सामना अग्रलेख – अमानुषतेचे ‘प्रवासी’

2750

मानवी अमानुषता रोज क्रूरतेचे एक नवे टोक गाठत आहे. फक्त माणसाबाबतच नव्हे, तर मुक्या जनावरांसाठीही माणूस तेवढाच क्रूर आणि निष्ठूर झाला आहे. त्यातूनच कुठे भटक्या कुत्र्यांना हाल हाल करून मारले जात आहे, कुठे जेसीबीच्या बकेटने मोकाट बैलाची क्रूरपणे हत्या केली जात आहे, तर कुठे क्षुल्लक कारणावरून कुर्‍हाडीचे घाव घालून उंटाचा जीव घेतला जात आहे. माणूस तर माणसाच्या जिवावर उठलाच आहे, पण त्याच्या अमानुषतेचे घाव मुक्या प्राण्यांवरही पडू लागले आहेत. आईबाप, आईमुलगा, वडीलमुलगी, भाऊबहीण, आजीनातू, सख्खेबाहेरचे असे सगळेच या भयंकर अमानुषतेचे प्रवासीबनले आहेत. मानवी अमानुषतेचा हा दुर्दैवी प्रवास कसा थांबवणार, हाच खरा प्रश्न आहे.

माणसाची संवेदनशीलता आणि माणुसकी संपली आहे का? अमानुषता आणि निर्घृणता हा माणसाचा स्वायिभाव होत आहे का? माणूस क्रूरतेचा कळस गाठतो आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित करणाऱ्या असंख्य घटना वारंवार घडत आहेत. रक्ताचे आणि बिनरक्ताचे असे कुठलेही नाते या अमानुषतेपासून अलिप्त नाही. माणसाची क्रूरता किती वाढली आहे हे हैदराबादमधील प्रियंका रेड्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणाने दाखवूनच दिले आहे. हैदराबाद पोलिसांनी या सर्व नराधमांचा एन्काऊंटर करून खात्मा केला. सामान्य पातळीवर या कारवाईचे स्वागतच झाले. अशा कारवाईने समाजावर जरब बसेल, बलात्कारी मनोवृत्तीला आळा बसेल अशी अपेक्षाही व्यक्त केली गेली, परंतु ती फोल ठरविणाऱ्या भयंकर घटना घडतच आहेत. नागपूरजवळील कळमेश्वर तालुक्यात पाच वर्षीय चिमुरडीची बलात्कार करून निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणातील नराधम आता पोलिसांच्या ताब्यात आहे. अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना दयेच्या याचिकेचा अधिकार नको, असे स्पष्ट मत खुद्द राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दोनच दिवसांपूर्वी व्यक्त केले होते. तरीही कळमेश्वर येथे एका चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या केली गेली. गडचिरोलीमध्ये एका युवतीवर बलात्कार करून तिचीही हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला. समाजातील विकृत नराधमांवर कठोर कायदा किंवा हैदराबाद पोलिसांच्या तडकाफडकी ‘न्याया’चा परिणाम झालेला नाही असा याचा अर्थ घ्यायचा का? माणसातील

सुसंस्कृतपणाची जागा

विकृतीने आणि संवेदनशीलतेची जागा निर्घृणतेने, अमानुषतेने घेतली आहे. दोन दशकांपूर्वी दिल्लीतील ‘तंदूर कांडा’ने देशवासीयांचा थरकाप उडवला होता. पत्नीची हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे ‘तंदूर’मध्ये जाळणाऱ्या सुशील शर्मामुळे मानवी अमानुषतेचा एक भयंकर चेहरा समोर आला होता. आता अशा घटना एवढय़ा वाढल्या आहेत की, हा निष्ठूरपणा ‘सामान्य गुन्हा’ वाटावा! हत्या करून मृतदेहाचे तुकडे बॅगेत किंवा पोत्यात भरून फेकून द्यायला नराधमांना काहीच वाटेनासे झाले आहे. टिटवाळा येथे ऑनर किलिंगची जी घटना समोर आली आहे ती याच प्रकारची आहे. मुलीच्या प्रेमसंबंधांना वडिलांचा विरोध होता. त्यातूनच त्यांनी पोटच्या मुलीची निर्घृण हत्या केली आणि तिच्या मृतदेहाचे तुकडे भरलेली बॅग कल्याण रेल्वे स्थानकाबाहेर टाकून दिली. गेल्या आठवडय़ात मुंबईत मुलीने प्रियकराच्या मदतीने वडिलांची हत्या केली. त्यांच्या मृतदेहाचे काही तुकडे असलेली बॅग नंतर माहीमच्या समुद्रकिनाऱ्यावर सापडली. बीडमध्ये घरगुती वादातून संजय ऊर्फ अब्दुल रहेमान याने पत्नी रेश्मा हिची हत्या केली. तिचा अर्धा मृतदेह जाळून टाकला आणि उर्वरित भागाचे तुकडे करून घरातच फ्रीजमध्ये ठेवले. एवढे करून तो नराधम काहीच झालेले नाही असा आव आणत नंतर दहा दिवस मुलांसोबत घरातच राहिला. बीड जिह्यातच भावाने भावाची

किरकोळ वादातून

दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना सोमवारी घडली. सासू-सासऱ्यांनी पैसे दिले नाही म्हणून गेल्या आठवडय़ात पत्नीची गळा आवळून हत्या करणारा तुषार सांबरे हा नराधमही आता गजाआड आहे. नवजात मुलीला 17 व्या मजल्यावरून फेकणारी माता जशी या मुंबईत आहे, तशी बाळ सतत रडते म्हणून त्याला गंगेत बुडवून मारणारी मातादेखील डेहराडून येथे आहे. नातवंडे म्हणजे आजी-आजोबांसाठी दुधावरची साय, पण ज्योतिषावरील अंधविश्वासामुळे नवजात ‘अपशकुनी’ नातीचा गळा घोटण्यात बंगळुरातील आजीला काहीच वाटले नाही. नाव परमेश्वरी असूनही त्या नातीसाठी ती ‘दानव’ ठरली. मानवी अमानुषता रोज क्रूरतेचे एक नवे टोक गाठत आहे. निर्घृण गुन्हे यापूर्वीही होत होते, पण आता ते सर्रास आणि अधिकाधिक क्रूरपणे होऊ लागले आहेत. फक्त माणसाबाबतच नव्हे, तर मुक्या जनावरांसाठीही माणूस तेवढाच क्रूर आणि निष्ठूर झाला आहे. त्यातूनच कुठे भटक्या कुत्र्यांना हाल हाल करून मारले जात आहे, कुठे जेसीबीच्या बकेटने मोकाट बैलाची क्रूरपणे हत्या केली जात आहे, तर कुठे क्षुल्लक कारणावरून कुर्‍हाडीचे घाव घालून उंटाचा जीव घेतला जात आहे. माणूस तर माणसाच्या जिवावर उठलाच आहे, पण त्याच्या अमानुषतेचे घाव मुक्या प्राण्यांवरही पडू लागले आहेत. आई-बाप, आई-मुलगा, वडील-मुलगी, भाऊ-बहीण, आजी-नातू, सख्खे-बाहेरचे असे सगळेच या भयंकर अमानुषतेचे ‘प्रवासी’ बनले आहेत. मानवी अमानुषतेचा हा दुर्दैवी प्रवास कसा थांबवणार, हाच खरा प्रश्न आहे.

आपली प्रतिक्रिया द्या