सामना अग्रलेख – भारतावर भाजपचा हल्ला!

मोदींचे सरकार म्हणजे हुकूमशाहीची शंभर टक्के गॅरंटी. मोदींचे उमेदवार जागोजाग सांगतात की, देशाचे संविधान बदलण्यासाठी त्यांना चारशे खासदार निवडून आणायचे आहेत. हे सर्व रोखावेच लागेल. युवा, शेतकरी, महिलांना सन्मानाने जगण्याची हमी नसलेला भाजपचा जाहीरनामा म्हणजे निव्वळ धूळफेक आहे. शिक्षण, आरोग्याच्या योजना कागदावरच राहतील. भाजपच्या जाहीरनाम्यावर 2014 आणि 2019 मध्ये लोकांनी विश्वास ठेवला, मात्र आता 2024 मध्ये विश्वास ठेवता येणार नाही. भाजपचा जाहीरनामा आणि मोदींची गॅरंटी म्हणजे भारतीय जनतेवर ‘ड्रोन हल्ला’च आहे!

इराणने इस्रायलवर हल्ला केला आहे. 300 ड्रोन मिसाईलचा मारा या हल्ल्यात करण्यात आला. भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी जो जाहीरनामा प्रसिद्ध केला हादेखील भारतीय जनतेवरचा ‘मिसाईल’ आणि ‘ड्रोन’ हल्लाच म्हणावा लागेल. जनतेला फसवणारा, आधीच्या आश्वासनांना हरताळ फासून पुढच्या पाच वर्षांसाठी फेकमफाक करणारा भाजपचा जाहीरनामा म्हणजे देशाची व जनतेची क्रूर चेष्टाच आहे. युवा, महिला, शेतकरी, गरीबांना सशक्त करणारा, समान नागरी कायदा लागू करणारा, ‘एक देश, एक निवडणूक’ अशी मोदी गॅरंटी देणारा भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला. त्यात नवे असे काहीच नाही. मोदी यांनी गेल्या दहा वर्षांत केलेल्या घोषणांचा धुरळा पुन्हा उडवला आहे. शेतकरी सन्मान निधीअंतर्गत दहा कोटी शेतकऱ्यांना लाभ देण्यासह शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा मोदी यांनी केली. शेतकऱ्यांचे उत्पन्न ‘डबल’ म्हणजे दुप्पट करण्याची घोषणा मोदी यांनी 2014 व 2019 च्या निवडणुकीतही केलीच होती. शेतकऱ्यांचे उत्पन्न डबल झालेच नाही. उलट जे उत्पन्न तुटपुंजे होते, तेदेखील कमी झाले. 2014 च्या आधी शेतकरी कष्टाचे खात होते. मोदी काळात तो गुलाम व परावलंबी झाला. आता 2024 च्या जाहीरनाम्यात मोदी पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा घेऊन आले. शेतकऱ्यांची ही थट्टाच आहे.

किमान हमीभाव

व काळ्या कृषी कायद्यांविरुद्ध शेतकरी दिल्लीकडे निघाले तेव्हा त्यांना रोखण्यासाठी हरयाणा-दिल्लीच्या सीमेवरील रस्त्यांवर खिळे ठोकण्यात आले. आंदोलन करणाऱया शेतकऱ्यांवर गोळ्या झाडणारे मोदी निवडणूक जाहीरनाम्यात शेतकऱ्यांचा पैवार घेतात, पण निवडणूक जिंकताच शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसतात. प्रभू श्रीरामांसाठी सर्वत्र सजावट करतात. रांगोळय़ांचे सडे पाडतात, पण शेतकऱ्यांच्या वाटेत खिळ्यांच्या रांगोळ्या टाकून अधम कृत्य केले जाते. शेतकरी सशक्त होऊ नये यासाठीच हा खटाटोप आहे. मोफत रेशन योजना पुढील पाच वर्षे चालूच ठेवण्याची घोषणा मोदी यांनी केली. किमान 80 कोटी लोकांना माणशी पाच किलो धान्य फुकट देणे म्हणजे 80 कोटी लोकांना पुढची पाच वर्षे गरीब व गुलाम ठेवण्याची मोदी गॅरंटीच आहे. लोकांना रोजगार हवाय. कष्ट करून त्यांना स्वाभिमानाची रोटी कमवायची आहे, पण मोदी त्यांना रोजगार देऊ शकत नाहीत. रोजगाराची गॅरंटी फेल झाल्याने मोदी लोकांना फुकट रेशन देत आहेत. वर्षाला दोन कोटी तरुणांना रोजगार देण्याचे वचन मोदी यांनी 2014 आणि 2019 साली दिले होते. ते कुठच्या हवेत विरून गेले? समान नागरी कायदा, ‘एक देश, एक निवडणूक’, रामायण उत्सव जगभर साजरा केला जाईल अशा घोषणा भाजपच्या जाहीरनाम्यात आहेत, पण कश्मिरी पंडितांच्या घरवापसीची गॅरंटी मोदींनी 2014 साली घेतली. ती 2024 च्या जाहीरनाम्यात दिसत नाही. मग तुमचा तो

समान नागरी कायदा

काय कामाचा? ‘रामराज्या’चा पत्ता नाही. जगभरात ‘रामायण उत्सव’ हे ढोंग मात्र सुरू आहे. मणिपुरातील हिंसाचार संपवून तेथे शांतता आणण्याची गॅरंटी मोदी देत नाहीत. लडाखमध्ये चिनी सैन्य घुसले व भारतीय भूमीवर ताबा मिळवला, ते चिनी सैन्य हटविण्यासाठी 56 इंची छाती पणास लावण्याची गॅरंटी नाही. महागाईत होरपळलेल्या जनतेला दिलासा नाही. 2014 साली गॅस सिलिंडर 400 रुपये होते. 2019 ला ते 1300 रुपये इतके महाग झाले व आता मोदी त्यांच्या जाहीरनाम्यात सांगतात की, आम्ही घरापर्यंत पाइपलाइनने गॅस पोहोचविणार आहोत. मोदी यांनी त्यांच्या जाहीरनाम्यात जुनीच बाटली व जुन्याच दारूचा बार उडवला आहे. मोदींचे राज्य पुन्हा आले तर देशात पुन्हा निवडणूक होणार नाहीत. लोकशाही आणि संविधान नष्ट केले जाईल. मोदींचे सरकार म्हणजे हुकूमशाहीची शंभर टक्के गॅरंटी. मोदींचे उमेदवार जागोजाग सांगतात की, देशाचे संविधान बदलण्यासाठी त्यांना चारशे खासदार निवडून आणायचे आहेत. हे सर्व रोखावेच लागेल. युवा, शेतकरी, महिलांना सन्मानाने जगण्याची हमी नसलेला भाजपचा जाहीरनामा म्हणजे निव्वळ धूळफेक आहे. शिक्षण, आरोग्याच्या योजना कागदावरच राहतील. भाजपला पुन्हा सत्ता म्हणजे पुढील पाच वर्षे देश लुटण्याची गॅरंटी. भाजपच्या जाहीरनाम्यावर 2014 आणि 2019 मध्ये लोकांनी विश्वास ठेवला, मात्र आता 2024 मध्ये विश्वास ठेवता येणार नाही. भाजपचा जाहीरनामा आणि मोदींची गॅरंटी म्हणजे भारतीय जनतेवर ‘ड्रोन हल्ला’च आहे!