
मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्रात ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर उभारण्याची घोषणा केली आहे. मुंबईतील पवई येथे हे भव्य सेंटर उभे राहील, पण याच मुंबई शहरातून मुली गायब होत आहेत. संपूर्ण सरकार हे गौतम अदानी यांची सरबराई करण्यात गुंतले आहे. अर्धे पोलीस व सुरक्षा दल ‘गद्दार’ मंडळाच्या सुरक्षेसाठी जुंपले आहे. त्यामुळे माय–भगिनी–मुली–लेकी–सुनांच्या सुरक्षेला कोण विचारतेय? 1500 रुपये महिन्याला मिळतात ना? ते घ्या आणि गप्प बसा. अपहरण, अत्याचार, सुरक्षा यावर तोंडातून ‘ब्र’ काढू नका. सरकार त्यांच्याच मस्तीत दंग आहे, पण जनताही मूक–बधिर होऊन थंड बसली तर महाराष्ट्राचा सत्यानाश होण्यास वेळ लागणार नाही. नव्हे, सत्यानाशाला सुरुवात झालीच आहे!
मते मिळविण्यासाठी राज्यात ‘लाडकी बहीण’ योजना राबवली जात आहे. बिहारच्या निवडणुकीआधी मोदी साहेबांनी उद्योग, व्यवसाय करण्याच्या नावाखाली तेथील साधारण सवा कोटी महिलांच्या खात्यावर प्रत्येकी दहा हजार जमा केले. महाराष्ट्रात महिन्याला दीड हजार रुपये ‘लाडक्या बहिणीं’ना मिळतात व लवकरच त्यात वाढ करून 2100 करू, असे मुख्यमंत्री सांगतात ते राजकीय लाभासाठी, पण फक्त दीड हजार देऊन लाडक्या बहिणींचे मत विकत घेणारे सरकार राज्यातील ‘बहिणीं’ची सुरक्षा करण्यात अपयशी ठरले आहे. आश्रमशाळा, हॉस्टेल, शाळांत मुलींचे शोषण होत आहेच, पण आता मुंबईसह महाराष्ट्रातून मुली गायब होण्याचे प्रमाण वाढले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनीही या गंभीर समस्येकडे सरकारचे लक्ष वेधले आहे. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनीदेखील या समस्येवर आवाज उठवला आहे. मुंबईसारख्या शहरातून मुलींना फूस लावून पळवले जाते किंवा त्यांचे सरळ अपहरण केले जाते. गेल्या दहा महिन्यांत अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचे 1187 गुन्हे मुंबई पोलिसांच्या दप्तरी नोंद झाले. दिवसाला पाच ते सहा मुली मुंबई शहरातून बेपत्ता होत आहेत. मागच्या 30 दिवसांत मुलींच्या अपहरणाचे 136 गुन्हे नोंदवले गेले. ही बाब ‘लाडकी बहीण योजना’ राबवणाऱ्यांच्या राज्यात चिंता वाढवणारी आहे. महिन्याला 1500 रुपये दिले की महिलांच्या बाबतीत सरकारची
जबाबदारी संपली
असेच सरकारचे धोरण दिसते. श्री. राज ठाकरे यांनी एका तळमळीने मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहून महिलांच्या गंभीर समस्येवर जाब विचारला आहे. राज ठाकरे मुख्यमंत्र्यांना सवाल करतात की, ‘‘आज या राज्यात लहान मुले पळवली जात आहेत. तरुण मुली पळवल्या जात आहेत. महाराष्ट्रातल्या जमिनी पळवल्या जात आहेत. यावर विधिमंडळात चर्चा व्हावी, त्यावर एकमुखाने काही पाऊले उचलायला प्रशासनाला भाग पाडावे असे सत्तापक्षाला वाटत नाही का? ‘वंदे मातरम्’वर तावातावाने चर्चा करणाऱ्या केंद्र सरकारला मातांचा आक्रोश ऐकू येत असेल असे वाटत नाही!’’ राज ठाकरे यांची चिंता ही राज्याच्या सर्वच सामान्य जनांची चिंता आहे, पण लाडक्या बहिणींना आम्ही 1500 रुपये देतो ना? आणखी काय करायचे? यावरच राज्यकर्ते समाधान मानत आहेत. ‘लाडकी बहीण योजने’ला विरोध कराल तर कायमचे घरी बसाल, असे सरकार पक्षाच्या आमदारांना सांगणारे मुख्यमंत्री फडणवीस हे राज्याचे गृहखाते सांभाळत आहेत. त्यांच्या कारकीर्दीत गृहखात्याच्या कारभाराचे धिंडवडे निघाले आहेत. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी व देशाची आर्थिक राजधानी म्हटली जाते. मुंबई हे आतापर्यंत महिलांसाठी सगळय़ात सुरक्षित शहर मानले गेले, पण मिंधे-फडणवीस सरकार आल्यापासून मुंबईत मुली-महिलांना जगणे कठीण झाले. अत्याचार आणि अपहरणाचे गुन्हे वाढले. पुणे-नाशकांतही वेगळी स्थिती नाही. एका बाजूला महात्मा जोतिबा आणि सावित्रीबाई फुले यांच्यावर
प्रवचने झोडायची
व दुसऱ्या बाजूला सावित्रीच्या लेकींची सुरक्षा वाऱ्यावर सोडायची. आम्ही त्यांना महिन्याला रोख 1500 रुपये देतो. आज त्यांची सुरक्षा वगैरे काय ती त्यांनीच पाहावी, असा आदेश सरकारने काढला आहे काय? उत्तर महाराष्ट्रात मुली गायब होण्याचे प्रमाण जास्त आहे. नंदुरबार जिल्ह्यात मुली गायब होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. महाराष्ट्रातून गायब झालेल्या मुलींचा शोध बाजूच्या गुजरात, मध्य प्रदेश राज्यांत लागतो. एकतर या मुलींना फूस लावून नेले जाते किंवा अत्यंत गरिबी व हालअपेष्टांना कंटाळून या मुली पोटापाण्यासाठी स्वतःच परराज्यात जातात. ही बाब लाडकी बहीणवाल्या सरकारसाठी लज्जास्पद आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्रात ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर उभारण्याची घोषणा केली आहे. मुंबईतील पवई येथे हे भव्य सेंटर उभे राहील, पण याच मुंबई शहरातून मुली गायब होत आहेत. मुलींची मानवी तस्करी सुरू आहे यावर ग्लोबल पातळीवर दखल घेतली जात नाही, हे बरे नाही. संपूर्ण सरकार हे गौतम अदानी यांची सरबराई करण्यात गुंतले आहे. अर्धे पोलीस व सुरक्षा दल ‘गद्दार’ मंडळाच्या सुरक्षेसाठी जुंपले आहे. त्यामुळे माय-भगिनी-मुली-लेकी-सुनांच्या सुरक्षेला कोण विचारतेय? 1500 महिन्याला मिळतात ना? ते घ्या आणि गप्प बसा. अपहरण, अत्याचार, सुरक्षा यावर तोंडातून ‘ब्र’ काढू नका. मुंबई ते नंदुरबार मुली पळवू द्या, अपहरण होऊ द्या. सरकार त्यांच्याच मस्तीत दंग आहे, पण जनताही मूक-बधिर होऊन थंड बसली तर महाराष्ट्राचा सत्यानाश होण्यास वेळ लागणार नाही. नव्हे, सत्यानाशाला सुरुवात झालीच आहे!






























































