
डॉ. श्रीराम लागू केवळ नटसम्राटच नव्हते. ते विद्वान व्यासंगी होते. प्रखर विज्ञानवादी होते. आपल्या नाटकांतून साक्षात विधात्यालाही दरडावून सवाल करणारा, ‘देवाला रिटायर करा’ अशी भूमिका मांडणारा हा निरीश्वरवादी नटसम्राट विचारांचे तुफान घेऊन साक्षातच विधात्याच्या भेटीला निघाला आहे. इथे पडदा पडला म्हणून काय झाले? बेलवलकर तो वरती जाऊन सरकवणारच… देवादिकांनो, नटसम्राटाच्या स्वर्गातील प्रयोगासाठी गर्दी करा!
एखाद्या विषयातील गाभाच हरवला तर ‘‘त्यात काही आता ‘राम’ राहिला नाही’’ असा उल्लेख आपण सहजपणे करत असतो. मराठी रंगभूमीचेही आज काहीसे असेच झाले आहे. अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ असलेल्या डॉ. श्रीराम लागू यांच्या निधनाने मराठी नाटय़सृष्टीतील ‘राम’च खऱया अर्थाने हरवला आहे. आपल्या कसदार अभिनयाने नाटय़रसिकांचे हृदय पिळवटून टाकण्याची अलौकिक क्षमता असणारा डॉ. श्रीराम लागू यांच्यासारखा ‘नटसम्राट’ शोधून तरी सापडेल काय? रसिकांच्या हृदयाचा ठाव घेतानाच काळीज चिरून टाकणारे डॉ. श्रीराम लागू यांचे ते तमाम नाटय़संवाद, ती अफाट शब्दफेक नाटय़प्रेमींनी आपल्या कानांत साठवून ठेवली आहे. ‘कुणी घर देता का घर?’ या अजरामर संवादाने नाटय़रसिकांच्या मनात त्यांनी कायमचे ‘घर’ करून ठेवले. डॉ. लागू यांच्या निधनाची बातमी घराघरांतील मनामनांना चटका लावून गेली ती यामुळेच. वय वर्षे 92. शरीर तसे थकले होते, पण डॉ. लागू विचारांनी मात्र अखेरपर्यंत तरुणच राहिले. झब्बा आणि पायजमा असे साधेच राहणीमान, पण विचारसरणी मात्र उच्च आणि उत्तुंग. सदैव सफाचट दाढी केलेला चेहरा, तुकतुकीत कांती, गोरा वर्ण, निळसर घारे डोळे आणि त्यावर उठून दिसणारा काळ्या काड्यांचा चष्मा ही डॉ. श्रीराम लागू यांची छबी रसिकांच्या मनःपटलावरून कधीच पायउतार होऊ शकणार नाही. अद्भुत अभिनयसामर्थ्य हेच डॉ. श्रीराम लागू यांचे बलस्थान होते. संवादांपूर्वीच केवळ देहबोलीच्या माध्यमातून रसिकांशी एक अनामिक संवाद साधण्याची
विलक्षण हातोटी
त्यांच्याकडे होती. हातांचा कंप, लुकलुकणारी मान आणि डोळय़ांतील लकाकी अशा देहबोलीतून डॉ. लागू यांनी नाटय़ व चित्रपटरसिकांवर आपल्या व्यक्तिरेखांची अशी काही अमिट छाप सोडली आहे की ती कोणालाही पुसता येणार नाही. विचारांशी त्यांनी कधीच तडजोड केली नाही. मूळ पिंड अभिनयाचाच असल्याने एमबीबीएस केल्यानंतर, विदेशात दातांच्या शस्त्र्ाक्रियांचे प्रशिक्षण घेऊन आफ्रिकेत काही काळ प्रॅक्टिस करूनही एका क्षणात श्रीराम लागूंनी डॉक्टरी पेशा सोडण्याचा निर्णय घेतला. उत्तम उत्पन्नाचे साधन सोडून नाटकासारख्या अस्थिर क्षेत्रात करीयर करण्याचा विचार कोणालाही अव्यवहार्यच वाटेल. पण जिथे मन रमतेय तिथेच आयुष्य खर्ची घालण्याची स्पष्ट भूमिका त्या विचारामागे होती. डॉक्टरी सोडून तडक मुंबई गाठल्याबरोबर वि. वा. शिरवाडकरांच्या ‘नटसम्राट’ या नाटकांतील अप्पासाहेब बेलवलकरांची भूमिका डॉ. लागूंकडे चालून आली. 23 डिसेंबर 1970 रोजी या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबईत झाला आणि एक खराखुरा ‘नटसम्राट’ मराठी रंगभूमीला मिळाला. एका प्रसिद्ध नाटककाराची उतारवयात होणारी पडझड, कुटुंबात होणारी अवहेलना, लाचारी व अपमानाचे विष पचवत जगणेच असह्य झालेल्या वृद्धाचा डॉ. श्रीराम लागूंनी मांडलेला उद्रेक ज्वालामुखीलाही लाजवणारा होता. सुस्पष्ट उच्चार आणि संथ लयीतून वरच्या पट्टीत पोहोचणारे अप्पा बेलवलकारांच्या भूमिकेतील संतप्त संवाद, धगधगत्या निखाऱयांसारखी त्यांची शब्दफेक, कानांमध्ये शिसे ओतल्यागत आदळणारे त्यांचे शब्द आणि टिपेला नेऊन अचानक ‘पॉज’ घेण्याची त्यांची लकब यामुळे प्रयोगाला उपस्थित असलेले अवघे नाटय़गृह भान हरपून ती भूमिका जगत असे. बेलवलकरांच्या आर्त सवालांनी
अश्रुचिंब झालेले नाट्यरसिक
भानावर आल्यानंतर कितीतरी वेळ होत असे तो फक्त टाळय़ांचा कडकडाट. ‘नटसम्राट’मधील लागूंनी सादर केलेला ‘टू बी ऑर नॉट टू बी… जगावं की मरावं हा एकच सवाल आहे’ इथपासून सुरू होणारा प्रदीर्घ नाटय़उतारा इतका अजरामर झाला की असंख्य नाटय़रसिकांनी तो मुखोद्गत केला. तब्बल 281 प्रयोग केल्यानंतर डॉ. लागूंनी प्रकृतीच्या कारणास्तव ‘नटसम्राट’मधून विश्रांती घेतली. गिधाडे, सूर्य पाहिलेला माणूस, काचेचा चंद्र अशी सुमारे 50 नाटके आणि 200 च्या आसपास मराठी-हिंदी चित्रपटांत त्यांनी भूमिका केल्या. मात्र ‘पिंजरा’ चित्रपटातील त्यांची मास्तरची भूमिका प्रचंड लोकप्रिय झाली. कमालीचा ध्येयनिष्ठ असलेला मास्तर आणि कलावंतीणीच्या सहवासात आल्यानंतरचा अधःपतन झालेला मास्तर या दोन्ही भूमिका म्हणजे त्यांच्या संपन्न अभिनयक्षमतेचा कळसच म्हणावा लागेल. डॉ. श्रीराम लागू केवळ नटसम्राटच नव्हते. ते विद्वान व्यासंगी होते. प्रखर विज्ञानवादी होते. गांधीवादी विचारांचे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे कडवट पुरस्कर्ते होते. मात्र त्या विचारांचे त्यांनी कधी दुटप्पी किंवा सोयीप्रमाणे ढोंग कधीच केले नाही. गांधीवादी लागूंनी ‘नथुराम’ची भूमिका करण्यास नकार दिला, त्या नाटकावर टीका केली. पण ‘मी नथुराम…’च्या प्रयोगांना मात्र त्यांनी कधीच विरोध केला नाही. आपल्या नाटकांतून साक्षात विधात्यालाही दरडावून सवाल करणारा, ‘देवाला रिटायर करा’ अशी भूमिका मांडणारा हा निरीश्वरवादी नटसम्राट आता विचारांचे तुफान घेऊन साक्षात विधात्याच्या भेटीला निघाला आहे. इथे पडदा पडला म्हणून काय झाले? बेलवलकर तो वर जाऊन सरकवणारच… देवादिकांनो, या ‘नटसम्राटा’च्या स्वर्गातील प्रयोगासाठी गर्दी करा!





























































