सामना अग्रलेख – माणुसकीची कत्तल!

बुरखाबंदी, मशिदींना टाळे, बाहेरच्या इमामांना प्रवेशबंदी असे अनेक कठोर निर्णय फ्रान्सच्या राज्यकर्त्यांनी अलीकडच्या काही वर्षांत घेतले. मात्र दहशतवादी हल्ले रोखण्यात फ्रान्सला अजूनही यश आले नाही. आता दहशतवाद्याने केलेला शिक्षकाचा शिरच्छेद आणि नीसमधील तिघांचे हत्याकांड यामुळे ‘निधर्मी’ अशी ओळख सांगणाऱ्या फ्रान्समधील धार्मिक तेढ आता विकोपाला गेली आहे. 1789 मध्ये झालेल्या फ्रेंच राज्यक्रांतीतून स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांची शिकवण फ्रान्सने जगाला दिली. त्याच फ्रान्समध्ये आता राजरोसपणे बंधुभावाचा मुडदा पडताना दिसतो आहे. धर्माच्या नावाखाली माणसांची आणि माणुसकीची कत्तल होते आहे.

युरोपातील सामर्थ्यशाली राष्ट्र असलेला फ्रान्स पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्याने हादरला आहे. निमित्त पुन्हा तेच. पेषित मोहंमद पैगंबर यांच्या व्यंगचित्राचे. गेले पंधरा दिवस त्या व्यंगचित्राचे पडसाद जगभरात उमटत आहेत. 6 ऑक्टोबर रोजी इतिहास-भूगोल शिकवणाऱया एका शिक्षकाने निधर्मी व लोकशाही मूल्यांचे धडे देताना वर्गात मोहंमद पैगंबरांचे व्यंगचित्र दाखवले. त्यावरून हा सगळा हंगामा आणि हो-हल्ला सुरू आहे. 16 ऑक्टोबर रोजी एका जिहादी अतिरेक्याने या शिक्षकाची गळा चिरून हत्या केली. त्यानंतर गुरुवारी पुन्हा एका अतिरेक्याने असेच रक्तरंजित हत्याकांड घडवले. फ्रान्सच्या नीस शहरातील एका चर्चच्या आवारात हा माथेफिरू अतिरेकी घुसला आणि ‘अल्ला हू अकबर’चे नारे देत त्याने तीन जणांची हत्या केली. ‘इसिस’ ही दहशतवादी संघटना ज्या क्रूरपणे गळे चिरून हत्याकांडे घडवते त्याच पद्धतीने थरकाप उडवणारा हा दहशतवादी हल्ला होता. नीसच्या नोट्रेडेम चर्चमध्ये प्रार्थना करण्यासाठी ख्रिश्चनधर्मीय जमले असतानाच धारदार चाकू घेऊन आलेल्या अतिरेक्याने भयंकर हल्ला चढवला. नारेबाजी करत त्याने एका वृद्ध महिलेचा गळा चिरला. ती जागेवरच गतप्राण झाली. त्यापाठोपाठ त्याने आणखी दोघांना चाकूचे वार करून भोसकले. काही मिनिटांत तीन जणांची हत्या करणाऱया या अतिरेक्याच्या पोलिसांनी लगेचच मुसक्या आवळल्या. मात्र पोलिसांनी पकडल्यानंतरही तो माथेफिरू अतिरेकी बेभान होऊन ‘अल्ला हू अकबर’चे नारे देत होता. निरपराध माणसांची हत्या करण्याच्या या जिहादी मानसिकतेला काय म्हणावे?

कोणता धर्म

अशा प्रकारे माणसांची कत्तल करण्याची परवानगी देतो? पण धर्माचे नाव घेऊन अधर्म करणाऱया अशा कृत्यांना जिहादचे नाव देऊन त्यालाच कोणी धर्म म्हणत असेल तर ही धर्मांधता म्हणजे वैचारिक दिवाळखोरीच म्हणावी लागेल. धर्म कुठलाही असो, ‘माणुसकी’ हाच त्याचा गाभा आणि मुख्य आधार असायला हवा. माणसे मारण्याच्या अमानुषतेला धर्मात स्थान असूच शकत नाही. त्यामुळेच तर प्रत्येक धर्म माणुसकी, प्रेम, सेवा, त्याग अशा मूल्यांची शिकवण देतो. मात्र काही मौलवी आणि मुस्लिम धर्मगुरूंनी नको त्या पद्धतीने इस्लामची मांडणी केली. त्यातूनच जिहादचा शिरकाव झाला आणि मुस्लिम तरुणांची माथी भडकवणाऱया पायलीच्या पन्नास अतिरेकी संघटनांची पैदास झाली. या दहशतवादाचे सर्वाधिक चटके बसले ते हिंदुस्थानलाच. हिंदुस्थानवर जेव्हा अतिरेक्यांच्या हल्ल्याचे आघात होत होते तेव्हा हेच युरोपीय आणि पाश्चात्य देश हिंदुस्थानला संयमाचे सल्ले देत होते. आता याची झळ प्रान्स, ब्रिटन आणि अमेरिकेलाही बसू लागली तेव्हा कुठे दहशतवादाविरुद्ध जागतिक लढाईच्या बाता सुरू झाल्या. फ्रान्समधील या हत्याकांडामुळे जगभरातच हलकल्लोळ माजला आहे. मुस्लिम राष्ट्रे विरुद्ध इतर देश अशी दोन गटांत जगाची विभागणी झाली आहे. आधुनिकतेचा टेंभा मिरवणाऱया जगासाठी हे नक्कीच चांगले लक्षण नाही. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष एमॅन्युएल मॅक्रो यांनी पैगंबरांचे व्यंगचित्र काढणाऱया शिक्षकाचे समर्थन करून त्या शिक्षकास मरणोत्तर फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान बहाल केला. त्यामुळे आगीत तेल पडले आणि ‘बायकॉट फ्रान्स’ अशी मोहीमच मुस्लिम देशांनी उघडली. यात पाकडे अधिकच आघाडीवर आहेत.

ईशनिंदा

कुठल्याही धर्माची असो, ती चूकच आहे. त्याची जाणीव सर्वच धर्मीयांनी ठेवायला हवी. श्रद्धेच्या विषयांबाबतही काही मर्यादा पाळल्या गेल्या पाहिजेत. अफगाणिस्तानातील बामियानमध्ये तालिबानी अतिरेक्यांनी प्राचीन बुद्धमूर्ती स्फोटके लावून उडवल्या, कश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी मंदिरे उद्ध्वस्त केली, हिंदूंची हत्याकांडे घडवली त्या वेळी ‘बायकॉट तालिबान, बायकॉट टेररीझम’ अशा मोहिमा आता रस्त्यावर उतरणाऱ्यांनी का राबवल्या नाहीत? ज्या नीस शहरात तीन जणांचे ताजे हत्याकांड झाले त्याच शहरात चार वर्षांपूर्वी एका अतिरेक्याने स्फोटकांनी भरलेला ट्रक घुसवून 84 निरपराधांचे जीव घेतले होते. त्याआधी पॅरिसमधील साखळी बॉम्बस्फोटांतही 130 जण मृत्युमुखी पडले. ‘चार्ली हेब्दो’ या साप्ताहिकाने पैगंबरांचे व्यंगचित्र छापले तेव्हादेखील त्या साप्ताहिकाच्या कार्यालयावर दहशतवादी हल्ला झाला. त्यातही 12 जण मारले गेले. गेल्या काही वर्षांत फ्रान्समध्ये असे छोटेमोठे 36 दहशतवादी हल्ले झाले. बुरखाबंदी, मशिदींना टाळे, बाहेरच्या इमामांना प्रवेशबंदी असे अनेक कठोर निर्णय फ्रान्सच्या राज्यकर्त्यांनी अलीकडच्या काही वर्षांत घेतले. मात्र दहशतवादी हल्ले रोखण्यात फ्रान्सला अजूनही यश आले नाही. आता दहशतवाद्याने केलेला शिक्षकाचा शिरच्छेद आणि नीसमधील तिघांचे हत्याकांड यामुळे ‘निधर्मी’ अशी ओळख सांगणाऱया फ्रान्समधील धार्मिक तेढ आता विकोपाला गेली आहे. 1789मध्ये झालेल्या फ्रेंच राज्यक्रांतीतून स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांची शिकवण फ्रान्सने जगाला दिली. त्याच फ्रान्समध्ये आता राजरोसपणे बंधुभावाचा मुडदा पडताना दिसतो आहे. धर्माच्या नावाखाली माणसांची आणि माणुसकीची कत्तल होते आहे.

आपली प्रतिक्रिया द्या