्तेत परतलेल्या तालिबान्यांचा आणि त्यांना पाठिंबा देणाऱया पाकिस्तान व चीनचा उपद्रव कसा रोखायचा याचे मोठे आव्हान हिंदुस्थानसमोर आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठीच गेले काही दिवस हिंदुस्थानची धावाधाव सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर बुधवारी हिंदुस्थानने संबंधित देशांच्या प्रादेशिक सुरक्षा परिषदेचे आयोजन केले होते. यापाठोपाठ आता पाकिस्ताननेही लगोलग अफगाणविषयी अमेरिका, चीन, रशियासह चार देशांची सुरक्षा परिषद आयोजित केली. आंतरराष्ट्रीय राजकारणात असे शह आणि काटशह चालायचेच. हिंदुस्थानच्या पुढाकाराने पार पडलेल्या आठ देशांच्या प्रादेशिक सुरक्षा परिषदेने अफगाणिस्तानच्या भूमीचा दहशतवादासाठी वापर होऊ न देण्याचा संकल्प केला. तो वाईट नाहीच, पण आता पाकिस्तानच्या पुढाकाराने होत असलेल्या परिषदेतही असाच दहशवादविरोधी ठराव मंजूर व्हायला हवा, पण चीन आणि पाकिस्तान तसे होऊ देतील काय? आधीच दोन दशकांपासून गृहयुद्धाच्या वणव्यात होरपळून निघालेल्या अफगाणिस्तानला पुन्हा दहशतवादाच्या खाईत लोटण्याच्या चाली चीन आणि पाकिस्तान खेळत आहेत. त्यात अफगाणिस्तानातील तालिबान-2 राजवट म्हणजे जुन्याच दहशतवादाचा नवा खेळ आहे. तेव्हा अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर दहशतवादासाठी होऊ न देण्याचा मनोदय म्हणजे सैतानाकडून भूतदयेची अपेक्षा करण्यासारखेच आहे.





























































