सामना अग्रलेख – कश्मीरात जवानांचे मरण! पुलवामा ते पूंछ!

कश्मीरातील स्थिती सुधारू दिली तर भाजपचा नकली राष्ट्रवाद आणि बेगडी हिंदुत्ववाद खतऱ्यात येईल. प्रत्येक निवडणुकीच्या वेळचा ‘भारत विरुद्ध पाकिस्तान’ हा खेळच संपून जाईल. पुलवामा हत्याकांडाचे राजकारण करणाऱ्यांकडून दुसरी अपेक्षा तरी काय करावी? कश्मीरची भूमी गेली दहा वर्षे जवानांच्या रक्ताने रोज भिजत आहे. तरीही मोदी म्हणतात सर्व काही ठीक आहे. जवानांचे हत्याकांड व निरपराध्यांचे बळी जाणे हेच यांच्या ‘ठीक’ असल्याचे लक्षण आहे. पुलवामा ते पूंछ जवानांचे बलिदान सुरूच आहे. मोदींचे निर्दय सरकार जवानांचे बळी उघडय़ा डोळय़ाने पाहत आहे. असले सरकार काय कामाचे?

पंतप्रधान (कार्यवाहक) मोदी व गृहमंत्री शहा हे देश वाऱ्यावर सोडून निवडणूक प्रचारात दंग आहेत. देशाची सुरक्षा वाऱयावर आहे. जम्मू-कश्मीरात दहशतवाद्यांनी हवाई दलाच्या ताफ्यावर हल्ला करून पुन्हा एकदा सुरक्षा व्यवस्थेचे धिंडवडेच काढले आहेत. पूंछ जिह्यात हवाई दलाच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या वाहनांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्यात एक जवान शहीद व पाच जण जखमी झाले. पाच वर्षांपूर्वी लोकसभा निवडणुकीआधी पुलवामा येथे जवानांना घेऊन जाणाऱया वाहनांवर अतिरेक्यांनी हल्ला केला होता. त्यात 40 जवानांचा बळी गेला होता. चारशे किलो आरडीएक्स वापरून अतिरेक्यांनी हा हल्ला केला. हे चारशे किलो आरडीएक्स पुलवामात पोहोचले कसे? याचा खुलासा ना मोदी करू शकले ना शहा. ज्या वाहनांतून हे आरडीएक्स पोहोचले त्या वाहनांची नोंदणी गुजरात राज्याची होती हे मात्र उघड झाले, पण पुलवामा हल्ल्यामागचे रहस्य ज्यांच्याकडे होते ते जनरल बिपीन रावत हे हेलिकॉप्टर अपघातात अत्यंत संशयास्पद आणि रहस्यमयरीत्या मृत झाले. पुलवामा हल्ल्याच्या वेळी सत्यपाल मलिक हे जम्मू-कश्मीरचे राज्यपाल होते व पुलवामा हल्ल्याबाबत राज्यपाल मलिक यांनी केलेले खुलासे धक्कादायक आहेत. पुलवामातील 40 जवानांचे हत्याकांड हे मोदी सरकारच्या बेफिकिरीचेच बळी आहेत, असे श्री. मलिक यांचे ठाम म्हणणे आहे. याच पुलवामा हत्याकांडाचा राजकीय वापर करून भाजपने तेव्हा लोकांकडे मते मागितली, पण मागच्या पाच वर्षांत ‘पुलवामा’ हत्याकांड कसे घडले व चारशे किलो आरडीएक्स तेथे कोणी पोहोचवले? त्यांचे

गुजरात कनेक्शन

काय आहे? त्याचा शोध हे लोक लावू शकले नाहीत. जसे पुलवामात घडले, अगदी तसेच शनिवारी पूंछ येथे घडले. हवाई दलाच्या जवानांच्या ताफ्यावर अंदाधुंद गोळीबार झाला. 1 जानेवारी, 2023 पासून राजौरी-पूंछ भागात दहशतवादी हल्ल्यांमध्ये 25 जवान शहीद झाले आहेत. शिवाय आठ निरपराध नागरिकांचाही मृत्यू झाला आहे. 2007 ते 2014 या 7 वर्षांत या भागात एकही मोठा दहशतवादी हल्ला झाला नव्हता, पण मागील 10 वर्षांत मात्र येथील हल्ले थांबलेले नाहीत. मोदी-शहांच्या कारभाराचे हे अपयश आहे. 370 कलम आपण कसे हटवले व त्यामुळे जम्मू-कश्मीरात कसे सर्व आलबेल आहे याच्या पिपाण्या ही जोडगोळी वाजवत असते. 370 कलम काढल्यामुळे खोऱ्यात शांतता नांदत असून दहशतवादी हल्ले पूर्णपणे थांबल्याच्या गर्जना मोदी-शहा वारंवार करतात. हे दावे पूर्णपणे फोल आहेत. गेल्या चार वर्षांत कश्मीरमध्ये सातत्याने जवानांवर आणि पोलिसांवर निर्घृण हल्ले सुरूच आहेत व शेकडो जवानांना त्यात हौतात्म्य पत्करावे लागले. सामान्य जनतेवरही हल्ले झाले. मुख्य म्हणजे शांतता नांदत आहे असे म्हणता, मग निर्वासित छावण्यांत आजही कश्मिरी पंडित का राहत आहेत? त्या पंडितांची घरवापसी का होऊ शकलेली नाही? या प्रश्नांची उत्तरे मोदी-शहा देऊ शकलेले नाहीत. मोदी-शहांनी कश्मीरातून 370 कलम हटवले ते राजकीय फायद्यासाठी. 370 हटवल्यानंतर ना तेथे पंडित परत आले ना दहशतवादी हल्ले थांबले. कश्मीरात मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक येईल व कश्मिरी तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील

अशी स्वप्ने

दाखविण्यात आली. यापैकी काहीच घडलेले नाही. जम्मू- कश्मीरला देशापासून तोडले आहे. आजही तेथील इंटरनेट सेवा, मोबाईल पह्नची सेवा विस्कळीत करून ठेवली आहे. शैक्षणिक संस्थाही नीट चालवता येत नाहीत व परिस्थितीवर सरकारचे नियंत्रण नाही. 370 कलम हटवून पाच वर्षे झाली, पण जम्मू-कश्मीर विधानसभेची निवडणूक घेण्याची हिंमत सरकार दाखवू शकलेले नाही. विधानसभा निवडणूक घेतली तर कश्मिरी जनता मतपेटीतून संताप व्यक्त करेल या भयातून निवडणूकच न घेण्याचा डरपोकपणा सरकार दाखवत आहे. हे चित्र लोकशाहीसाठी मारक आहे. कश्मीर खोऱयात आजही अतिरेक्यांचे तळ आहेत व सरकार फक्त राजकीय बतावण्या करीत आहे. कधी उरी होते, कधी पुलवामा होते तर कधी पूंछ. मात्र मोदी-शहांना त्याचे काय? कश्मीरातील स्थिती सुधारू दिली तर भाजपचा नकली राष्ट्रवाद आणि बेगडी हिंदुत्ववाद खतऱयात येईल. प्रत्येक निवडणुकीच्या वेळचा ‘भारत विरुद्ध पाकिस्तान’ हा खेळच संपून जाईल. पुलवामा हत्याकांडाचे राजकारण करणाऱ्यांकडून दुसरी अपेक्षा तरी काय करावी? लोकसभा निवडणुकांत दंग असलेल्या पंतप्रधान व गृहमंत्र्यांना जवानांच्या सांडलेल्या रक्ताचे मोल नाही. कश्मीरची भूमी गेली दहा वर्षे जवानांच्या रक्ताने रोज भिजत आहे. अतिरेक्यांचा गोळीबार व बॉम्बस्फोटाने हादरत आहे. तरीही मोदी म्हणतात सर्व काही ठीक आहे. जवानांचे हत्याकांड व निरपराध्यांचे बळी जाणे हेच यांच्या ‘ठीक’ असल्याचे लक्षण आहे. पुलवामा ते पुंछ जवानांचे बलिदान सुरूच आहे. मोदींचे निर्दय सरकार जवानांचे बळी उघडय़ा डोळय़ाने पाहत आहे. असले सरकार काय कामाचे?