
डॉ. अनिल अवचट यांना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाले. त्यांच्या ‘मुक्तांगण’ची जगभरात दखल घेतली गेली. त्या कार्याचे कौतुक झाले. पण डॉ. अनिल अवचट जीवनभर वावरले ते माणूस म्हणून. ‘मुक्तांगण’चा निर्मळ माणूस आज आपल्यातून निघून गेला. निःस्वार्थ समाजसेवा हेच डॉ. अवचट यांचे व्यसन होते. त्याच व्यसनातून त्यांनी हजारोंना व्यसनमुक्त केले. डॉ. अनिल अवचट या निर्मळ माणसाला आमची आदरांजली!
डॉ.अनिल अवचट यांच्या निधनाचे वृत्त ऐकून ‘मुक्तांगणा’तून व्यसनमुक्त होऊन बाहेर पडलेल्या हजारो लोकांनी आपल्या हृदयाचे ठोके मोजले असतील. समाजकार्याचे अनेक प्रकार आहेत. स्वतःला समाजसेवक म्हणवून घेणारे भरपूर आहेत. बोटभर कार्य करून हातभर प्रसिद्धी मिळविणाऱया समाजसेवकांचीही कमी नाही, पण डॉ. अवचट यांनी व्यसनमुक्तीचा जो सामाजिक यज्ञ सुरू केला, त्यात सातत्याने कष्टाच्या समिधा टाकल्या. त्याचे वर्णन करण्यास शब्द अपुरे पडतील. अवचट हे लेखक होते, वक्ते होते, मनस्वी कलावंत होते, पण अवचट यांना महाराष्ट्र ओळखतो व त्यांना सदैव स्मरणात ठेवील ते व्यसनमुक्ती आंदोलनाचा शिलेदार म्हणून. व्यसनी, नशेबाजांना, भरकटलेल्यांना त्या मार्गावरून व्यसनमुक्त करीत नव्याने आयुष्य जगता यावे यासाठी त्यांनी ‘मुक्तांगण’ या व्यसनमुक्ती केंद्राची सुरुवात केली. त्या माध्यमातून असंख्य कुटुंबांत विझलेले दिवे पुन्हा पेटवले. ‘मुक्तांगण’ या संस्थेने अनेक आयुष्ये उद्ध्वस्त होण्यापासून रोखली. अवचट हे एमबीबीएस डॉक्टर होते, पण डॉक्टरकी हा त्यांनीं व्यवसाय म्हणून केला नाही. समाज परिवर्तनाचा विचार पेरण्याचे साधन म्हणून ते डॉक्टरकी करू लागले. पुण्यातील कॉलेजच्या दिवसांत त्यांनी अनेक चळवळींत भाग घेतला व चळवळी निर्माण केल्या. त्यांचा हात लिहिता होता. पत्रकार, लेखक म्हणून ते लिहीत राहिले. 1969 साली त्यांचे पहिले पुस्तक ‘पूर्णिया’ प्रसिद्ध झाले.
त्यांच्या लिखाणात
भ्रष्टाचार, अन्यायाचे बळी, गरिबी, मजूर, दलित, भटक्या जमाती, वेश्या यांच्याच प्रश्नांना प्राधान्य असे. त्यांची मते स्पष्ट आणि परखड होती. ‘गर्द’ या पुस्तकातून अवचट यांनी ड्रग्जच्या विळख्यात अडकलेल्या तरुण पिढीच्या करुण कहाण्या प्रथम जगासमोर आणल्या. पत्नी सुनंदा यांच्या सहकार्याने त्यांनी व्यसनमुक्तीचे कार्य गावागावांत नेण्यासाठी कष्ट घेतले. त्यांना समाजकार्याचा अहंकार नव्हता, बडेजावही नव्हता. आपण समाजाचे देणे लागतो ही भावना घेऊनच ते पुढे गेले. ‘केवळ आपल्यातील एक घास वंचितांसाठी द्यावा, समाजसेवा म्हणजे याहून निराळे काही नाही’ अशी सोपी व्याख्या डॉ. अवचटांनी केली. ‘सिग्नलला भीक मागणारी मुले पाहून मला वेदना होतात, हे सगळेदेखील आपल्यातील आहेत की नाही याचा एकदा निर्णय करावा लागेल. काहींना गरज नसताना एवढे मिळते तर काहींना एक घास मिळणे अवघड जाते,’ अशी वेदना मांडणारे डॉ. अवचट कायम साधेपणाने जगले. साधेपणाने चांगले जीवन जगता येते हे ते पटवून देत. म्हणूनच अंबानी, टाटा, बिर्ला यांच्या समाजसेवेपेक्षा अवचटांची समाजसेवा ही अधिक पारदर्शक ठरते. काहींनी माणूस घडवला तर डॉ. अवचट यांनी ‘मुक्तांगणा’तून माणूस जगवला. सारे जग नशेच्या अमलाखाली जाताना आज दिसत आहे. नशेचे ठेकेदार, नशेचे व्यापारी हेच समाजाचे खरे शत्रू आहेत. हे शत्रू बॉम्ब आणि बंदुकांचा वापर न करता एक पिढी बरबाद करीत असतात. मुंबई, पुण्यासारख्या शहरांत
अमली पदार्थांच्या व्यापाराने
किती हातपाय पसरले ते सुशांतसिंह प्रकरण व क्रूझवरील रेव्ह पार्टीत दिसले. अमली पदार्थांच्या विळख्यात बडे सरकारी अधिकारी सापडले व त्यांच्यासाठी ते पैसे ओरबाडण्याचे साधन कसे बनले ते क्रूझ पार्टी प्रकरणात समोर आले. फक्त झोपडय़ाच नाहीत तर उच्चभ्रू वस्त्यांतील मुलेही मोठय़ा प्रमाणात अमली पदार्थांच्या विळख्यात अडकली आहेत. अशा मुलांच्या सुधारण्याचा मार्ग ‘मुक्तांगण’च्या दिशेने जातो. सिगारेट, दारू पिणारे व त्यातून स्वतःला बरबादीच्या खाईत ढकलणारे शेकडो जण ‘मुक्तांगणा’तून बरे होऊन बाहेर पडले. डॉ. अवचट यांनी त्यांची पत्नी डॉ. सुनंदा यांच्या सहकार्याने व्यसनमुक्तीची एक अनोखी पद्धत शोधली. जगभरातील अनेक व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये त्यांची ही पद्धत वापरली जाते. ‘‘लेखक, डॉक्टर, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते अशा अनेक ओळखी असताना त्यापैकी कोणती ओळख जास्त भावते?’’ असं विचारल्यावर डॉक्टर अवचट म्हणाले होते, ‘‘येणाऱया पिढीने मला एक चांगला माणूस म्हणून ओळखावे.’’ डॉ. अनिल अवचट यांना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाले. साहित्य अकादमी, अमेरिकेतील महाराष्ट्र फाऊंडेशनचा पुरस्कार त्यांना मिळाला. त्यांच्या ‘मुक्तांगण’ची जगभरात दखल घेतली गेली. त्या कार्याचे कौतुक झाले. पण डॉ. अनिल अवचट जीवनभर वावरले ते माणूस म्हणून. ‘मुक्तांगण’चा निर्मळ माणूस आज आपल्यातून निघून गेला. निःस्वार्थ समाजसेवा हेच डॉ. अवचट यांचे व्यसन होते. त्याच व्यसनातून त्यांनी हजारोंना व्यसनमुक्त केले. डॉ. अनिल अवचट या निर्मळ माणसाला आमची आदरांजली!































































